गोष्ट एकोणचाळीसावी
गोष्ट एकोणचाळीसावी
अतिथीला जो संतुष्ट करी, तोच खरा धन्य या संसारी.
अन्नाच्या शोधार्थ घरट्यातुन बाहेर पडलेल्या एका कबुतरीला एका पारध्याने जाळ्यात पकडले व तिला आपल्या हाती असलेल्या पिंजर्यात अडकविले. आता आणखी असेच काही पक्षी पकडून घरी जाण्याच्या विचारात तो पारधी असता, एकाएकी जोराची वावटाळ सुरू झाली व दिशान्दिशा धुळीने भरून गेल्या. तेव्हा जाळे, पिंजरा व काठी यांच्यासह तो एका डेरेदार वृक्षाखाली जाऊन बसला.
त्याच वेळी त्या वृक्षावर घरट्यात राहणारे एक कबूतर मोठ्याने आकांत करीत म्हणू लागले, 'हाय रे हाय ! माझी प्राणप्रिय पत्नी बाहेर गेली आणि नेमक्या ताच वेळी ही तुफानी वावटळ धिंगाणा घालू लागली ! देवा, जिच्यामुळे माझे जीवन सुखी व म्हणून धन्य झाले, त्या माझ्या प्राणप्रियेचे तू रक्षण कर. म्हटलंच आहे -पतिव्रता पतिप्राणा पत्युः प्रियहिते रता ।
यस्य स्यादीदृशी भार्या धन्यः स पुरुषो भुवि ॥
(पतिव्रता ही जणू तिच्या पतीचा प्राण असून, ती पतीला प्रिय व हितकारक अशा गोष्टी करण्यातच दंग असते, अशी महती ज्याला लाभली, तो पुरुष या भूलोकी धन्य होय.)
शिवाय -
न गृहं गृहमित्याहुर्गृहिणी गृहमुच्यते ।
गृहं हि गृहिणीहीनमरण्यसदृशं मतम् ॥
(नुसते घर हे 'घर' नसून, गृहिणी हेच खरे घर मानले जाते. गृहिणीशिवाय जे घर, ते अरण्यवत समजावे.)
आपला पती आपल्या विरहाने व्याकूळ होऊन शोक करीत आहे व आपले गुणगान गात आहेसे ऐकून वास्तविक तशाही स्थितीत त्या कबुतरीला समाधान वाटले. पण त्याच वेळी ती मनात म्हणाली, 'तसं पाहता माझ्या पतीनं माझं एवढं गुणगान का बरं करावं ? पतीच्या सुखदुःखाशी समरस होणं हे जे पतिव्रतेचं कर्तव्य, तेच मी करीत आले ना? कारण म्हटलंच आहे -
न सा स्त्रीत्यभिमन्तव्या यस्यां भर्ता न तुष्यति ।
तुष्टे भर्तरि नारीणां तुष्टाः स्युः सर्वदेवताः ॥
(जिच्यावर तिचा पती संतुष्ट नसतो, तिला 'स्त्री' म्हणू नये. ज्या स्त्रियांवर त्यांचे पती संतुष्ट असतात, त्यांच्यावर सर्व देवता संतुष्ट होतात.)
शिवाय -
मितं ददाति हि पिता मितं भ्राता मितं सुतः ।
अमितस्य हि दातारं भर्तारं का न पूजयेत् ॥
(पिता जे देतो त्याला मर्यादा असते, त्याचप्रमाणे भाऊ किंवा मुलगा हेही मर्यादेतच देतात. मग अमर्याद देणार्या पतीला पूजनीय का मानू नये ?)
त्या कबुतरीच्या मनात अशा तर्हेचे विचार चालू असतानाच, थंड हेवेने गारठून गेलेला पण पोटात मात्र भुकेचा वणवा भडकलेला तो पारधी मोठ्याने म्हणाला, 'आता वावटळीचा जोर काहीसा ओसरला असला, तरी दशदिशा अंधारून गेल्या असल्याने, मला घराची वाट दिसेनाशी झाली आहे. अशा स्थितीत माझी थंडी व भूक कुणी नाहीशी करील का ?'
पारध्याने केलेली ती याचना ऐकून, त्याच्याजवळ असलेल्या पिंजर्यातील कबुतरी झाडावरील आपल्या पतीला उद्देशून मोठ्याने म्हणाली, 'नाथ ! जरी या पारध्याने मला जाळ्यात पकडून पिंजर्यात अडकवून ठेवले असले, तरी मला त्याचे दुःख होत नाही. कारण आपले माझ्यावरचे प्रेम पाहून मला माझे जीवन धन्य झाल्यासारखे वाटत आहे. आता एकच करा, हा पारधी जरी आपला शत्रू असला तरी, आता तो याचक म्हणून आपल्या घरट्यापुढे आला आहे. तेव्हा त्याच्या इच्छेनुसार त्याची थंडी वा भूक नाहीशी करून, त्याला तृप्त करा. कारण म्हटलंच आहे-
यः सायमतिथिं प्राप्तं यथाशक्ति न पूजयेत् ।
तस्यासौ दुष्कृत दत्त्वा सुकृतं चापकर्षति ॥
(अतिथी आला असता जो त्याचा यथाशक्ती सन्मान करीत नाही, त्याला तो अतिथी आपले पाप देऊन व त्याचे पुण्य घेऊन जात असतो.)
आपल्या पत्नीला मारून खाण्यासाठी, तिला पिंजर्यात अडकवून ठेवणार्या त्या पारध्याचा राग आला असूनही, त्या कबुतराने त्याला सुका पाचोळा गोळा करायला सांगितला आणि स्वतः कुठून तरी विस्तव आणून तो त्या पाचोळ्याच्या राशीवर टाकला. मग त्या शेकोटीपाशी बसून पारधी शेक घेऊ लागताच ते कबूतर त्याला म्हणाले, 'हे पारध्या, मी तुझी एक इच्छा पूर्ण केली. मात्र तुझी भूक भागविण्यासाठी मजपाशी अन्न वा धान्य नसल्याने, मी स्वतःच या शेकोटीत उडी घेतो. मी पुरेसा भाजून निघालो की, तू मला बाहेर काढून खा.' असे म्हणून त्या कबुतराने त्या शेकोटीत उडी घेतली.
त्या कबुतराचा तो असीम त्याग पाहून, तो पारधी मनात म्हणाला, 'दुसर्याची भूक भागविण्यासाठी स्वतःचे प्राण देणारे हे कबुतर कुठे, आणि स्वतःची भूक भागविण्यासाठी निरपराध प्राण्यांचे जीव घेणारा महानीच असा मी कुठे ? त्याला आतापर्यंतच्या आपल्या जीवनाचा उबग आला. त्याने पश्चात्तापदग्ध मनाने त्या कबुतरीला ताबडतोब आपल्या पिंजर्यातून मुक्त केले. त्याबरोबर शेकोटीत होरपळत निघत असलेल्या पतीकडे बघत ती म्हणाली, 'नाथ, मजवर प्राणांपलीकडे प्रेम करणारे आपण निघून गेल्यावर, मी या जगात एकटी कशी काय जगू ?' असे म्हणून तिनेही त्या धगधगत्या शेकोटीत उडी घेतली. या दोघांचा आपल्यामुळे अंत झाला, या कल्पनेने तो पारधी एवढा दुःखी झाला की, त्यानेही त्या अग्निकुंडात उडी घेऊन आपल्या जीवनाचा अंत करून घेतला.
ही गोष्ट सांगून मंत्री क्रूराक्ष राजा अरिमर्दनाला म्हणाला, 'महाराज, शरणागताला आश्रय देणे ही थोरांची परंपरा असल्याने, त्या स्थिरजीवीला मारण्याऐवजी आश्रय देणेच योग्य ठरेल.'
यानंतर अरिमर्दनाने तिसरा मंत्री दीप्ताक्ष याला तोच प्रश्न विचारला असता तो म्हणाला, 'महाराज, त्या वृद्ध वाण्याने चोराच्या बाबतीतसुद्धा औदार्य दाखविले, मग आपला होऊ इच्छिणार्या या स्थिरजीवीला जीवदान देण्यात वावगे ते काय ?' यावर 'ती वाण्याची गोष्ट काय आहे,' अशी पृच्छा राजा अरिमर्दनाने केली असता दीप्ताक्ष म्हणाला, 'ऐका महाराज-