त्यागातील वैभव 15
“असले नको गाणे, रडगाणे. गमतीचे म्हणा.”
“मला असलीच गाणी येतात. ही रडगाणी नाहीत. ही त्यागाची, पराक्रमाची गाणी आहेत. देवांगनांना असा थोर पराक्रम केव्हापासून रुसेनासा झाला?” सरस्वतीने टोमणा मारला.
इतक्यात पार्वती आत आली. तिचे कोणी स्वागत करीना. या हो, बसा हो म्हणेना. शेवटी सरस्वती आपल्या आसनावरून उठली. तिने सासूबाईंस वंदन केले व त्यांना आपल्या आसनावर बसविले. सा-या देवांगना हसू लागल्या. पार्वती शांतपणे बसली. परंतु ते हसणे सरस्वतीस सहन झाले नाही.
“झालं काय तुम्हाला फिदीफिदी हसायला?” तिने विचारलं.
“हसू नको तर काय रडू?” इंद्राणी म्हणाली.
“नव-याने काहीच दिले नाही वाटते अंगावर घालायला? नाकात नथ नाही, हातात पाटली नाही.”
“अहो, गळ्यात मणि-मंगळसूत्रही नाही.”
“असेल नव-याजवळ तेव्हा ना? तो भुरी अंगाला फासतो. साप गळ्याभोवती गुंडाळतो. मेलेल्या पशूंची कातडी पांघरतो.” अशा प्रकारे त्या देवपत्न्या बोलू लागल्या. पार्वतीकडे बघून हसू लागल्या. लक्ष्मी आता ओट्या भरीत होती. तिलाही हसू आवरेना. शेवटी ती म्हणाली-
“पार्वतीबाई, आज तरी पीतांबर-पैठणी परिधान करून यावे की नाही? आज तरी शृंगारसाज करून यावे की नाही? सा-या देवांगनांना नटूनथटून येणार आणि त्यांत तुम्ही असे यावे का? सारा मग विरस होतो. या देवपत्न्यांचा अपमान केल्यासारखे होते. अशा सुंदर स्त्रियांत आपण एखाद्या भिल्लीणीप्रमाणे- रानवटाप्रमाणे यावे, याला काय म्हणावे? थोडा तरी विवेक हवा माणसाला. थोडे तरी देशकालवर्तमान पाहून माणसाने वागले पाहिजे. इतरांच्या आनंदात भर घालावी. दुस-यांच्या आनंदात मिठाचा खडा घालू नये. सर्वांचा एकमेळ असता विसंवादी सूर उत्पन्न करू नये. तुम्हाला नसेल त्यांनी काही दिले तर यायचे नव्हते.”