Get it on Google Play
Download on the App Store

गोष्ट एकोणसत्तरावी

गोष्ट एकोणसत्तरावी

जो लोभाच्या आहारी जाई, त्याच्या जीवनातले सुख नाहीसे होई.

चंद्र नावाच्या राजाने आपल्या लहान मुलांच्या मनोरंजनासाठी बरीच वानरे पाळली होती व सेवकांच्या सहाय्याने त्यांची चांगली बडदास्त ठेवली होती. त्या वानरांचा जो म्होरक्या होता, तो अतिशय बुद्धिमान् व बहुश्रुत होता.

त्या राजाने आपल्या मुलांच्या खेळातल्या गाड्यांना जुंपण्यासाठी काही मेंढेही पाळले होते. त्यांतलाच एक खादाड मेंढा वेळीअवेळी मुदपाकखान्यात शिरून तिथल्या पदार्थांवर तुटुन पडे. मग त्याला हाकलून देण्यासाठी तिथले आचारी हाती लागेल ती गोष्ट, त्याच्यावर भिरकावून त्याला घालवून देत. ते आचारी व तो मेंढा यांचा असा झगडा जवळजवळ दररोज चाले.

तो प्रकार पाहुन एकदा तो वानरप्रमुख आपल्या जातभाईंना जवळ बोलावून त्यांना म्हणाला, 'इथे आता तंटेझगडे ही नित्याची बाब होऊन बसली असल्याने, या ठिकाणी राहाणे धोक्याचे आहे. तेव्हा आपण इथुन कुठेतरी निघून जाऊ या. कारण म्हटलंच आहे -

कलहान्तानि हर्म्याणि कुवाक्यान्तं च सौह्रदम् ।

कुराजान्तानि राष्ट्राणि कुकर्मान्तं यशो नृणाम् ॥

(मोठमोठ्या घरांचा नाश भांडणांनी होतो. मैत्रीचा शेवट कटु शब्दांनी होतो, राष्ट्रांचा नाश वाईट राजांमुळे होतो आणि वाईट कृत्यांमुळे माणसांच्या यशाचा शेवट होतो.)

'पण त्या दांडगट मेंढ्याच्या व आचार्‍यांच्या भांडणाची झळ आपल्याला कशी काय पोहोचू शकते ?' मधेच एका तरुण वानराने प्रश्न केला.

यावर तो वानरप्रमुख म्हणाला, 'असं समजा, एखाद्या दिवशी, तो मेंढा मुदपाकखान्यात शिरला असता कुणा आचार्‍याने त्याच्या अंगावर पेटते कोलीत फेकले, तर त्या मेंढ्याच्या अंगावरची लोकर पेट घेईल. मग तो भयभीत झालेला मेंढा इकडे तिकडे धावत, मुदपाकखान्याजवळ असलेल्या गवताच्या गंजीकडे गेला, की ती गंजीच नव्हे, तर तिला लागून असलेली घोड्यांची पागाही पेट घेईल आणि तीत असलेले घोडे भाजून मरतील किंवा होरपळून निघतील. तसे झाले तर शालिहोत्र याच्या जनावरांच्या रोगावरील उपचारग्रंथात सांगितल्याप्रमाणे आगीमुळे घोड्यांना होणार्‍या जखमांवर वानरांची चरबी हा रामबाण उपाय असल्याने, चंद्रराजा त्या चरबीसाठी आपणा सर्वांना ठार मारील.' पण वानरप्रमुखाचं हे म्हणणं राजवाड्यात मिळणार्‍या उत्तमोत्तम पदार्थांची चटक लागलेल्या त्या वानरांना पटले नाही. तेव्हा तो त्यांना म्हणाला, 'तुम्हाला नसले यायचे, तर येऊ नका. पण मी मात्र जाणार. कारण म्हटलंच आहे-

मित्रं व्यसनसम्प्रासं स्वस्थानं परपीडितम् ।

धन्यास्ते ये न पश्यन्ति देशभङ्गं कुलक्षयम् ॥

(संकटात सापडलेला मित्र, दुसर्‍याकडून त्रास होणारे आपले घर, देशाची फाळणी, किंवा कुलक्षय झालेला पाहाण्याचा ज्यांच्यावर प्रसंग येत नाही, ते खरोखरच धन्य होत.)

याप्रमाणे बोलून तो वानरप्रमूख तिथून वनात निघून गेला.

परंतु थोड्याच दिवसांत त्या वानरप्रमुखाच्या कानी आपण केलेले भाकित खरे ठरल्याचे आले. आपल्या सर्व आप्तमित्रांना राजाने चरबी मिळविण्यासाठी मारल्याचे ऐकून तो अतिशय अस्वस्थ झाला व मनात म्हणाला, 'माझे न ऐकता ते माझे आप्तमित्र तिथे राहिले हे खरे. पण कसेही झाले तरी ते माझेच ना ? मग माझ्या आप्तमित्रांना ज्याने जिवे मारले, त्या राजावर सूड उगवायला नको का ? कारण म्हटलंच आहे -

मर्षयेद्धर्षणां योऽत्र वंशजां परनिर्मिताम् ।

भयात् वा यदि वा कामत् स ज्ञेयः पुरुषाधमः ॥

(परक्यांकडून आपल्या कुटुंबियांवर हल्ला केला गेला असता, भीती वा स्वार्थ यांमुळे जो तो सहन करतो असा पुरुष नीचात नीच समजावा.)

अशा तर्‍हेनं आपल्या गणगोताचा संहार केल्याबद्दल राजावर सूड उगविण्याचा विचार करीत तो वानरप्रमुख एका सरोवरापाशी गेला. त्या सरोवरात विपुल रत्‍ने होती. सरोवराच्या पाण्यावर सूर्यप्रकाश पडला की ती रत्‍ने चमकू लागत व ती मिळविण्यासाठी त्या सरोवरात शिरणारी माणसे, त्यात राहणार्‍या एका राक्षसाच्या भक्ष्यस्थानी पडत. त्या राक्षसाची भेट घेऊन त्या वानरप्रमुखाने आपल्या बंधुबांधवांच्या संहाराची सर्व हकीकत त्याला सांगितली व राजाला त्याच्या परिवारासह त्या सरोवराकडे आणण्याकरिता त्याच्याकडे एक दिव्य रत्‍नमाला मागितली. ती मिळताच तो त्या राजाच्या वाड्यासमोरच्या एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसला.

सूर्यकिरणे पडताच झगमगणारी ती रत्‍नमाला पाहून राजा तिच्याकडे लोभी नजरेनं टकमक बघू लागला. त्याने त्या वानराला विचारले, 'काय रे ही दिव्य रत्‍नमाला तुला कुठे मिळाली ? तू ती मला देतोस का?'

राजाचा हा प्रश्न ऐकून तो वानरप्रमुख मनात म्हणाला, 'स्वतःपाशी गडगंज संपत्ती असलेला हा राजा ! पण माझ्या अपेक्षेप्रमाणे याचाही जीव माझ्यापाशी असलेल्या माळेत गुंतलाच ! बाकी त्यात नवल ते काय ? लोभ किंवा हाव ही चीजच मोठी अजब आहे. म्हटलंच आहे ना ?-

इच्छति शती सहस्त्रं सहस्त्री लक्षमीहते ।

लक्षाधिपस्तस्था राज्यं राज्यस्थः स्वर्गमीहते ॥

(शंभराचा स्वामी असलेला हजारांची इच्छा धरतो. हजार असलेला लाखांची अभिलाषा बाळगतो. लक्षाधीशाला राज्य हवेसे वाटते आणी राजपदी असलेला मरणोत्तर स्वर्गाची इच्छा धरतो.)

'मनुष्य कितीही वृद्ध होवो, त्याचा लोभ किंवा तृष्णा क्षीण न होता, दिवसानुदिवस अधिकाधिक तरुणच होत जाते. म्हटलंच आहे -

जीर्यन्ते जीर्यतः केशा दन्ता जीर्यान्ति जीर्यतः ।

जीर्यतश्चक्षुषी श्रोत्रे तृष्णैका तरुणायते ॥

वृद्धत्वाने केस जीर्ण होतात, वृद्धत्वाने दातही कमकुवत होतात आणि डोळे व कानही क्षीण होतात. पण तृष्णा मात्र तरुण होत राहते.)

अशा तर्‍हेच्या विचारात मग्न झालेल्या त्या वानराला राजाने पुन्हा तोच प्रश्न विचारता तो म्हणाला, 'महाराज, या राजधानीबाहेरच्या वनात कुबेराने निर्माण केलेले एक सरोवर आहे. रविवारी सकाळी सूर्योदय होता होता, जो जो त्या सरोवरात बुडी घेतो, तो तो गळ्यात असली एक रत्‍नमाला घेऊनच बाहेर पडतो. तुम्ही उद्याच्या रविवारी माझ्या मागोमाग आलात, तर मी तुम्हाला ते सरोवर दाखवीन.'

दुसर्‍या दिवशी सकाळी राजा आपल्या सर्व परिवारासह त्या वानरामागोमाग त्या सरोवराकडे गेला. मग सूर्य उगवू लागल्याचे पाहून त्या वानराने राजाला वगळून इतर सर्वांना त्या सरोवरात उड्या घ्यायला सांगितले. त्याप्रमाणे राजाच्या राण्या, राजकुमार, आप्तेष्ट यांनी उड्या मारल्या. पण बराच वेळ झाला, तरी कुणीच बाहेर येत नाहीसे पाहून, राजाने त्या वानराला विचारले, 'काय रे, कुठे गेली ही मंडळी ?' वानर म्हणाला, 'तुम्ही माझ्या नातेवाईकांना चरबीसाठी मारून जिकडे पाठवून दिले, तिकडे गेली. त्या सर्वांना या सरोवरात राहणार्‍या एका राक्षसाने गिळंकृत केले आहे.'

दुःखाने व्याकूळ व संतप्त झालेल्या राजाने त्या वानराला विचारले, 'तुझे हे वागणे धर्माला सोडून नाही का?' यावर वानराने उत्तर दिले, 'नाही. कारण -

कृते प्रतिकृतिं कुर्यात् हिंसिते प्रतिहिंसितम् ।

न तत्र दोषं पश्यामि दुष्टे दुष्टं समाचरेत् ॥

(एखाद्या कृतीला तशाच प्रतिकृतीने, हिंसेला प्रतिहिंसेने आणि दुष्टपणाला उत्तर द्यावे, यात मला काहीच वावगे दिसत नाही. दुष्टांशी दुष्टपणानेच वागावे.

याप्रमाणे बोलून झाल्यावर ते वानर त्याच्या वाटेने, तर तो राजा त्याच्या मार्गाने निघून गेला.

ही गोष्ट सांगून सुवर्णसिद्धी म्हणाला, 'चक्रधरा, ज्या लोभाने त्या चंद्रराजाचे अपार नुकसान केले, त्या लोभानेच तू तुझ्या पाठीशी ही चक्राची उपाधी लावून घेतलीस. ठीक आहे. मी आता तुझा निरोप घेऊ का ? कारण एकतर मित्र या नात्याने मी तुला मदत करण्याचे कितीही जरी ठरविले, तरी मी तुला संकटमुक्त करू शकत नाही आणि दुसरे म्हणजे तुझा चेहेरा त्या अकाली राक्षसाला भ्यायलेल्या वानराप्रमाणे दिसत असल्याने, मला तो बघवतही नाही.' यावर हा 'अकाली राक्षस कोण?' असा प्रश्न चक्रधराने केला असता सुवर्णसिद्धी म्हणाला, 'ऐक-

'

पंचतंत्र

संकलित
Chapters
गोष्ट पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट चौथी गोष्ट पाचवी गोष्ट सहावी गोष्ट सातवी गोष्ट आठवी गोष्ट नववी गोष्ट दहावी गोष्ट अकरावी गोष्ट बारावी गोष्ट तेरावी गोष्ट चौदावी गोष्ट पंधरावी गोष्ट सोळावी गोष्ट सतरावी गोष्ट अठरावी गोष्ट एकोणिसावी गोष्ट वीसावी गोष्ट एकवीसावी गोष्ट बावीसावी गोष्ट तेवीसावी गोष्ट चोवीसावी गोष्ट पंचवीसावी गोष्ट सव्विसावी गोष्ट सत्ताविसावी गोष्ट अठ्ठावीसावी गोष्ट एकोणतीसावी गोष्ट तीसावी गोष्ट एकतिसावी गोष्ट बत्तिसावी गोष्ट तेहेतिसावी गोष्ट चौतिसावी गोष्ट पस्तिसावी गोष्ट छत्तिसावी गोष्ट सदोतिसावी गोष्ट अडतिसावी गोष्ट एकोणचाळीसावी गोष्ट चाळीसावी गोष्ट एकेचाळिसावी गोष्ट बेचाळिसावी गोष्ट त्रेचाळीसावी गोष्ट चव्वेचाळिसावी गोष्ट पंचेचाळिसावी गोष्ट सेहेचाळिसावी गोष्ट सत्तेचाळिसावी गोष्ट अठ्ठेचाळिसावी गोष्ट एकोणपन्नासावी गोष्ट पन्नासावी गोष्ट एक्कावन्नावी गोष्ट बावन्नावी गोष्ट त्रेपन्नावी गोष्ट चोपन्नावी गोष्ट पंचावन्नावी गोष्ट छप्पन्नावी गोष्ट सत्तावन्नावी गोष्ट अठ्ठावन्नावी गोष्ट एकोणसाठावी गोष्ट साठावी गोष्ट एकसष्ठावी गोष्ट बासष्ठावी गोष्ट त्रेसष्ठावी गोष्ट चौसष्ठावी गोष्ट पासष्ठावी गोष्ट सहासष्ठावी गोष्ट अडु्सष्ठावी गोष्ट एकोणसत्तरावी गोष्ट सत्तरावी गोष्ट एकाहत्तरावी गोष्ट बहात्तरावी गोष्ट त्र्याहत्तरावी