गोड निबंध - २ 83
शिक्षणाच्या प्रसारार्थ आज आधीं संघ हवे आहेत. अज्ञानरूपी शत्रूच्या किल्ल्यावर हल्ले चढवूं या. हे हल्ले चढविण्यांस कोण पुढें येणार? विद्यार्थी, तरुण विद्यार्थी हेंच राष्ट्राचे अरुण. ह्या तरुण अरुणांना आज आव्हान आहे. तरुणांनी अग्रेसर झालें पाहिजे.
सभोवतालच्या सामाजिक प्रश्नांचा विचार विद्यार्थ्यांनी नाहीं करावयाचा तर कोणी? आपल्या राष्ट्रासाठीं काय केलें पाहिजे, आपली स्थिति कशी सुधारेल, लोकांत तेज व बळ कसें येईल, संसार कसा सुधारेल ह्याचा विचार तरुण विद्यार्थ्यांनी नको का करायला?
शहरांतील वा खेड्यांतील प्रौढ विद्यार्थ्यांनी आपल्या शहरांत वा खेड्यांत किती अशिक्षित आहेत याचा विचार करावा. ते कोठें राहातात, कोठल्या गल्लीत राहतात ते पहावें. त्यांना मग ज्ञानाची भाकर घेऊन जावे. आपल्याच बंधु-भगिनींस आपण ज्ञानाच्या बाबतीत बुभुक्षित ठेवूं तर केवढा द्रोह! ज्या सवलतीं मला आहेत, जीं सुखे मला आहेत, त्यांत इतरांस भागीदार केव्हां करीन हा विचार नको का मनांत यावयास ? आपल्या बांधवांसाठीं आपणांस कितीतरी गोष्टी करतां येतील परन्तु इच्छा हवीं; तळमळ हवी.
शक्याशक्यतेच्या शंका काढूं नका. ज्यांना शाळेंत जातां येत नाहीं, शिक्षण घेण्याचीं साधनें ज्यांना नाहींत, अशांसाठीं निदान वर्षांत १२ तास देईन व शिकवीन अशी प्रतिज्ञा जर प्रत्येक प्रौढ विद्यार्थी करीत तर भारतीय विचारांत केवढी क्रांति होईल! बारा धडे शिकविणें, तें का ओझें आहे? परन्तु शिकणा-यांना ती केवढी मदत! हे बारा धडे कसलेहि चालतील. तुम्हाला व्यायामाचे प्रकार येतील तर ते शिकवा; चित्रकला येत असेल तर ती सांगा. परन्तु लिहिंणे, वाचणें व अंकगणित ह्या तीन गोष्टीं लोकशिक्षणांत हव्या. सर्वांत उत्कृष्ठ गोष्ट म्हणजे इतिहास, भूगोल शिकविणें. भूगोलांने इतिहास घडतो. इतिहास भूगोलाच्या गप्पा मारा; तसेंच रोजच्या जीवनांतील शास्त्रीय गोष्टी समजूं द्या.
विचारांची थोडीशीहि पुंजी जवळ असेल तर जीवनाला कळा चढते. जीवनाला नवरंग येतो. एकादाच किरण परन्तु काळ्या ढगाला तो रमणीयत्व देतो! एखादाच पेरलेला विचार, एखादेंच वाचलेलें वाक्य जीवनांत कसें वाढेल, कसें रुजेल, जीवनाला कसें गंभीर करील ह्याची कल्पना आपण कधीं केली आहे काय? खरोखर ज्ञान हीच जीवनाची खरी भाकर आहे. ह्या भाकरीशिवाय जीवनांत रुचि नाहीं, रंग नाहीं, राम नाहीं, ज्ञानाशिवाय जीवनाला तेज नाहीं, अर्थ नाही. ज्ञानासारखें पवित्र कांहींहि नाही. म्हणून स्वत:पाशीं जें कांही असेल, जें जें कांही उत्कृष्ठ असेल, ते तें घेऊन आपल्या आजूबाजूच्या बंधुभगिनींस देण्यासाठी चला. भारतीय मनोबुध्दि पडित आहे. या भूमीस सुपीक करावयास चला. ही देवाघरची शेती आहे.
युरोपखंडात सक्तीचें लष्करी शिक्षण असतें. शिक्षण संपल्यावर ३ वर्षे लष्करी शिक्षण घ्यावेंच लागतें. मग तो मोकळा होतो. आपण सक्तींचे शिक्षण प्रसाराचें व्रत घेऊं या. विद्यापीठानें एकेक वर्ष खेडयांत साक्षरताप्रसार केल्यावरच पदवीपत्र द्यावें. परन्तु असे सक्तीचे कायदे करण्यांत काय अर्थ? आपण प्रेमानें ही गोष्ट नाहीं का करणार? आपल्या सहजस्फूर्तीने ही गोष्ट झाली पाहिजें. साक्षरताप्रसाराचा महान् विचार निर्माण झाला आहे. या विचारासाठीं किती जण आपलें सुखस्वास्थ्य बाजूस ठेवतात हा प्रश्न आहे. विचारासाठीं, ध्येयासाठीं कोणत्या लायकीचीं किती माणसें खपलीं, झिजलीं, बळी गेलीं, या गोष्टीला शेवटी महत्त्व आहे. जीवनें अर्पिल्याशिवाय कोणताहि विचार वाढत नाहीं. भारतीय बंधु-भगिनींच्या शिक्षणासाठीं कितीजण सुखावर, स्वार्थावर, स्वास्थ्यावर पाणी सोडावयास तयार आहेत? बोला.
-- वर्ष २, अंक ६