त्यागातील वैभव 2
कोण असा आहे की, जो माझ्यासाठी वेडा झाला नाही, ते पाहण्यासाठी मी हातात माळ घेऊन निघाले. माझ्यासाठी वेडा न होणारा असा कोण वेडपट आहे? माझी इच्छा न करणारा असा कोण निरिच्छ आहे? लक्ष्मीहूनही थोर असे रत्न कोणाजवळ आहे, ते पहावयास मी निघाले. तुम्ही दिसलात. विश्वाच्या चिंतेत दिसलात. तुम्ही त्रिभुवनाच्या कल्याण चिंतनात मग्न होता जगाचे कल्याण करणे ही लक्ष्मीहूनही थोर गोष्ट आहे, असे तुम्हाला वाटत होते. माझ्याकडे ढुंकूनही तुम्ही पाहिले नाही. माझा अहंकार दुखावला गेला. माझ्याकडे ढुंकून न पाहणा-या या वेड्याला माझ्या पायाशी लोळण घेणारा मी बनवीन, अशा ईर्ष्येने मी तुम्हाला माळ घातली. एक दिवस तुम्ही माझे पाय चेपाल, अशा आशेने मी रात्रंदिवस तुमचे पाय चेपीत बसले. एक दिवस तुम्ही माझे दास व्हाल, या आशेने मी तुमची दासी झाले. तुम्हाला जिंकून घेण्यासाठी नम्र झाले; परंतु देवा, माझा अहंकार गेला. इतकी वर्षे मी तुमचे पाय धरून बसले आहे, परंतु तुम्ही आहात तसेच आहात. कधी बाहेर हिंडायला गेले नाही. कधी मैत्रिणींना भेटले नाही. कधी नटले नाही. शृंगारसाज केला नाही. सारे जीवन जणू फुकट गेले! न पतीचे प्रेम, न सुखभोग, न काही.”
“लक्ष्मी, वेडी आहेस तू. माझे तुझ्यावर प्रेम आहे. प्रेम नसते तर ही तुझी सेवा मला भारभूत वाटली असती. बरे, ते जाऊ दे. तू उद्यापासून काही दिवस इकडेतिकडे जा. अलंकार घाल. सर्वत्र मिरव. पाहा त्यात आनंद वाटतो का?”
“उगीच का दागदागिने घालून मिरवायचे? ते दाखवायचे तरी कोणाला?”
“मला दाखव.”
“तुम्ही तर विरक्त.”
“मग केणाला दाखवतेस?”
“तेहेतीस कोटी देवांगना बोलवाव्यात, अप्सरा बोलवाव्यात. पार्वती, सावित्री यांनाही आमंत्रण द्यावे, असे मनात येते; परंतु प्रसंग हवा ना?”
“अग, आता पृथ्वीवर वसंतपूजा सुरू आहेत. वसंतोत्सव सर्वत्र होत आहेत. हळदीकुंकवाचे समारंभ होत आहेत. तूही हळदीकुंकू समारंभ कर. या निमित्ताने सा-या देवांगना एकत्र जमा, सुखसंवाद करा. तू सर्वांच्या ओट्या भर. तू समुद्राची मुलगी. तुला काय तोटा! हि-यामोत्यांच्या राशी आण. त्यांनी भर ओट्या. तूही अलंकारांनी नट. जरा गंमत करा. माझी ना नाही.”