त्यागातील वैभव 12
“सरस्वतीदेवी, तुम्ही काही मंगलगीते म्हणा.” लक्ष्मीने विनविले.
“परंतु अजून माझ्या सासूबाई का नाही आल्या?” तिने विचारले.
“सासूबाई म्हणजे कोण?” शचीदेवीने विचारले.
“अग, कैलासावरची पार्वती!” सावित्री म्हणाली.
“नाही आल्या तर नाही; तुम्ही म्हणा गाणे. उशीर होत आहे. घरी जायला उशीर झाला तर रागावतील.” इंद्राणी म्हणाली.
“इतका का दरारा आहे?” सावित्रीने विचारले.
“ते काही विचारू नका. आणि जयंत पुन्हा रडत बसला असेल. म्हणा हो सरस्वतीदेवी.” इंद्राणी म्हणाली.
“सासूबाईंना अपमान वाटेल.” सरस्वती म्हणाली.
“स्मशानात राहणा-यांना कसला मान नि कसला अपमान!” इंद्राणी म्हणाली.
“स्वाभिमान सर्वांना आहे.” सरस्वतीने शांतपणे उत्तर दिले.
“आता वाद पुरे सरस्वतीदेवी. एकीसाठी सर्वांचा खोळंबा नको. म्हणा हो गाणे.” लक्ष्मी म्हणाली.
सरस्वतीचे काही चालेना. शेवटी तिने वीणा वाजवली. सर्वत्र शांतता पसरली. गायन सुरू झाले. वाग्देवतेचे गायन. विश्वाचा सांभाळ करण्यासाठी भगवान शेकर हलाहल प्राशन करीत आहेत, विश्वाच्या कल्याणासाठी स्वत:चे बलिदान करीत आहेत, अशा प्रसंगावरचे ते अमरगीत होते. सरस्वती ते गीत गाता गात समरस झाली.
शंकराच्या महिम्याचे ते गीत वैकुंठी चालले असता तिकडे कैलासावर काय चालले होते? पार्वतीच्या कानावर सर्व गोष्टी आल्या होत्या. सर्व देवांगनांना भेटावयास ती अधीर होती; पण बोलावणे नव्हते. बोलावल्याशिवाय कसे जायचे? पार्वती दु:खी होती.