गोष्ट सत्तेचाळिसावी
गोष्ट सत्तेचाळिसावी
वाट्टेल ते सोंग घ्यावे, पण दुष्टांना निपटून काढावे.
एका गावी राहणार्या 'यज्ञदत्त' नावाच्या ब्राह्मणाची बायको दुराचारी होती. ती स्वतःच्या नवर्याला अगदी साधे अन्न खायला घाली आणि उत्तमोत्तम पक्वान्ने करून, स्वतः मात्र, गावाबाहेरच्या देवीच्या देवळात नेऊन तिथे भेटणार्या आपल्या प्रियकराला खाऊ घाली. त्यामुळे यज्ञदत्ताची प्रकृती खालावू लागली. परंतु एके दिवशी त्याला बायकोच्या चालचलणूकीची माहिती मिळाली.
मग दुसर्याच दिवशी, बायकोच्या नकळत तो त्या देवळात गेला व देवीच्या मूर्तीआड दडून बसला. थोड्याच वेळात पक्वान्नाने भरलेल्या ताटासह, त्याची बायको त्या देवळात आली व त्याचा नैवेद्य दाखवून म्हणाली, 'देवी, माझ्या प्रियकराला माझ्या घरी राजरोस येता यावे, म्हणून माझ्या नवर्याला आंधळा कर.'
देवीच्या मूर्तीआड दडलेला यज्ञदत्त बायकी आवाजात म्हणाला, 'हे माझ्या भक्तिणी, तू तुझ्या नवर्याला दररोज भरपूर तूप व तुपातले पदार्थ खायला घाल म्हणजे थोड्याच दिवसांत तो आंधळा होईल.' देवीचीच ही वाणी आहेसे वाटून त्या कुलटेला अतिशय आनंद झाला. त्या आनंदात ती प्रियकराची वाट पाहू लागली असता, यज्ञदत्त लपत छपत परस्पर मागल्या बाजूने निघून गेला व दुरून त्या देवळाकडे बघू लागला. थोड्याच वेळात त्या बाईचा प्रियकर आला आणि तिने दिलेले पक्वान्न खाऊन व तिच्याशी गुजगोष्टी करून निघून गेला.
नवरा लवकरात लवकर आंधळा व्हावा, म्हणून ती बाई, त्याला भरपूर तूप व तुपातले पदार्थ खायला घालू लागली. त्यामुळे त्याची प्रकृती सुधारू लागली. पण त्याचबरोबर त्याने 'आपल्याला कमी दिसू लागले आहे,' अशी खोटीच कुरबूर सुरू केली. त्यामुळे 'देव'च्या सांगण्यावार तिची श्रद्धा जडली. असा एक महिना निघून गेला आणि एके दिवशी सकाळी अंथरुणातून उठता उठताच यज्ञदत्त खोटेच ओरडला, 'अगं, मला बिलकूल दिसत नाही !'
आता आपला नवरा पूर्ण आंधळा झाला, असे वाटून त्या निर्लज्ज बाईने आपल्या प्रियकराला घरी बोलावले व त्याच्याशी प्रेमाचे चाळे सुरू केले. ती दोघे त्यात रमली असता, आता केवळ डोळसच नव्हे, तर दणकट झालेल्या यज्ञदत्ताने, हाती काठी घेऊन त्या बायकोच्या प्रियकराला मरेमरेसे मारले आणि बायकोचे नाक कापून तिला घरातून हाकलून दिले.
ही गोष्ट आपल्या मित्राला सांगून मंदवीष सर्प पुढे म्हणाला, 'बाबा रे, ब्राह्मणाच्या मुलाला चावल्यामुळे त्याच्या बापाने मला शाप दिला, वगैरेसारखी थाप मारून, मी जो बेडकांच्या राजाला व त्याच्या मंत्र्यांना पाठीवरून फिरवतो आहे, ते मला दररोज पोटीपोटभर बेडुक खायला मिळावे म्हणून. अद्यापपर्यंत लहान बेडूक तर मी खाऊन संपविले. आता मोठ्यांना खात आहे. माझी तब्येत आणखी सुधारली की, मी त्या राजालाही त्याच्या मंत्र्यांसकट खाऊन टाकीन.' आणि मंदवीष जसे म्हणाला, तसेच त्याने पुढे केले.
या गोष्टी राजा मेघवर्णाला सांगून स्थिरजीवी त्याला म्हणाला, 'महाराज, काम साधण्यासाठी शत्रूला डोक्यावर घ्यावे, पण काम साधले जाताच त्याला नाहीसे करावे. युद्धे जिंकण्यासाठी शस्त्रांपेक्षाही बर्याच वेळा युक्ती व बुद्धी उपयोगी पडतात.'
स्थिरजीवीचे हे विचार ऐकून राजा मेघवर्ण म्हणाला, 'काका, तुमचे किती गुणगान गाऊ? बाकी तुम्ही हाती घेतलेलं काम तडीस नेणार याबद्दल मलाही खात्री होती. कारण म्हटलंच आहे,
प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः
प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्याः ।
विघ्नैः सहस्त्रगुणितैरपि हन्यमानाः
प्रारब्धमुत्तमगुणा न परित्यजन्ति ॥
(जे क्षुद्र असतात, ते विघ्ने आडवी येतील या भयाने कामालाच सुरुवात करीत नाहीत. मध्यम दर्जाचे लोक, विघ्ने आल्यावर हतबल होऊन, घेतलेले काम अर्धवट सोडून देतात. तर जे उत्तम दर्जाचे असतात, त्यांना जरी हजारो संकटांनी बेजार केले, तरी ते हाती घेतलेले काम मधेच सोडून देत नाहीत.)
राजा मेघवर्ण शेवटी म्हणाला, 'काका, ऋण, अग्नी, शत्रू व रोग यांना अगदी मुळापासून निपटून काढावे, अशी जी उक्ती आहे, ती कृतीत आणून तुम्ही मला व प्रजाजनांना भयमुक्त केले आहे.'
यावर स्थिरजीवी म्हणाल, 'महाराज, राज्य हे पूर्णपणे भयमुक्त कधीच नसते. त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका. स्वतःच्या हितापेक्षा प्रजेचे हित सदैव डोळ्यांपुढे ठेवा. या राज्याचा आपण व आपल्या पुत्रपौत्रांनी अनंत काळपर्यंत उपभोग घ्यावा अशीच आम्हा सर्वांची मनोमन इच्छा आहे.'