गोड निबंध - २ 80
काँग्रेसने मंत्रिमंडळें फेंकली आहेत. हिंदी राष्ट्राचा स्वयंनिर्णयाचा हक्क मान्य करा असें साम्राज्यसरकारला स्पष्टपणे बजावलें आहे. साम्राज्यसरकार काय करतें बघावें. मोघम वचनें आता नकोत, आम्हांला निर्विवाद गोष्टी पाहिजे आहेत. काँग्रेसनें ब्रि. सरकारला बजावून, जनतेसहि स्वातंत्र्यार्थ सिध्द राहण्याचा आदेश दिला आहे. आपण तयारी करूं या. हरिजनांना जवळ करून त्यांना माणुसकी देऊं या. जातीय भावनांची तीव्रता कमी करून अल्पसंख्य समाजांचा विश्वास संपादण्याची पराकाष्ठा करूं या. सांगूं कीं, उद्यांचे स्वातंत्र्य सर्वांचे. भाषा, लिपी, संस्कृति यांचा उच्छेद होणार नाहीं. कोणी कोणांवर कुरघोडा करणार नाहीं. किसान कामगारांस सांगूं या तुम्हाला भले दिवस येतील. श्रमजीवींच्या ख-या स्वातंत्र्यास आधीं लक्ष दिलें जाईल. परन्तु आपण सर्वांना नांदवूं. सारें थोडेंथोडें मिळतें घेऊन कोणी कमी, कोणी अधिक झीज सोसून, स्वातंत्र्याचें अमर मंदिर उभारूं या.
आपला लढा अहिंसेचा. किसान कामगार संघटित झाले आहेत. तरुणांच्या संघटनेंत तेज चढत आहे. परंतु महात्माजी म्हणतात, 'हातीं टकली घ्या म्हणजे अहिंसा मनीं राहील. लढा पुकारावयास मला धीर येईल.' टकली म्हणजे अनत्याचाराचें जिवंत प्रतीक. तिरंगी झेंडयावर चरका आहे. मग तो चरका आपल्या हृदयाशी धरावयास काय हरकत? उद्यां स्वराज्य मिळाल्यावर खेंडी व शहरें यांचा आपण समन्वय करूं. आज हातीं टकली घेणें म्हणजे उद्यां स्वराज्यांत यांत्रिक उद्योगधंदे वाढविण्याची कबुली देणें नव्हें. स्वराज्य म्हणजे जें करतां येत नाहीं तें करण्याची शक्ति. उद्या स्वराज्य मिळाल्यावर बहुमतांनें गिरण्या वाढविण्याचें ठरलें तर तसें करूं. परन्तु आधीं तसें करण्याची सत्ता मिळवूं. आधीं परसत्ता दूर करूं. त्यासाठीं हा लढा आहे. तो लढा अहिंसक आहे. त्याची खूण म्हणजे टकली. खादी आपल्या स्वातंत्र्याच्या लढयाशी एकरूप झालेली आहे. त्या निर्मळ सुताच्या धाग्यांत स्वातंत्र्याचा अतूट धागा मिसळलेला आहे.
स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेंत चरका व सूत आहे. परंतु तें बंधनकारक नाहीं. ज्यांना त्याचा प्रामाणिकपणानें उच्चार करावयाचा नसेल ते तेवढा भाग वगळूं शकतात. कम्युनिस्टांनी शिस्त म्हणून प्रतिज्ञा घेण्याचें ठरविलें आहे. पुरोगामी गट ३० सालची प्रतिज्ञा वाचील असें कळतें. परंतु निरनिराळया प्रतिज्ञांसाठी पृथक् स्वातंत्र्यसभा घेणें बरें नाहीं. मुख्य सभांत सामील होऊन जो नवीन भाग नको तो म्हटला नाहीं म्हणजे झालें.
जग बदलत आहे व स्वातंत्र्य मिळविण्याचे निश्चयानें हिंदुस्थान उभा आहे. केवळ सत्तेची आम्हांस आसक्ति नाहीं, हें खर्च्या क्षणांत फेकून काँग्रेसनें सिध्द केले आहे. बॅ. जिना व इतरेजन यांचे आरोप निराधार आहेत. असें प्रांतिक गव्हर्नरांच्या सांगण्यावरून व्हाइसरायांनी सांगितलें आहे. अधिकच प्रशांत व पवित्र तेजानें काँग्रेसचा यशश्चंद्रमा आज मिरवत आहे. काँग्रेस कोणाचेंहि अहित करणार नाही.