गोड निबंध - २ 33
मुसलमान येण्यापूर्वी गायीची हत्या होत नसे. परन्तु मुसलमान आले व त्यांनी हिंदूंच्या विरुध्द हे करावयाचें असें ठरविलें. गाय मारण्याचें हें कृत्य ते आज धार्मिक समजतात. कोणत्याच प्राण्याची हिंसा परमेश्वरांस आवडणार नाही. त्यांतून गायीसारख्या अत्यंत परोपकारक प्राण्यांसहि मारणें याहून नीचतर कोणती गोष्ट असेल? परन्तु दुस-याच्या मनास दुखविणारी गोष्ट करणें हाच ज्यांचा धर्म त्यांना काय सांगावयाचें? मुसलमान ईद वगैरे वेळीं गायींची हत्या करूं लागले. कसायीखाने ठिकठिकाणीं स्थापन झाले, व गायींच्या माना तुटल्या जाऊं लागल्या. थोर पुण्यप्रतापी छत्रपति शिवाजी महाराजांनीं पुनरपि गोमातेच्या साठीं प्राणपर खटपट केली. ज्या यवनांनी गोमातेची छळणा मांडली होती त्या यवनांचा त्यांनी ऊच्छेद केला. महादजी शिंद्यासारख्या नरवीरांनी दिल्लीच्या बादशहाकडून आपल्या राज्यांत गोवध बंदीची द्वाही फिरवायला लावली. मुसलमानांतहि कांही थोर राजे झाले, त्यांनी गोवध त्याज्य ठरविला होता. बाबरानें आपल्या पुढील पिढीस सांगून ठेवलें 'हिंदूस खुषी ठेवावयाचें असेल व हिंदुस्थानवर राज्य करावयाचें असेल तर गोवध करूं नका.'
हिंदूस तर गाय प्राणांहून प्रिय आहे, तशीच ती सर्वांस असली पाहिजे. आपणांकडे पूर्वी गायी पुष्कळ दूध देणा-या होत्या. अकबराच्या कारकीर्दीत तीस तीस, चाळीस चाळीस शेर दुधें देणा-या गायी होत्या. हल्लींसुध्दा कांही डेअरींतून रोज चाळीस शेर दूध देणा-या गायी आहेत. परंतु एकंदरींत पाहिले तर गायी कमी दूध देणा-या झाल्या आहेत. त्यांना भरपूर चारा वगैरे मिळत नाहीं. पूर्वीसारखीं खुलीं व मोफत गायरानें आतां नाहींत. आतां जंगल खात्यानें फारच त्रास होतो. रानमाळांत मोकळेपणानें चरतां येत नाहीं. इतर गोष्टींचीहि महर्गता होत चालली. यामुळें गायी रोड होत चालल्या, दुर्बळ होत चालल्या. बोंडलेंभर दूध दणा-या गायी दिसूं लागल्या. पुन्हां गायींची संख्याहि कमी होऊं लागली. कलकत्ता, वांद्रे वगैरे ठिकाणीं असलेल्या कसाई खान्यांनी आजपर्यंत कोटयवधि गायी मारल्या आहेत.
परन्तु सरकारच जर त्यांना आळा घालीत नाहीं तर होणार कसें? उद्या गायी सर्व नाहींशा झाल्या तर मुसलमानांनो! तुम्ही तरी शेतीभाती कशी करणार व खाणार काय? मूर्खपणाचा द्वेष काय कामाचा? गायींचे संरक्षण करण्यास सर्वांनी पुढें झालें पाहिजे. हिंदूंप्रमाणें मुसलमानांनीहिं आपला घातकी मूर्खपणा सोडून गोमातेची थोरवी समजून घेतली पाहिजे. गायरानें मोफत चरायीसाठीं खुलीं ठेवली पाहिजेत. गायींची शास्त्रीय निपज केली पाहिजे. पूर्वीसारखीं भरगच्च गोकुळें दिसूं लागून, गायींच्या दुधातुपानें पुष्टांग अशी हिंदबाळें दिसूं लागली पाहिजेत. परन्तु हें सर्व केव्हां होणार? आम्ही कळकळीनें काम केलें तर होईल. तेंहि नच होईल तर चौंडे महाराजांनी सुरू केलेल्या गोरक्षण कार्यास तरी हस्तें परहस्तें या कार्तिकांतील गोसप्ताहांत मदत करावी ; नेहमींच करावी.
--विद्यार्थी मासिकांतून