त्यागातील वैभव 13
“मला वाटते तुम्ही जायला हरकत नाही.” देवर्षी नारद म्हणाले.
“नारदा, आम्हाला वाटते स्वाभिमान नाही?” पार्वती म्हणाली.
“मी नाही का सर्वत्र जात? मला कोण बोलावते? आता मी तुमच्याकडे आलो. तुम्हा का बोलावले होतेत? मी निमंत्रणाशिवाय वाटेल तेथे जातो. माझा कधीही कोणी अपमान केला नाही. आमंत्रणाशिवाय न जाणे म्हणजे अहंकार! जे थोर आसतात त्यांना आपपर नसते. लक्ष्मी कदाचित आमंत्रण पाठवायला विसरली असेल, किंवा तो गरुड यायला भ्याला असेल, किंवा मुद्दाम आमंत्रण पाठविले नाही, असेही समजून चालू या; परंतु ती त्यांची चूक. आमंत्रण नसताही आपण मनाचा मोठेपणा दाखवून जावे व त्यांना लाजवावे, असे माझे मत आहे.” नारद म्हणाले.
“मलाही जावेसे वाटते.” पार्वती म्हणाली.
“तेथे अपमान होईल. मागे एकदा दक्षाकडे तुझा अपमान झाला व तू आगीत उडी घेतलीस. अपमान इवलाही तुला सहन होत नाही. आजही तेथे असेच काहीसे झाले तर आणखी कुठे उडी घेशील? मग माझी पुन्हा तारांबळ.” भगवान शंकर म्हणाले.
“मी का पूर्वीसारखीच अजून रागीट आहे? त्या वेळेस घेतली उडी, आता नाही घेणार. मनुष्य का तसाच राहतो?” पार्वतीने विचारले.
“स्वभाव बदलतो; परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. जा. माझी ना नाही. आता नंदीवर बसून जा. पायी जायला उशीर होईल. जायचेच तर वेळेवर जावे.” शंकर म्हणाले.
“जो वेळेवर जात नाही तो मोठा! छोटे लोक वेळेच्या आधीपासूनच गर्दी करतात. मध्यम लोक साधारण वेळेच्या सुमारास येतात. बडे लोक वेळेनंतर येतात.” नारद हसून म्हणाले.