गोष्ट पन्नासावी
गोष्ट पन्नासावी
जो संकटापासून धडा घेत नाही, तो आयुष्यात मारच मार खाई.
वनातील एका गुहेत राहणारा 'करालकेसर' नावाचा सिंह एकदा एका मदोन्मत्त हत्तीशी झालेल्या झटापटीत बराच जायबंदी झाला. त्याच्या अंगी शिकार करण्यासाठी आवश्यक असलेली चपळता न राहिल्याने, त्याची व त्याचा खाजगी कारभारी असलेल्या 'धूसरक' नावाच्या कोल्ह्याची उपासमार होऊ लागली. तेव्हा तो धूसरकाला म्हणाला, 'तू जर एखाद्या श्वापदाला फसवून या गुहेत आणलेस, तर इथल्या इथे अशाही स्थितीत मी त्याची शिकार करू शकेन.'
मग धूसरक कोल्हा, ते वन व नजिकचे गाव यांच्या सीमारेषेवरील सरोवराकाठी दुर्वा खात असलेल्या 'लंबकर्ण' नावाच्या गाढवापाशी जाऊन त्याला म्हणाला, 'मामा, बर्याच दिवसांनी दर्शन झाले की हो तुमचे ? आणि एवढे वाळलात कसे काय ?'
लंबकर्ण म्हणाला, 'काय सांगू धूसरका तुला ? ज्या धोब्याकडे मी आहे, तो फक्त माझ्याकडून मरेमरेतोवर काम करून घेतो आणि मग मला जराही गवत-पाणी न देता, असे वार्यावर सोडून देतो. तेव्हा माझी अशी दशा व्हावी यात नवल ते काय ?'
कोल्हा म्हणाला, 'मामा, तुम्ही मजबरोबर चला. आजपासून तुमच्या आयुष्यात 'आनंदपर्व' सुरू होईल, वनातून वाहणार्या नदीकाठचे पाचूसारखे हिरवेगार गवत पोटीपोटभर खाऊन, थोड्याच दिवसांत तुम्ही चांगले तगडे व्हाल. शिवाय तुमच्याप्रमाणेच दुसर्या एका धोब्याच्या जाचाला कंटाळून, तुमच्या जातीतल्या तीन तरुण सुंदरी माझ्या आश्रयाला येऊन राहिल्या आहेत. त्यांचं ते झगमगतं सौंदर्य पाहून, मामा तुम्ही खरोखरच देहभान हरपून बसाल. त्यांनीही आम्हाला 'एखादा खानदानी व देखणा पती मिळवून द्या,' अशी माझ्यामागे भुणभुण लावली आहे. तुम्ही मजबरोबर आलात, तर मी त्यांच्याशी तुमचे लग्न लावून देईन. मग येणार का मजसंगे ?' त्या कल्पनेतल्या गर्दभसुंदरीचे नुसते नाव काढताच तो लंबकर्ण त्या कोल्ह्यामागोमाग चालू लागला. म्हटलंच आहे ना ? -
यासां नाम्नापि कामः स्यात्सङ्गमं दर्शनं विना ।
तासां दृक्सङ्गमं प्राप्य यन्न द्रवति कौतुकम् ॥
(ज्यांच्याशी मीलन, किंवा ज्यांचे दर्शन नव्हेच तर ज्यांचे नुसते नाव घेतल्यानेही काम जागृत होतो, त्यांच्याशी दृष्टभेट झाली असतानाही जो हेलावून जात नाही, त्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. )
अशा तर्हेने त्या कोल्ह्याने बोलत बोलत त्या लंबकर्णाला धन्याच्या गुहेत नेले. अवयवांची इच्छेनुसार हालचाल करता येत नसल्याने त्या सिंहाने लंबकर्णाला पंजा मारला, पण तो चुटपुटता लागून लंबकर्ण पळून पुन्हा त्या सरोवराकाठी गेला.
हातची शिकार घालविल्याबद्दल त्या सिंहाला दोष देऊन आणि यापुढे अशी चूक होऊ देणार नाही, असे त्याच्याकडून आश्वासन घेऊन, तो कोल्हा पुन्हा त्या सरोवराकाठी गेला व लंबकर्णाला म्हणाला, 'मामा, तुम्हाला पाहताच, त्या तीन सुंदरीपैकी सर्वात सुंदर असलेल्या गर्दभसुंदरीने तुमचा हात धरण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही पळून का बरं आलात ? तुम्हाला काय वाटलं - त्या गुहेतल्या अंधारात एखादा सिंह लपून बसला आहे ? छे छे ! ती तुमच्या जातीतली सुंदरी होती. तिला तुम्ही एवढे आवडलात की तुम्ही परत तिच्याकडे न आल्यास तिने आमरण उपोषण करण्याचा किंवा त्या नदीत वा अग्निकुंडात उडी घेऊन देहान्त करण्याचा निश्चय केला आहे.' त्या कोल्ह्याच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून लंबकर्ण त्याच्या पाठोपाठ पुन्हा त्या गुहेत गेला आणि त्या सिंहाची शिकार बनला !
लंबकर्णाला मारल्यावर तो सिंह म्हणाला, 'धूसरका, मी आस्ते आस्ते नदीवर जाऊन आंघोळ करून येतो. तोवर तू शिकारीची राखण कर.' असे म्हणून सिंह तिथून जातो, तोच धूसरकाने लंबकर्णाचे संपूर्ण मस्तक खाऊन टाकले. सिंहाने परत आल्यावर रागाने त्याला त्याबद्दल विचारताच तो म्हणाला, 'महाराज, या गाढवाला डोके नव्हते, म्हणून तर एकदा तुमच्या पंजाचा तडाखा बसल्यावरही, पुन्हा हा लगेच या ठिकाणी आला.' सिंहाला धूसरकाचे म्हणणे पटले आणि मग त्या दोघांनी त्या गाढवावर चांगले हात मारले...'
ही गोष्ट सांगून तो ताम्रमुख वानर त्या मगराला म्हणाला, 'मी बुद्धिमान आहे म्हणून तुझ्या कपटकारस्थानातून वाचलो, तू मात्र त्या लंबकर्णाप्रमाणे मूर्ख आहेस. म्हणून तर मध्येच खरे बोलून, तू स्वतःचे त्या युधिष्ठिर कुंभाराप्रमाणे नुकसान करून घेतलेस.' यावर 'ते कसे ?' असे त्या मगराने विचारता, वानर म्हणाला, 'ऐक-