Get it on Google Play
Download on the App Store

गोष्ट चौथी

गोष्ट चौथी

क्षुद्र पेटता सूडाला, भारी पडे समर्थाला !

वर्धमान नावाच्या नगरीत दंतिल नावाचा एक श्रीमंत सावकार राहात होता. त्याच्या प्रेमळ व परोपकारी स्वभावामुळे, त्याला प्रजा व राजा या दोघांतही मानाचे स्थान होते. एकदा दंतिलाने त्याच्या घरी असलेल्या लग्नाच्या निमित्ताने, जसे इतर लोकांना भोजनाचे निमंत्रण केले, तसेच त्याने राजालाही त्याच्या परिवारासह जेवायला बोलावले.

ठरलेल्या दिवशी व वेळी राजा, राणी, त्यांचे खास अधिकारी, त्याचप्रमाणे दासदासी अशी सर्व मंडळी, त्या सावकाराकडे आली व त्याचे स्वागत स्वीकारून, त्यांच्यासाठी खास राखून ठेवलेल्या वेगवेगळ्या दालनांतील पानांवर आपापल्या दर्जाप्रमाणे बसू लागली. त्यांच्यात राजाचा गोरंभ नावाचा एक हुजर्‍या होता. तो राजा व राजघराण्यातील माणसे यांच्यासाठी वाढून ठेवलेल्या पानांपैकी, एका पानावर बसू लागला होता, दंतिलाने त्याला तिथून हुसकून लावले. या अपमानाने तो हुजर्‍या रागावून निघून गेला.

गोरंभ राजवाड्यावर निघून गेला खरा, पण त्याला चैन पडेना. तो मनात म्हणाला, 'मी एक यकःश्चित्त नोकर. त्या दंतिलशेटने माझ्या केलेल्या अपमानाचा सूड मी कसा काय घेऊ शकणार ? चूलखंडावरच्या कढईत भाजून निघणार्‍या हरभर्‍यांनी रागाच्या भरात कितीही जरी फडफडाट केला, तरी त्यामुळे कढई कधी फुटते का ? त्याचप्रमाणे दुर्बलांनी अपमानाचे कडू घोट निमूटपणे गिळायचे असतात.' पण या विचाराने त्याची समजूत पटेना. अखेर त्याला एक युक्ती सुचली.

दोन-तीन दिवसानंतरच्या एका सकाळी, तो राजाच्या शयनमहालाच्या दरवाजाबाहेर बसला होता. राजा आता अर्धवट जागा झाला असून, तो पलंगावरून उठण्याची हालचाल करीत आहे, अशी त्याला चाहूल लागली. तोच राजाला ऐकू जाईल अशा स्वरात तो मुद्दाम म्हणाला, 'कमाल आहे त्या दंतिलशेठची ! आपण महाराजांचे सच्चे मित्र आहोत असे वरपांगी त्यांना भासवतो, पण राजवाड्यात येऊन मात्र संधी सापडताच राणीसाहेबांना आलिंगने देतो. आणि अशा त्या कपटी दंतिलाला महाराजांनी मान द्यावा ?'

गोरंभाच्या तोंडची ही वाक्ये ऐकून राजा रागानं लालबुंद होऊन पलंगावरून उठला व गोरंभाला म्हणाला, 'काय रे, तो कपटी दंतिलशेठ राजवाड्यात येऊन राणीसाहेबांना खरोखरच आलिंगने देतो काय? अरे गप्प का राहिलास ? तूच तर नुकतंच तसं म्हणालास ना?'

मनात ठरवून ठेवल्याप्रमाणे गोरंभाने उत्तर दिले, 'महाराज, असं कसं होईल ? काल रात्री मी बर्‍याच उशिरापर्यंत द्यूत खेळत बसलो होतो. त्यामुळे पहारा करता करता जरासा पेंगलो व त्या झोपेत भलतेच बोलून गेलो.'

पण गोरंभाच्या या खुलाशाने राजाचे समाधान झाले नाही. त्याला सारखे वाटू लागले, गोरंभाने ही गोष्ट प्रत्यक्ष पाहिली असावी व जागेपणी जे दिसते ते झोपेत तोंडावाटे बाहेर पडते, या नियमानुसार त्याच्या तोंडातून ती गोष्ट बाहेर पडली असावी. राजाच्या मनाने असे घेतले व म्हणून त्याने दंतिलाला राजवाड्यात प्रवेश न करू देण्याचे द्वारपालांना फर्मान सोडले.

दंतिलाला या गोष्टीची कल्पना नव्हती. तो नेहमीप्रमाणे राजाच्या भेटीसाठी राजवाड्यावर गेला असता, द्वारपालांनी त्याला अडविले. 'महाराजांचा माझ्यावर असा कोप का बरं झाला?' असा प्रश्न दंतिलाने त्या द्वारपालांना विचारला असता, जवळच उभा असलेला गोरंभ म्हणाला, 'दंतिलशेट, करावे तसे भरावे. त्या दिवशी तुम्ही मला तुमच्या घरी जेवायला आलो असता, पानावरून उठवून हुसकून लावले होते ना? आज महाराजांनी तुम्हाला हुसकावून देण्याचा हुकूम आम्हा सेवकांना सोडला आहे.'

हे उत्तर ऐकून दंतिलशेट खिन्न मनाने घरी परतला. राजाचे कान त्या गोरंभानेच फुंकले असले पाहिजेत, हे त्याने ओळखले. मग त्याला आपल्या घरी बोलावून व मनाविरुद्ध का होईना, त्याला बर्‍याच सुवर्णमोहरा व उंची वस्त्रे देऊन त्याने त्याची समजूत घातली व विचारले, 'गोरंभा, आता तरी तुझा राग गेला ना?' यावर गोरंभ म्हणाला, 'शेट, माझा राग तर गेलाच, पण चार-दोन दिवसांत राजेसाहेबांचाही तुमच्यावरचा राग दूर होईल असे मी करतो व त्यांचे -तुमचे स्नेहसंबंध पूर्ववत् जोडून देतो.'

त्याप्रमाणे दुसर्‍याच दिवशी सकाळी, राजा अर्धवट जागा झाल्याची चाहूल लागताच, त्याच्या शयनमहलाबाहेर बसलेला गोरंभ त्याला ऐकू जाईल अशा स्वरात मुद्दाम म्हणाला, 'आमचे महाराज एवढ्या मोठ्या राजवाड्यात राहतात, पण काकड्या मात्र शौचकूपात शौचाला बसल्याबसल्या खातात !'

गोरंभाच्या तोंडचे ते शब्द ऐकून राजा पलंगावरून ताडकन् उठला व त्याला विचारू लागला, काय रे मूर्खा ! मी शौचकूपात जाऊन काकड्या खात बसतो काय ? तू मला तसे खाताना कधी रे पाहिलेस ?'

'छे, छे ! असं कसं होईल ? कोण हरामखोर असं बोलला ? गोरंभाने प्रश्न केला. राजा म्हणाला, अरे, तूच तर आत्ता तसं बोललास. तू माझा जुना नोकर आहेस, म्हणून तुला क्षमा केली. तुझ्या जागी जर दुसरा कोणी असता, तर त्याला मी यमलोकीच रवाना केले असते.'

मुद्दाम गयावया करीत गोरंभ म्हणाला, 'महाराज, काल रात्री पण मी बराच उशीरापर्यंत द्यूत खेळलो आणि थोडीशी झोप घेऊन, पहाट होताच इकडे आलो. म्हणून मला इथे बसलो असता थोडीशी डुलकी लागली आणि जी गोष्ट कधी घडलीच नही, ती माझ्या तोंडावाटे बाहेर पडली.' गोरंभाने केलेला हा खुलासा ऐकून राजा मनात म्हणाला, 'आपल्या राणीबद्दल व दंतिलाबद्दलही हा मूर्ख असेच बिनबुडाचे बरळला असावा.' अशी समजूत पटताच राजाने दंतिलाला बोलवायला सेवक पाठविला आणि तो आल्यावर आदल्या दिवशी केलेल्या त्याच्या अपमानाबद्दल खेद व्यक्त केला.

ही गोष्ट सांगून दमनक संजीवकाला म्हणाला, 'मित्रा, तेव्हा पिंगलकमहाराजांशी मैत्री जुळून येताच, गर्वाने फुगून जाऊ नकोस, थोरामोठ्यांशी जसा वागशील, तसाच तू माझ्यापाशीही सौजन्याने वाग, म्हणजे तुझे पुढले आयुष्य सुखात जाईल.' संजीवकाने तसे वचन देताच, दमनक त्याला घेऊन पिंगलकाकडे गेला.

वनराज पिंगलकाशी दृष्टादृष्ट होताच, संजीवकाने त्याला नम्रतापूर्वक वंदन केले, तर पिंगलकाने त्याला अभय देऊन त्याचे क्षेम विचारले. मग त्यांच्या भेटीचे रूपांतर दाट मैत्रीत झाले. संजीवकाचं एकदम सात्त्विक वागणं, त्याचा गवतपाल्यासारखा अहिंसक आहार वगैरेचा पिंगलकावर फार प्रभाव पडला. आपल्या वनराज्याचा सर्व कारभार दमनक व त्याचा मोठा भाऊ करटक यांच्यावर सोपवून, पिंगलक हा दिवसातला एवढा वेळ त्या बुद्धिवान व बहुश्रुत अशा संजीवकाशी निरनिराळ्या विषयांवर चर्चा करण्यात घालवू लागला की, त्यामुळे प्रत्यक्ष दमनक व करटक यांनाही पिंगलकाची भेट मिळणे कठीण होऊ लागले.

संजीवकाच्या विचारांच्या प्रभावामुळे पिंगलकाने वन्य पशूंची शिकार करणे व खाणे सोडून दिले. त्यामुळे त्याच्या मांसाहारी मंत्र्यांना आणि सेवकांना उपवास घडू लागले व ते एकामागून एक याप्रमाणे त्याला सोडून जाऊ लागले. म्हटलंच आहे ना ?

फलहीनं नृपं भृत्याः कुलीनमपि चोन्नतम् ।

सन्त्यज्यन्यत्र गच्छन्ति शुष्कं वृक्षामिवाण्डजाः ॥

(वठलेल्या वृक्षाचा त्याग करून, ज्याप्रमाणे पक्षी इतरत्र निघून जातात, त्याचप्रमाणे सेवेचा मोबदला न देणारा राजा कितीही जरी कुलीन व उच्च दर्जाचा असला तरी त्याचे सेवक त्याला सोडून जातात.)

याउलट

कालातिक्रमणं वृत्तेर्यो न कुर्वीत भूपतिः ।

कदाचित्तं न मुञ्चन्ति भर्त्सिता अपि सेवकाः ॥

(जो राजा वेतन देण्यात कधी उशीर करीत नाही, त्याने आपल्या सेवकांचा जरी अपमान केला, तरी ते त्याला कधीही सोडून जात नाहीत.)

हे सगळे जगच मुळी पोटावर चालले आहे. ते पोट भरण्यासाठी बर्‍याप्रमाणे वाईट मार्गांचाही अवलंब केला जातो. समुद्रातले मोठे मासे लहान माशांना खातात, वैद्य रोग्यांना लुबाडतात, व्यापारी गिर्‍हाइकांची लूट करतात, राजे प्रजेची पिळवणूक करतात, चोर निष्काळजी लोकांच्या घरी चोर्‍या करून स्वतःचे पोट भरतात, तर भिक्षुक भोळ्याभाळ्या लोकांना नाना व्रतवैकल्यांत गुंतवून आपली तुंबडी भरतात. अर्थात सर्वत्र केवळ स्वार्थच बोकाळला आहे असे मात्र नाही, आणि स्वार्थी लोकांचे सर्वत्र मनोरथ फलद्रूप होतात असेही नाही. म्हटलंच आहे ना?

सर्पाणां च खलानां च परद्रव्यापहारिणाम् ।

अभिप्राया न सिद्धयन्ति तेनेदं वर्तते जगत् ॥

(सर्पांचे, दुष्टांचे व दुसर्‍यांचे द्रव्य लुबाडणार्‍यांचे सर्वच बेत सिद्धीस जात नाहीत, म्हणून तर हे जग बरेचसे सुरळीत चालले आहे.)

एके दिवशी भुकेने व्याकुळ झालेले दमनक करटकाला म्हणाला, 'दादा, पिंगलकमहाराज हे आताशा संजीवकाच्या एवढे भजनी लागले आहेत की, आपल्या मंत्रिपदांना अर्थ उरला नाही. त्यांचे आश्रितही त्यांना एकामागून एक असे सोडून चालले आहेत.'

करटक म्हणाला, 'दमनका, उन्मत्त राजे व मदोन्मत्त हत्ती हे स्वतःहून जरी चुकीच्या मार्गाने जाऊ लागले, तरी त्यांच्या तशा वागण्याच्या दोषाचे खापर अनुक्रमे मंत्री व माहूत यांच्याच माथी फुटत असते. म्हणून मी तुला अगोदरच परोपरीने सांगितले होते की, तू संजीवक व पिंगलकमहाराज यांची मैत्री घडवून आणू नकोस. पण तू माझे ऐकले नाहीस. तेव्हा आता त्यांच्याविरुद्ध धुसफुसण्यात काय अर्थ?'

दमनक म्हणाला, 'दादा, मी काही नुसता धुसफुसत राहिलो नाही. जशी मी त्यांची मैत्री जुळवून आणली, तशी मी त्यांच्या मैत्रीत फूटही पाडू शकतो.'

करटक म्हणाला, 'दमनका, अरे, असले भलतेच धाडस तू करू नकोस. तू त्यांच्या मैत्रीत फूट पाडू पाहात आहेस, हे नुसते त्या पिंगलकमहाराजांना जरी कळले, तरी आपल्या दोघांची गत काय होईल याची तुला कल्पना आहे ना?'

दमनकाने उत्तर दिले, 'माझे हे कारस्थान मी फुटू कसे देईन? अरे, मी हे धाडस करीत आहे हे मलाही मान्य आहे, पण असे धाडस केले म्हणूनच एका तरुण विणकराला सुस्वरूप राजकन्या मिळवता आली ना?'

'ती कशी काय ?' असा प्रश्न करटकाने केला असता दमनक म्हणाला, 'ऐक-

पंचतंत्र

संकलित
Chapters
गोष्ट पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट चौथी गोष्ट पाचवी गोष्ट सहावी गोष्ट सातवी गोष्ट आठवी गोष्ट नववी गोष्ट दहावी गोष्ट अकरावी गोष्ट बारावी गोष्ट तेरावी गोष्ट चौदावी गोष्ट पंधरावी गोष्ट सोळावी गोष्ट सतरावी गोष्ट अठरावी गोष्ट एकोणिसावी गोष्ट वीसावी गोष्ट एकवीसावी गोष्ट बावीसावी गोष्ट तेवीसावी गोष्ट चोवीसावी गोष्ट पंचवीसावी गोष्ट सव्विसावी गोष्ट सत्ताविसावी गोष्ट अठ्ठावीसावी गोष्ट एकोणतीसावी गोष्ट तीसावी गोष्ट एकतिसावी गोष्ट बत्तिसावी गोष्ट तेहेतिसावी गोष्ट चौतिसावी गोष्ट पस्तिसावी गोष्ट छत्तिसावी गोष्ट सदोतिसावी गोष्ट अडतिसावी गोष्ट एकोणचाळीसावी गोष्ट चाळीसावी गोष्ट एकेचाळिसावी गोष्ट बेचाळिसावी गोष्ट त्रेचाळीसावी गोष्ट चव्वेचाळिसावी गोष्ट पंचेचाळिसावी गोष्ट सेहेचाळिसावी गोष्ट सत्तेचाळिसावी गोष्ट अठ्ठेचाळिसावी गोष्ट एकोणपन्नासावी गोष्ट पन्नासावी गोष्ट एक्कावन्नावी गोष्ट बावन्नावी गोष्ट त्रेपन्नावी गोष्ट चोपन्नावी गोष्ट पंचावन्नावी गोष्ट छप्पन्नावी गोष्ट सत्तावन्नावी गोष्ट अठ्ठावन्नावी गोष्ट एकोणसाठावी गोष्ट साठावी गोष्ट एकसष्ठावी गोष्ट बासष्ठावी गोष्ट त्रेसष्ठावी गोष्ट चौसष्ठावी गोष्ट पासष्ठावी गोष्ट सहासष्ठावी गोष्ट अडु्सष्ठावी गोष्ट एकोणसत्तरावी गोष्ट सत्तरावी गोष्ट एकाहत्तरावी गोष्ट बहात्तरावी गोष्ट त्र्याहत्तरावी