त्यागातील वैभव 10
“तुम्हा बायकांशी कसे वागावे समजत नाही.”
“मी ते दागिने घालते व ते शुभ्र वस्त्र नेसते. हेसावर बसून जावे, असे माझ्या मनात आहे.”
“हंसाचा वेग सहन होईल का?”
“त्याला जरा हळू उड्डाण करायला सांगा.”
“सांगेन, चल.”
“मला बसवा ना! जरा हात द्या. असे काय अगदी करता ते!”
“तुम्ही बायका म्हणजे गाठोडी. बस पटकन. मार उडी. जेथे तेथे तुमचा हात धरायला हवा.”
“तुम्हीच ही सवय लावलीत. तुम्हीच आम्हाला अबला केलेत व पुन्हा असे बोलता. हिंडूफिरू देत नाही. घरात बसून आम्ही बनतो मातीचे गोळे. हं, धरा जरा हात.”
“तोल सांभाळा हो! हंसावर बसणे म्हणजे होडीत बसण्यासारखे आहे. तोल गेला तर पडशील.”
“परंतु या हंसाला जपून जायला सांगा.”
ब्रह्मदेवाने हंसाला सूचना दिली. सावित्री एकदाची हंसाच्या पाठीवर बसली.
“मी बसू का पाठीमागे? मीही येतो.”
“तुम्ही असे कसे बाईल-वेडे! तरी बरे चार तोंडे झाली; आता का दहा व्हायला हवी आहेत? तेथे बायकांचे हळदीकुंकू. पुरुषांचे काय काम? म्हणे मी. येऊ का? तेथे काही मी राहायला नाही जात. परत येणार आहे. चल रे हंसा. जरा जपून हो!”
हंस निघाला. ब्रह्मदेव चारी तोंडे एका दिशेकडे करून पाहू लागले. सावित्रीने मागे वळून पाहिले तो पती उभाच. तिने हाताने खूण केली की जा मागे. हंस दूर चालला. आता नुसती रुपेरी रेषा त्याची दिसत होती. ब्रह्मदेव आसनावर जाऊन बसले. पुन्हा अनंत विचारात विलीन झाले.