त्यागातील वैभव 1
लक्ष्मीला आपले वैभव सर्व देवांगनांना दाखवावे, अशी इच्छा उत्पन्न झाली; परंतु ते केव्हा दाखवायचे? कोणता तरी प्रसंग पाहिजे होता. एखादा उत्सव-समारंभ योजिला पाहिजे होता. ती विचारात होती.
“आज तू सचिंत का दिसतेस?” भगवान विष्णूंनी प्रश्न केला.
“तुमचे पाय चेपून चेपून कंटाळले, लग्न झाल्यापासून तुमचे पाय चुरीत बसले आहे; परंतु पुरे म्हणाल तर शपथ! आधी मुळी बोलायलाच वेळ होत नाही. सदैव विश्वाची चिंता. ज्याला स्वत:च्या पत्नीच्या सुखदु:खाची चिंता नाही, तो विश्वाची चिंता काय करणार?” लक्ष्मी रागावून म्हणाली.
“परंतु माझे पाय चेप म्हणून मी कधीतरी सांगितले का? तूच माझ्याकडे आलीस, माझ्या गळ्यात माळ घालून पाय चेपीत बसलीस. तुझ्या स्वयंवरमंडपातसुद्धा मी आलो नव्हतो. मी विश्वाचा सेवक, विश्वाचे पालन करणारा. मला कोठून होणार वेळ? तुला हे समजत नव्हते का?”
“समजत होते, परंतु गर्वाने पण करून चुकले. त्रिभुवनातील झाडून सारे पुरुष माझ्या आशेने आले होते. स्वयंवरमंडपात किती गर्दी! मी दृष्टीस पडावे म्हणून माना उंच करून बघत होते. प्रत्येकाला वाटत होते की ही लक्ष्मी स्वत:ला मिळावी; परंतु माझ्यासाठी लाळ घोटीत येणा-यांना मी कशी किंमत देऊ? जो अजिंक्य आहे, त्याला जिंकण्यात पुरुषार्थ आहे. ते सारे केव्हाच माझ्यासाठी वेडे झाले होते. माझ्यासाठी जो वेडा झालेला नाही, माझी ज्याला इच्छा नाही, त्याला मी माळ घालणार आहे, असा माझा पण जाहीर करताच सर्वांची तोंडे काळवंडली, सारे निराश झाले.