गोष्ट सातवी
गोष्ट सातवी
'पापे पचली,' असे दिसते, पण त्यांचे फळ भोगावेच लागते.
एका वनातील सरोवराकाठच्या वृक्षावर एक बगळा राहात असे. तो त्या सरोवरातले मासे, बेडूक आदि पकडून, त्यावर आपली उपजीविका करी. पुढे वाढत्या वयाबरोबर, मासे पकडण्याकरिता आवश्यक अशी चपळता अंगी न उरल्याने, त्याची उपासमार होऊ लागली. त्यामुळे एके दिवशी तो मुद्दाम त्या सरोवराकाठी अश्रू ढाळीत बसला.
त्याला रडताना पाहून एका खेकड्याने पुरेशा अंतरावरून त्याच्या दुःखाचे कारण विचारले असता, तो कपटी बगळा खोटेच म्हणाला, 'काय सांगू खेकडोजी, एक तर आजवर या सरोवरातल्या निरपराध माशांना मारून खाल्ल्याबद्दल मला दुःख झालं आहे आणि दुसरं म्हणजे लवकरच बारा वर्षे टिकणार्या एका भयंकर दुष्काळाला सुरुवात होणार असून, त्यात या सरोवरातले सर्व प्राणी आटून जाऊन, तुम्हा सर्वांवर तडफडून मरण्याचा प्रसंग येणार आहे, असे भविष्य काल एका ज्योतिषाने मला सांगितल्यापासून तर, माझ्या मूळच्या दुःखात भर पडली आहे. त्यामुळे मला एकूण जीवनाचा वीट आला असून, मी आमरण उपोषण करून याच ठिकाणी माझा देहांत करून घ्यायचा ठरविले आहे.'
त्या बगळ्याच्या तोंडून ही भविष्यवाणी ऐकताच त्या खेकड्याने ती गोष्ट त्या सरोवरातल्या जलचरांच्या कानी घातली. त्याबरोबर ते सर्व काठावर आले व त्या बगळ्याला विनवू लागले, 'बगळूमामा, असा स्वतःचा घात करून कशाला घेता ? त्यापेक्षा तुम्ही आम्हाला वाचविण्याचा एखादा उपाय शोधून काढा आणि आम्हाला वाचवून तुम्हीही जिवंत रहा.'
बगळा म्हणाला, 'एक उपाय आहे, पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मला फार त्रास घ्यावा लागणार आहे. इथून काही अंतरावर जे एक अत्यंत खोल व विस्तीर्ण असे सरोवर आहे, त्यातले पाणी कुठल्याही दुष्काळात पूर्णपणे आटून जाणे शक्य नसल्याने, त्या सरोवरात तुमच्यापैकी एकेकाला नेऊन सोडायचे. त्यामुळे मला जरी त्रास घ्यावा लागणार असला, तरी तुमचे प्राण वाचतील आणि त्यायोगे माझी सर्व पापे धुवून जातील.'
'मग बगळूमामा, आतापासूनच या कामाला सुरुवात करा. देव तुमचं भलं करील.' असं त्या सरोवरातले मासे वगैरे म्हणताच, त्या कपटी बगळ्याने एकेका माशाला चोचीने उचलून दूर न्यावे व तिथे असलेल्या एका खडकावर त्याला आपटून मारून खावे, असे संहारसत्र सुरू केले. त्या सरोवरातल्या माशांना 'दूरच्या सरोवरात नेऊन सोडलेले तुमचे भाईबंद मोठ्या मजेत आहेत.' असे तो बगळा अधुनमधून सांगू लागल्याने, त्याचे हे कपटनाट्य सुरळीतपणे चालू राहिले.
पण एके दिवशी त्या खेकड्याला त्या बगळ्याबद्दल संशय आला. तो मनात म्हणाला, 'चोचीत मासे नेऊन नेऊन हा बगळा थकून जाण्याऐवजी, याची प्रक्रुती सुधारत आहे, हे कसे काय?' तो त्या बगळ्याला म्हणाला, 'बगळूमामा, वास्तविक त्या दिवशी मीच प्रथम तुमची प्रेमाने चौकशी केली. असे असता तुम्ही मला मात्र अजूनही त्या सुरक्षित सरोवरात का नेत नाही?'
बगळ्याला खेकड्याचे मांस खाण्याचा मोह अनावर झाला व तो त्याला पाठीवर घेऊन जाऊ लागला. पण तो खडक जवळ येताच जेव्हा त्या खेकड्याला माशांच्या काट्यांची व हाडांची मोठी रास दिसली, तेव्हा मनीचा संशय बळावून त्याने चौकशी केली, 'बगळेदादा, त्या खडकापाशी माशांच्या काट्यांची व हाडांची रास कशी काय हो जमा झाली?'
'पाण्यातला हा प्राणी आपल्याला हवेत काय इजा करणार?' अशा घमेंडीत तो बगळा त्या खेकड्याला म्हणाला, 'अरे मूर्खा ! कुठला आलाय दुष्काळ आणि कुठले आलेय ते न आटणारे सरोवर ? तुम्हा मूर्ख जलचरांना मी केवळ त्या थापा मारल्या. तुमच्या त्या तळ्यातून आजवर ज्या ज्या माशाला मी इकडे आणले, त्याला त्याला मी त्या खडकावर आपटून खाऊन टाकले. त्यांच्याच हाडाकाट्यांची ही रास आहे. तुझीही अखेरची घटका जवळ आली आहे. वाटल्यास मरणापूर्वी तू आपल्या कुलदेवतेचं स्मरण कर.'
बगळ्याचे कपट असे उघड होताच, त्या खेकड्याने आपल्या नांग्यांच्या कैचीने पटकन् त्याची मान मुरगळून त्याचे मस्तक धडावेगळे केले व केवळ आपल्यावरचेच नव्हे, तर त्या सरोवरात उरलेल्या सर्व जलचर प्राण्यांच्या प्राणांवरचेही संकट दूर केले.'
ही गोष्ट त्या कावळा-कावळीला सांगून तो कोल्हा त्यांना म्हणाला, 'हे पहा, इथून पूर्व दिशेला सरोवर आहे ना... त्यात जलक्रीडा करण्याकरिता राजा, प्रधान किंवा त्यांच्या घरच्या स्त्रिया दररोज येतात व जलविहार करण्यासाठी सरोवरात शिरण्यापूर्वी आपापल्या गळ्यांतले रत्नामोत्यांचे कंठे वा सुवर्णमाला काठावर ठेवून देतात. तुम्ही उद्या त्या सरोवराकाठी जा आणि काठावर ठेवून दिलेल्या अशा माळांपैकी एखादी माळ चोचीने उचलून व हळूहळू उडून, ती माळ तुम्ही त्या दुष्ट सर्पाच्या ढोलीत टाका म्हणजे तुम्हाला हवी असलेली गोष्ट होऊन जाईल.'
दुसर्या दिवशी सकाळी तो कावळा व कावळी त्या सरोवराकडे गेली असता, त्यांना प्रत्यक्ष राणी व राजघराण्यातल्या इतर काही स्त्रिया गळ्यांतले रत्नहार व सोनसाखळ्या काठावर ठेवून सरोवरात जलविहार करीत असलेल्या दिसल्या. कावळीने झडप घालून त्यातली एक सोनसाखळी चोचीने उचलली व ती त्या कावळ्यासह त्या वडाच्या दिशेने मुद्दाम हळूहळू उडू लागली. त्याबरोबर त्या स्त्रियांसंगे आलेली सेवकमंडळी त्या दोघांच्या पाठोपाठ धावू लागली. शेवटी त्या कावळीने ती सोनसाखळी त्या वटवृक्षाच्या ढोलीत टाकली व पतीसह एका जवळच्या झाडावर जाऊन बसली. तेवढ्यात राणीच्या सेवकांनी त्या ढोलीत डोकावून पाहिले असता, त्यांच्या दृष्टीने तो काळा सर्प पडला. त्यांनी त्याला काठ्या व दगड यांचा वापर करून ठार केला. तो मारला गेल्यामुळे ते कावळ्याचे जोडपे सुखी झाले.'
ही गोष्ट सांगून दमनक करटकाला म्हणाला, 'दादा-
बुद्धिर्यस्य बलं तस्य निर्बुद्धेस्तु कुतो बलम् ।
(ज्याला बुद्धी असते त्याचाच प्रभाव पडतो, ज्याला बुद्धी नाही त्याच्यात कुठून 'दम असणार ?)
'असं जे म्हटलं जातं ते खरं आहे.'
'अरे दमनका, समजा, तुला पुरेपूर बुद्धी असली तरी तिच्या जोरावर तू पिंगलक महाराज व संजीवक या जीवश्चकंठश्च मित्रांमध्ये फूट कशी काय पाडू शकणार?'
करटकाने हा प्रश्न केला असता दमनक आत्मविश्वासाने म्हणाला, 'दादा, अरे एक दुर्बळ ससा जर बुद्धीच्या सामर्थ्यावर एका सिंहाचा जीव घेऊ शकतो, तर तशाच बुद्धीच्या सामर्थ्यावर पिंगलकमहाराज व संजीवक यांच्यात मला फूट पाडता का येऊ नये?'
'ती गोष्ट काय आहे?' असे करटकाने विचारताच दमनक म्हणाला, 'ती गोष्ट अशी आहे-