गोड निबंध - २ 10
प्रश्न :-- त्या दिवशीं आमची मिरवणूक जात होती. तूं दारांत येऊन पहात होतास. प्रथम हंसलास. परंतु मागाहून एकदम डोळे मिटून घेतलेस. कां बरें?
उत्तर :-- हृदयांतील गोष्टी कोणास सांगूं? तुमचा बँड, तुमची कवाईत पाहून मला उचंबळून येत होतें. एकदम तोंडावर हास्य फुललें. परंतु तुम्हांला जें विषारी बौध्दिक खाद्य दिलें जातें, जी संकुचित दृष्टि दिली जाते, तें सारें मनांत येऊन वाईट वाटलें. मी डोळे मिटून माझ्या देवाला सांगितलें 'द्वेषापासून तुझी ही आवडती भूमि तूंच वांचव. या मुलांना मंगलाकडे ने. '
प्रश्न :-- तुम्हीं नाहीं का द्वेष फैलावीत? हिंदुमुसलमानांमध्यें नसाल फैलावीत पण वर्गावर्गांत फैलावीत आहांत.
उत्तर :-- अरे, तुम्हाला खोल दृष्टीच नाहीं. वर्गावर्गांत आजपर्यंत युध्दें चालू आहेत, द्वेष आहे. हे द्वेष जावयास हवे असतील तर खाजगी मालमत्ता ठेवणें योग्य होणार नाहीं. लोकांजवळ थोडी खाजगी इष्टेट राखा. परंतु प्रचंड कारखाने, प्रचंड इस्टेटी, साम्राज्याच्या मालकीच्या करा. जगांतील सर्व द्वेष यानेंच जाईल. यानेंच पिळवणूक कमी होईल. आम्हीं द्वेष वाढवीत नाहीं. द्वेष आहेच. एक उपासमारीनें मरतो व एक अजीर्णानें मरतो. हें का आम्हीं निर्माण केलें? ही स्थिति जावयास हवी असेल तर साम्यवाद त्यावर उपाय आहे. तो अहिंसेनें आणावयाचा का हिंसेनें एवढा प्रश्न राहतो. एकादा इंग्रज चांगला असला तरी ज्याप्रमाणें इंग्रज सरकार येथें योग्य ठरत नाहीं, त्याप्रमाणें कांही सावकार-कारखानदार भले असले तरी तेवढयानें सावकारी व कारखानदारी योग्य ठरत नाहींत. व्यक्तींच्या लहरीवर कोटयवधि लोकांचे कल्याण अवलंबून ठेवता येणार नाहीं. आम्ही द्वेष फैलावणार नाहीं. एका विशिष्ट पध्दतीचा आम्ही द्वेष करतों. ज्याप्रमाणे काँग्रेस इंग्रजांचा द्वेष करीत नाहीं, सरकारी राज्यपध्दतीचा द्वेष करते, त्याप्रमाणे आम्ही भांडवलवाल्यांचा द्वेष करीत नसून भांडवलशाही पध्दतीचाच फक्त द्वेष करतों.
प्रश्न :-- मग मी काय करूं?
उत्तर :-- तुझ्या हृदयाला विचार. चांगले व वाईट यांची लढाई सनातन आहे. जातीजातींची, धर्माधर्मांची लढाई ही त्याज्य आहे. लढाईचे खरें स्वरूप निराळें आहे. सत्प्रवृत्ति असत्प्रवृत्तींशी लढत आहे. तूं कोणती बाजू घेणार तें ठरव. वाईट माझा नातलग असला तरी त्याज्य, भला एकादा मुसलमान असला तरी पूज्य. ही भावना हवी. आपलें ध्येय असे असावें. 'जेथें वाईट असेल तेथें जाऊन आम्ही झगडूं. घाण कोणत्याही गल्लींत असो, ती जाळूं. आणि आधीं स्वत:च्या गल्लीतील, स्वत:च्या घरांतील जाळूं.' यांत सारें समज. शेवटी एके दिवशीं सारें चांगलें होईल, आंबा पिकेल अशी मला श्रध्दा आहे.
--वर्ष २, अंक १८.