गोष्ट त्रेसष्ठावी
गोष्ट त्रेसष्ठावी
सारासार विचाराने अडाणीही तरे, तर त्याच्याभोवती ज्ञानीही मरे.
एका गावात चार ब्राह्मण मित्र होते. त्यांच्यापैकी तिघे हे वेगवेगळ्या विद्यांत पारंगत होते. चौथा मात्र घरच्या कठीण परिस्थितीमुळे अल्पशिक्षित राहिला होता. पण असे असले तरी सारासार विचारबुद्धी मात्र त्यालाच त्या चौघांत जास्त होती.
एकदा ते तिघे ज्ञानी मित्र आपल्या विद्येचे चीज परराज्यात गेल्यानेच होईल असा विचार करून प्रवासाला निघाले असता, त्यांचा तो चौथा मित्रही त्यांच्यासंगे जायला निघाला. तेव्हा त्या तिघा विद्वान् मित्रांपैकी दोघे त्याची निर्भत्सना करून त्याला म्हणाले, 'अरे, तू अडाणी. परदेशात तू काय उजेड पाडणार ? उलट तू आमच्यासंगे आल्याने, आम्हाला मात्र आमच्या प्राप्तीतला काही भाग तुला कारण नसता द्यावा लागेल.' यावर त्या तिघांमधला उरलेला तिसरा त्या दोघांना म्हणाला, 'अहो, एकतर हा आपला मित्र आहे. त्यातून खरं तर तो जरी आपला मित्र नसता, तरी अशी संकुचित वृत्ती बाळगणं अयोग्य आहे. कारण-
अयं निजः परो वेतो गणना लघुचेतसाम् ।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ॥
(हा माझा, तो परका, अशी वृत्ती संकुचित मनाच्या माणसांची असते. परंतु थोर मनोवृत्तीची माणसे हे जगच आपले कुटुंब असल्याचे मानतात.)
तिसर्याने असा शास्त्राधार दिल्यावर ते चौघेही एकत्रपणे पुढल्या मार्गाला लागले. चालता चालता ते एका रानवाटेने जाऊ लागले असता, त्यांना एके ठिकाणी सिंहाची हाडे पडलेली दिसली. ती पाहून ते पुस्तकी पंडित आपापसांत म्हणाले, 'वाः ! आपल्या विद्येचे सामर्थ्य सिद्ध करून दाखविण्याची संधी कशी अगदी चालून आली आहे.'
एवढे बोलून एकाने आपल्या विद्येच्या सहाय्याने ती सुटी हाडे सांधून, त्यांचा अखंड व पूर्ण असा सांगाडा बनविला. दुसर्याने त्या सांगाड्यात मांस व रक्त घातले व त्याला प्राणहीन सिंह बनविले. आता तिसरा आपल्या मंत्रविद्येने त्याच्यात प्राण ओतणार, तोच काहीसा अडाणी पण सारासार विचार असलेला चौथा त्याला म्हणाला, 'बाबा रे, असा अविचार करू नकोस. तो सिंह जिवंत झाला तर आपणा चौघांनाही फाडून खाणार नाही का ?' पण मी माझी मंत्रविद्या वाया घालविणार नाही,' असे ठासून सांगून तो मंत्र पुटपुटू लागला असता, तो चौथा तरुण एका झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसला व काय होते ते पाहू लागला. पण त्याच्या बोलण्याप्रमाणेच झाले. त्या सिंहात प्राण संचारताच तो उठला आणि त्याने त्या तिघाही तरुणांचा फडशा उडविला. मग तृप्त झालेला तो सिंह निघून गेल्यावर, तो चौथा तरुण खाली उतरला व घरी निघून गेला.
ही गोष्ट सांगून सुवर्णसिद्धी म्हणाला, 'मित्रा चक्रधरा, तसं पाहता तू चांगला कुलवान व ज्ञानी आहेस, पण सारासार विचाराला सोडचिठ्ठी दिलीस म्हणून तू असा आत्मघात करून घेतलास. नुसते पुस्तकी ज्ञान कामी येत नाही. त्याला सारासार विचाराची जोड हवी. ती नव्हती, म्हणूनच एका गावच्या चार पुस्तकी पंडितांनी स्वतःची फजिती करून घेतली ना ?' यावर 'ती कशी?' अशी पृच्छा चक्रधराने केली असता, सुवर्णसिद्धी त्याला ती गोष्ट सांगू लागला.