त्यागातील वैभव 6
“पित्याचा आशीर्वाद घेऊन लक्ष्मी वैकुंठाला परत आली. एक मोठा प्रासाद उभारण्याचे काम सुरू झाले. त्वष्टा त्या कामावर देखरेख करीत होता. समुद्राच्या निर्मळ फेसापासून प्रासाद उभारण्याचे त्याने योजिले होते. शुभ्र स्वच्छ प्रासाद. मधून मधून हिरे, माणके, पाचू, इंद्रनील वगैरे रत्ने बसविण्यात आली होती. पोवळ्यांचे नयनमनोहर वेल ठायी ठायी सोडण्यात आले होते. शेषाने सर्पांच्या मस्तकावरचे कोट्यावधी तेजस्वी मणी पाठवून दिले. ते मणी सर्पाकार असे भिंतीतून बसविण्यात आले. कुबेर आपले सर्व भांडार घेऊन तेथे आला होता. त्या भांडारातून लागेल तो माल त्वष्टा नेत होता. त्याची यादी करून ठेवण्यात आली. नंदनवनातील कल्पवृक्षांचे पल्लव आणून तेही मधून मधून लावण्यात आले होते. त्वष्ट्याने रत्ने व पुष्पे यांचाच जणू तो प्रासाद बनविला.
“ताई, तुझ्या समारंभात मी कोणते काम करू?” चंद्राने हळूच येऊन विचारले.
“भाऊराया, तू येऊन सौम्य, सुंदर प्रकाश पाड. तुझा प्रकाश सर्वांना आवडतो. तू उगवलास की सर्वांना आनंद होतो. ताईच्या हळदीकुंकू समारंभास शोभा आण.”
“मी नक्षत्रांच्या माळा पाठवू का? तू जपून वापरणार असशील तर पाठवीन.”
“हं, पाठव. प्रासादाच्या आत लावू. फार सुंदर दिसतील, नाही?”
“ताई, वायुदेव व पर्जन्यदेव यांचीही फार इच्छा आहे की काही काम करावे म्हणून.”
“त्यांना कसे सांगायचे काम? तू माझा भाऊ म्हणून दिवाबत्तीचे काम तुला सांगितले. तुला सांगायला संकोच नाही.”
“ताई, थोरांकडचे काम करावे व कृतकृत्य व्हावे, असे सर्वांना वाटत असते. तुझा पती विश्वाची काळजी पाहतो. त्याची तू पत्नी. तुझे काम म्हणजे भगवान विष्णूचे काम. सांग, त्यांनाही काही काम सांग.”