Get it on Google Play
Download on the App Store

त्यागातील वैभव 22

अशी सर्वांची स्थिती झाली. हृदये हृदयांना भेटली. मधले दागिने वितळून गेले. भावना ओसरल्यावर लक्ष्मीचा निरोप घेऊन सर्व देवांगना निघाल्या. पार्वती- सरस्वती निघाल्या. लक्ष्मी तेथे नम्रपणे निरोप देत उभी होती.

आता तेथे कोणी नव्हते. भाऊ चंद्रही गेला. लक्ष्मी एकटीच तेथे अनंत आकाशाखाली नम्रपणे बसली होती. भगवान विष्णू शांतपणे हळूच तिकडून आले.

“झाले का हळदीकुंकू?” त्यांनी मंजुळवाणीने विचारले.

“झाले.”

“दागदागिने घालून झाले एकदा मिरवून?”

“देवा, का आता टोचून बोलता? तुम्हाला सारा वृत्तांत कळला आहे. लक्ष्मीचा गर्व नाहीसा झाला आहे. पुन्हा आता मी मिरवू पाहणार नाही. त्या क्षुद्र इच्छा गेल्या. खरे भाग्य निराळेच असते. खरा दागिना वेगळाच असतो.”

“कोणते खरे भाग्य, कोणता खरा दागिना?”

“विभूताचे भाग्य, त्यागाचा दागिना. जगाची सेवा करता करता ज्याने सर्वस्वाचा त्याग केला, तोच खरा भाग्यवान! त्याच्या भाग्याला मोज ना माप, अंत ना पार. आज मला हे ज्ञान झाले. चला पुन्हा तुमचे प्रेमाने व भक्तीने पाय चेपीत बसते. तुमचे पाय, तुमच्या पायांची धूळ, त्यातील एक कण म्हणजेच माझी हिरेमाणके. जेथे त्याग तेथे वैभव!”