गोड निबंध - २ 61
व्हाइसराय, सेक्रेटरी यांची निराशाजनक उत्तरें ऐकल्यावर महात्माजींनी हिंमत खचूं न देता सा-या जगाचें हंसे होणा-या हिंदुस्थानला एकदम कायदेभंगाचा आदेश दिला नाही. आपलीं छिद्रे शत्रुपेक्षां आपणांस माहित असायला हवीं. एकटया हिंदूंनी अगर एकटया मुसलमानांनी आपल्या प्रतिपक्षाशी लढून फायदा नाहीं. पं. जवाहरलाल यांनी परवां सं.प्रा.कां. कमिटीपुढे जमलेल्या शेतक-यांपुढें बोलतांना सांगितले, ब्रिटिश सरकार आणि हिंदुस्थान यांच्यातील मतभेद आतां आकाश आणि पृथ्वी यांच्यातील अंतराप्रमाणेंच चिरंतन झाले आहेत. काँग्रेसने सतत तडजोडीचें धोरण ठेवलें. ब्रिटिशांनी साम्राज्यशाही वृत्ति सोडली नाहीं. सरकार काँग्रेसविरुध्द दडपशाहीचा लोखंडी पंजा लवकरच उभारील असा संभव वाटतो. विलंब लावल्यानें नुकसान नाहीं. अहिंसात्मक संघटणा करा. सरकार जातीय दंगे चळवळींच्या वेळी चेतवील, अशा गुंडापासून सावध रहा. मला आशा आहे कीं मुस्लीमलीग मुसलमानांमध्ये एक नवी वृत्ति, नवा दृष्टिकोन निर्माण करील. व आजच्या पेक्षाहि मुसलमानांत, आपसांत जातीजातींत परस्पर समजूत आणि विश्वास निर्माण होऊं शकेल.
गेल्या ८/१० दिवसांत पंडितजींच्या मेहनतीनें अनुकूल वातावरण निर्माण होत असल्याचें सुचिन्ह दिसत आहे. जिना-जवाहरलाल यांची बोलणी पुन्हा डिसेंबरमध्यें सुरू व्हावयाचीं आहेतच. परंतु जिनांनी आतांपर्यंत झालेल्या कामावरुन व पं.जवाहरलाल यांचे वागणुकीबद्दल चांगले शब्द काढले आहेत. व त्यानंतर रमजान ईदला त्यांचे मुंबईला झालेलें भाषणहि थोडें उत्साहजनक आहे; जनाब जीना म्हणतात, आज रमजान ईदच्या दिवशीं उपासाच्या शेंवटीं आपण मनावर ताबा ठेवायला शिकलों नाहीं तर आजची प्रार्थना फुकट आहे. खाजगी अगर सार्वजनिक जीवनांत स्वार्थ सोडून, देशाचें अंतिम हित डोळयापुढें ठेवूं या. दुस-या जातींना व धर्मांना न दुखवता वागूं या. माझ्या तरुण मुसलमान बंधूंनो, तुमचे विचार जिवंत, बदलणारे आहेत. आपणांस राजकीय हक्क जास्तीत जास्त मिळवायचे आहेत खरे, परंतु आपले देशबांधवांना न दुखवितांना. बंधुप्रेम व परमतसहिष्णुता हीं आचरणांत आणा. तोच खरा इस्लाम धर्म! दुस-यांच्या हक्कावर अतिक्रमण न करतां जेवढे मिळेल त्यांतच समाधान माना.
अशा रीतीनें यंदाचे दिपावळीच्या मुहूर्तावर हिंदूंनी व रमजान ईदच्या मुहूर्तांने मुसलमान बांधवांनी परस्परांविषयीं आदर बुध्दि ठेवून आपला स्वातंत्र्यमार्ग गळयात गळा घालून, हातांत हात घालून आक्रमूं या. आपसांतील मतभेद नाहींसे करून घटना परिषद बोलावण्यासाठी ब्रि. सरकारला भाग पाडण्याची ताकद येऊं दे. कारण तिसरी परकीय सत्ता आहे तोंपर्यंत जातीय शक्यता निर्माण झाली कीं कोणत्या तरी पक्षाशीं सौदा करून कोणाला तरी कांही तरी जास्त देऊन हिंदुस्थानचें स्वातंत्र्य दूर ढकललें जातें हे आपण ओळखून जनतेच्या प्रतिनिधींची घटना परिषद भरवून कायमची तडजोड केली पाहिजे. तरच राजाजी म्हणतात, ''आपण विश्वस्त असल्याच्या व संस्कृतिप्रसारच्या वायफळ गप्पा मारूं नका. हिंदुस्थानांतील हितसंबंधाची कमींत कमी किती पौंड शिलिंग पेन्स किंमत होते ती घेऊन पहिल्या बोटीने इंग्लंण्डात जा, जातीजातींत शांतता राखण्याचें ढोंग नका करूं.'' याप्रमाणे उत्तर देता येईल. देव करो व जिना-जवाहरलाल तडजोडीची पूर्णता होवो.
-- वर्ष २, अंक ३२