त्यागातील वैभव 21
जग सुखाने नांदावे म्हणून जो भिकारी झाला, सर्वांचे संसार सुखाचे व्हावेत यासाठी ज्याने फकीरी पत्करली, तोच खरोखर सर्वांहून श्रीमंत! ही बाहेरची श्रीमंती काय चाटायची? आज आमचे डोळे उघडले. खरी श्रीमंती कशात आहे ते कळले. आज आम्हाला खरी दृष्टी आली. दृष्टीवरची पटले उडाली. दृष्टी निर्मळ झाली. आम्ही वाटेल तसे बोललो. देवी, तुझा अपमान केला, परंतु हलाहल पिणा-या पतीची तू पत्नी., हलाहलाहूनही तीव्र असे अपमानाचे, निंदेचे, उपहासाचे विष तू प्यायलीस. थोर पतीला तू शोभतेस. जगातील विष तुम्ही पिता व जगाला मंगल देता. धन्य आहे तुमचा जोडा. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम!”
लक्ष्मीने सती पार्वतीची भक्तिभावाने ओटी भरली. सरस्वतीचीही ओटी भरली.
“सरस्वती, पुन्हा एकदा ते गीत गा. भगवान शंकराच्या महिम्याचे एखादे गीत गा. आम्हाला ऐकू दे व पावन होऊ दे.” सर्व देवांगना म्हणाल्या.
सरस्वतीने वीणा छेडली. सर्वत्र स्तब्धता पसरली. सती पार्वतीने डोळे मिटले. एक दिव्य गीत सुरु झाले.
‘प्रणाम प्रणाम
धन्य धन्य देवा, शंकराचे नाम’
असे ते दिव्य गान देवी सरस्वतीने म्हटले. सर्वांची एकतानता झाली. देवा शंकरांना प्रणाम प्रणाम असे सर्वांचे ओठ म्हणू लागले. एका उच्च वातावरणात सर्वांची मने गेली. ते गीत संपल्यावर काही वेळ अगाध स्तब्धता होती. मग त्या देवांगना उठल्या व एकमेकींस भेटल्या. एकत्वाचे वातावरण उत्पन्न झाले. सारे विरोध मावळले. क्षुद्रभाव विरले.
पाषांणा पाझर फुटती रे।
एकमेकां लोटांगणी येती रे।।