Get it on Google Play
Download on the App Store

त्यागातील वैभव 19

“उरलेसुरले भिका-याला देतात.”

“मग का त्या श्रीमंत आहेत? नव-याला दारिद्र्यामुळे तर विष खाण्याची पाळी आली. यांनीच त्यांना सतावले असेल. हे द्या, ते द्या म्हटले असेल. लागला नवरा विष प्यायला. म्हणे, जगाच्या कल्याणासाठी विष प्यायले! सारे देखावे! घरात असतील रोज उठून झगडे! निघाले जीव द्यायला. ते विष प्यायला कोणी हवेच होते. स्वारी उभी राहिली. फुकटाचे हुतात्मत्व मिळाले तर कोणाला नको असते? परंतु मरण्याची इच्छा होती कुठे? विष प्यायले ते पोटात जाऊ नये म्हणून खटापटी करू लागले. थंडावा मागू लागले. म्हणे, गंगा आणा, चंद्र आणा! सारे देखावे. सारे दंभाचे पसारे!”

अशी बोलणी चालली होती. पार्वती पर्वताप्रमाणे शांत होती. कावळ्यांच्या कलकलाटात ती हंसीप्रमाणे गंभीर व निश्चल होती.

तो सरस्वती आली. ‘काय आणले, काय आणले’, सा-याजणी उत्सुकतेने विचारू लागल्या.

“सरस्वती, आणलेस का दागदागिने?” इंद्राणीने विचारले.

“पाहू द्या तरी!” रंभा उत्कंठेने म्हमाली.

“घालतील अंगावर, मग दिसतील.” मेनका म्हणाली.

“दिसत तर नाही कोठे?” उर्वशी म्हणाली.

“मी भगवान शंकराच्या जटेतील एक केस आणला आहे.” सरस्वती म्हणाली.

“जटेतील केस?”

“अय्या!”

“तो कशाला?”

“पत्नीने केसाने गळा कापून घ्यावा म्हणून?”

“सरस्वती, सारे काय ते सांग.” लक्ष्मी म्हणाली.

“भगवान शंकर म्हणाले की, ‘या केसाच्या वजनाइतके कुबेराजवळून दागिने घ्यावेत.’ ” सरस्वती म्हणाली.