गोष्ट पासष्ठावी
गोष्ट पासष्ठावी
वाचावीर केवळ बेत करती, पण कृतीवीर ते तडीस नेती.
एका तळ्यात राहणारा 'एकबुद्धी' नावाचा विचारी बेडूक आणि 'शतबुद्धी' व 'सहस्त्रबुद्धी' हे दोन विद्वान मासे, एके दिवशी काठावरच्या उथळ पाण्यात शिळोप्याच्या गप्पा मारीत असता, जवळच्याच रस्त्याने जाणार्या दोन कोळ्यांनी त्यांना पाहिले. 'हे मासे आपण उद्या पकडून नेऊ,' असे बोलून ते कोळी निघून गेले. पण घाबरलेल्या एकबुद्धी बेडकाने त्या माशांना विचारले, 'ऐकलेत ना, ते काय बोलले ते ? आता ते जरी तुम्हा माशांना पकडायला नेणार असले, तरी तुम्हीही माझे मित्रच ना ? शिवाय मासे पकडताना त्यांना तळे तुडवावे लागणार असल्याने त्यांच्या पायाखाली सापडून मी वा माझी पत्नी चिरडलो गेलो तर ? तेव्हा आताच आपल्याला एखादा मार्ग शोधून काढला पाहिजे.' यावर सहस्त्रबुद्धी म्हणाला, 'हे पहा, एकबुद्धी, दुष्टांचे सगळेच बेत काही तडीस जात नाहीत. त्यातून समजा ते खरोखरच आले, तरी माझ्यासारखा बुद्धिवंत त्या संकटातून सहीसलामत सुटण्याचा मार्ग शोधून काढील आणि स्वतःप्रमाणेच इतरांनाही वाचवील.'
त्याचे हे बोलणे ऐकून शतबुद्धी त्या बेडकाला म्हणाला, 'मित्रा, अरे सहस्त्रबुद्धी जे बोलतोय ते खरे आहे. त्याच्या-माझ्यासारख्या बुद्धिवंतांना या जगात अशक्य ते काय आहे ? बुद्धीच्या सामर्थ्यावरच त्या चाणक्याने शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशा नंदाचा नाश केला ना ? बुद्धीचा प्रभाव असा आहे की-
न यत्रास्ति गतिर्वायो रश्मीनां च विवस्वतः ।
तत्रापि प्रविशत्याशु बुद्धिर्बुद्धिमतां सदा ॥
(जिथे वायु, सूर्य किंवा सूर्यकिरणे यांचाही प्रवेश होऊ शकत नाही, अशा ठिकाणी बुद्धिमंतांची बुद्धी केव्हाही झटकन प्रवेश करू शकते.)
यावर एकबुद्धी बेडूक त्या दोघांना म्हणाला, 'देवाने मला जरी तुमच्याएवढी बुद्धी दिली नसली, तरी थोडीफार व्यवहारबुद्धी मात्र दिली आहे. त्यामुळे मी आत्ताच माझ्या सौभाग्यवतीसह दुसर्या एखाद्या सुरक्षित जलाशयात जातो.' एकबुद्धी असे बोलला आणि शतबुद्धी व सहस्त्रबुद्धी आपल्या भित्रेपणाला हसत आहेत, या गोष्टीकडे दुर्लक्ष करून, दुसर्या एका विहिरीच्या आश्रयाला गेला.
दुसर्या दिवशी दोघेही कोळी आले आणि शतबुद्धी व सहस्त्रबुद्धी यांच्यासह त्या तळ्यातल्या सर्व माशांना पकडून ते घरी जाऊ लागले.
अशा तर्हेनं ते कोळी त्या विहिरीजवळून चालले असता, विहिरीच्या काठावर आरामात बसलेला एकबुद्धी बेडूक आपल्या बायकोचे तिकडे लक्ष वेधून तिला म्हणाला, 'बघितलेस ना? बुद्धिवान शतबुद्धीला एक कोळी डोक्यावरून नेत आहे, महाबुद्धिवान सहस्त्रबुद्धीला दुसरा कोळी हातात उलटा लोंबकळत नेत आहे, आणि हा एकबुद्धी मात्र बायकोसंगे या विहिरीत सुखात गप्पा मारीत आहे.' ही गोष्ट सांगून चक्रधर म्हणाला, 'मित्रा सुवर्णसिद्धी, तेव्हा या सर्व दैवाधीन गोष्टी आहेत.'
यावर सुवर्णसिद्धाने उत्तर दिले, 'दैव कसले कपाळाचे ! हा त्या माशांचा अतिशहाणपणा त्यांना नडला. 'मामा, त्या पहारेकर्याने हा तुमचा सन्मान तुमच्या गोड गाण्याबद्दल केला ना?' असे जे त्या कोल्ह्याने त्या गाढवाला उपरोधाने विचारले, ते त्या गाढवाने अतिशहाणपणाने स्वतःवर संकट ओढवून घेतले म्हणूनच ना?' हे ऐकून 'ती गोष्ट काय आहे?' अशी विचारणा चक्रधराने करताच सुवर्णसिद्धी त्याला ती गोष्ट सांगू लागला-