गोड निबंध - २ 19
८ कम्युनिस्ट आणि हिंसा
कम्युनिस्ट लोक वर्ग द्वेषाचें विष पसरवितात व हिंसेचा प्रचार करतात. असा एक आरोप त्यांच्यावर करण्यांत येत असतो. पण तो खोटा आहे. हिंसेची त्यांना आवड नाही. हिंसा चांगली असते असें ते कधींच म्हणत नाहींत. किंबहुना या जगांत कसल्याहि त-हेची हिंसा होऊं नये हें कम्युनिझमचें साध्य आहे. एकादा रोग नाहींसा करावयाचा असल्यास रोगाची खरी कारणें शोधून काढून तीं नाहींशी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे हिंसेची खरी कारणें शोधून काढलीं पाहिजेत. कम्युनिस्ट म्हणतो त्याच्या आजच्या भांडवलदारी समाजपध्दतीत, प्रत्येक क्षणाला भांडवलदारांकडून व जमिनदारांकडून मजुरांची व शेतावरील कुळांची पिळवणूक होत आहे, तीच हिंसेचें खरें कारण आहे. तेव्हा मजुरांची व कुळांची होणारी खरी पिळवणूक थांबविण्याचा जो मनुष्य प्रयत्न करतो तो हिंसेचा उपासक आहे असें कधींच म्हणता यावयाचें नाहीं. परन्तु यावर असें म्हणण्यांत येतें कीं, पिळवणूक थांबवावयाची ही गोष्ट खरी ; पण ती सुध्दा अहिंसक मार्गाने आणि साधनांनी थांबवावयाची. हिंसेने हिंसा थांबणार नाहीं. याला कम्युनिस्टांचे असें उत्तर आहे कीं, हिंसेनें हिंसा थांबणार नाहीं या वाक्यांत जरा खोंच आहे. दोन्हीहि त-हेच्या हिंसांचा दर्जा हा सारखाच समजला जातो, ही चूक आहे. कम्युनिस्ट लोकांना ज्या हिंसेचा अवलंब करावा लागतो ती हिंसा व भांडवलदारी समाजपध्दतींतील हिंसा या सारख्या नाहींत. एकादे वेळीं दोन्हीहि हिंसाचें स्वरूप किंवा वर्णन हें सारखें होऊं शकेल, पण तेवढयावरून दोन्हीहि हिंसांना एकाच माळेंत ओंवतां येणार नाहीं. ज्या समाजांत हिंसा होणार नाही असा वर्गविहीन अहिंसक समाज निर्माण करणें हें कम्युनिझमचें साध्य आहे. कम्युनिस्टांना ज्या हिंसेचा अवलंब करावा लागतो ती हिंसा हें साध्य मिळवण्याचें साधन आहे. भांडवलदारी समाजपध्दतींतील हिंसा ही त्या समाजपध्दतींचें जीवनसर्वस्व आहे. कम्युनिझमची हिंसा ही क्रांतिवादी हिंसा आहे. समाजाला व जगाला प्रगतिपथावर नेणारी हिंसा आहे. भांडवलशाही हिंसा ही जगाला मागें खेंचणारी, क्रूर अवस्थेत नेणारी आहे. एखाद्या दरवडेखोरानें दुस-या माणसावर हल्ला करून त्याला लुबाडण्याकरितां त्याच्या पोटांत सुरा खुपसला ही हिंसा आहे. आणि एखाद्या डॉक्टरनें पोटांतील रोग काढण्याकरिता पोट चिरलें तर ही सुध्दां हिंसाच होते. पण, दरवडेखोराची हिंसा व डॉक्टरची हिंसा यांत फरक आहे. संभव आहे कीं, एखादे वेळीं दरवडेखोरानें केलेली जखम जितकी लांब असेल तितकीच लांब जखम डॉक्टरनेंहि केलेली असेल. कदाचित् दोन्ही प्रकारच्या जखमांतूनहिं सारख्याच प्रमाणांत रक्त गळेल. तथापि त्या दोन्हींहि हिंसा एकाच प्रकारच्या नाहींत. डॉक्टरची हिंसा ही माणसाला उपयुक्त असते. ती त्याला निरोगी बनवते. दरवडेखोराची हिंसा ही माणसाला ठार मारते. भांडवलशाही हिंसा ही दरवडेखोरांची हिंसा आहे. कम्युनिझमची हिंसा डॉक्टरची हिंसा आहे.
राज्यसंस्थेचें अस्तित्व हेंच मुळी हिंसेंचें प्रतीक आहे. जोपर्यंत आजची समाजपध्दति वर्गतत्त्वावर आधारलेली आहे, तोंपर्यंत ज्या ज्या वेळीं जो जो वर्ग अधिकारारूढ असेल त्या त्या वेळीं त्या त्या वर्गाच्या सरकारला आपली सत्ता टिकविण्याकरितां लष्कर ठेवणें भागच असतें. भांडवलदारांचा वर्ग अधिकारारुढ झाला; हें अधिकारपद शांततेनें त्याला मिळालें नाही. दुस-या वर्गाला नेस्तनाबूत करून, युध्द करून, राज्यक्रांति करून ह्या वर्गाने सत्ता मिळविली आहे. रक्तानें मिळविलेली सत्ता रक्त सांडल्याशिवाय दुस-या वगार्चे हातांत जाणार नाहीं. जगांत ज्या राज्यक्रांत्या झाल्या त्यांत पाशवी शक्ति वापरण्यांत आलेली आहे. इतकेंच काय पण राज्यक्रांतीची, पाशवी शक्ति ही अंगभूत गोष्ट होऊन बसली आहे. राज्यक्रांति म्हणजे युध्द असें समीकरण जरी करतां आलें नाहीं, तरी युध्दांच्या मागील सर्वसाधारण भूमिका ही राज्यक्रांतींत दिसते. अधिकारारूढ वर्गाच्या जुलमाखालीं भरडल्या जाणा-या वर्गास त्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. कारण त्या वर्गास, अधिकारारूढ वर्गाच्या अमदानींत, न्याय मिळेल किंवा त्याच्या हिताचे कायदे करण्यांत येतील अशी समजूत फक्त इतिहासाकडे डोळेझांक करून कल्पनासृष्टींत राहूनच करतां येईल. सारांश, वर्ग तत्त्वावर आधारलेल्यां समाजांत अहिंसेचा उपदेश करणें म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे दरवडेखोराच्या हिंसेला संरक्षण देऊन, तिचें समर्थन करून, डॉक्टरांच्या हिंसेचा निषेध करण्यासारखें आहे. अशा रीतीतें कम्युनिस्टांचा हिंसेविषयीं असा तात्त्वि दृष्टिकोन असला तरी हिंदुस्थानांतील कम्युनिस्टांनी हिंदी स्वातंत्र्याच्या लढयांत एकजूट निर्माण करण्यासाठीं अहिंसेच्या धोरणास तात्पुरती कबुली दाखविली आहें.
--वर्ष २, अंक २.