त्यागातील वैभव 17
“ऐरावत नको. तेथे सिंह असतील. येतील अंगावर धावून.” लक्ष्मीने सांगितले.
“सरस्वतीच्या पतीचे शरीर पाहून सिंहांना आता हत्तीबद्दल प्रेम वाटू लागले असेल. निदान हिमालयातील सिंह तरी हत्तीवर हल्ला करणार नाहीत. तो गजाननांचा अपमान होईल.” एक अप्सरा म्हणाली.
“जरा जपून बोला. थट्टामस्करीलाही मर्यादा हवी.” सरस्वती रागावून परंतु राग दाबून म्हणाली.
“तुमचा गरुड का नाही देत, माझा हंस कशाला?” सावित्री लक्ष्मीस म्हणाली.
“माझा गरुड दिला असता; परंतु त्या नंदीचे व त्याचे आहे विळ्याभोपळ्यासारखे! छत्तीसचा आकडा. म्हणून हो तुमचा हंस द्या म्हटले. देता का?” लक्ष्मीने पुन्हा विचारले.
“सरस्वतीला नीट बसता येईल का? तिला मोरावर बसायची सवय. मोर डुलत डुलत जाणारा. हंस जातो तीरासारखा, मनाच्या वेगासारखा. पहा बाई सरस्वती, नाहीतर एक करता एक व्हायचे. लंबोदर रागवायचे.” सावित्री म्हणाली.
“तुम्हाला द्यायचा असेल तर द्या. सतरा आढेवेढे कशाला? कोणाचा उपहास कशाला?” सरस्वती म्हणाली.
“बरे, जा घेऊन तो हंस. जपून जा.” सावित्रीने अनुज्ञा दिली.
हंसावर बसून सरस्वती निघाली. हिमालयाची शिखरे खाली दिसू लागली. हंसाला मानस-सरोवर दिसले. त्याला तेथील कमळे खावी, पाणी प्यावे, असे वाटले. परंतु त्याने आपली इच्छा दाबली. मंडलाकार हळूहळू तो खाली आला. देवी सरस्वती मृत्युंजय शिवशंकराचे महिम्नस्तोत्र गात कैलासावर उतरली. शंकर तांडवनृत्य करीत होते. शृंगीभृंगी वाद्ये वाजवीत होते. सरस्वतीला पाहताच शृंगीभृंगी वाद्ये थांबली. वाद्ये थांबताच तांडवनृत्यही थांबले. शंकर भानावर आले. सरस्वतीने वंदन केले.