गोष्ट सतरावी
गोष्ट सतरावी
उपदेश करू जाता मूर्खाला, संकटात पडावे लागे शहाण्याला.
एका पर्वतावर वानरांचा एक कळप रहात होता. पावसाळ्यातील एके दिवशी धुवांधार जलवर्षावाने ती वानरे पार भिजलेल्या व गारठलेल्या स्थितीत एका झाडाखाली येऊन कुडकुडत बसली.' थंडी कशी घालवावी ?' या गोष्टीचा विचार ती वानरे करू लागली असता, त्यांचे लक्ष नजिकच्या गुंजवेलीखाली पडलेल्या लाल गुंजाकडे गेले. ते बारीक बारीक निखारे असावेत, त्यांना एकत्र करुन व फुंकरा मारून अधिक प्रज्वलित केले, तर शेकोटी धगधगेल व आपल्याला ऊब मिळेल, असे वाटून त्यांनी त्या गुंजा छोट्या छोट्या फांद्यांनी झाडून, एकत्र करून, त्यांची रास केली व तिच्यावर फुंकर मारण्यास सुरुवात केली. त्यांची ती वायफळ धडपड पाहून त्या झाडावर बसलेला सूचिमुख पक्षी त्यांना म्हणाला, 'बाबांनो, त्या गुंजांना निखारे समजून तुम्ही त्यांच्यावर कितीही जरी फुंकरा मारल्यात, तरी त्या पेट घेऊन तुमची थंडी थोडीच घालवू शकणार आहेत ?'
त्या सूचिमुखाचे हे बोलणे ऐकून, त्याच झाडावर बसलेले एक सूज्ञ वानर त्याला म्हणाले, 'हे सूचिमुखा, व्यसनी, जुगारी व मूर्ख यांना उपदेश करण्यात मुळीच अर्थ नसतो. तू त्यांना कितीही जरी सांगून पाहिलेस तरी ते वागायचे तसेच वागणार. तेव्हा तू गप्प बैस ना !'
त्या सूज्ञ वानराने असे सांगूनही न राहवल्यामुळे सूचिमुख त्या झाडाखालच्या वानरांना म्हणाला, 'अरे मूर्खांनो ! मी तुम्हाला घसा फोडून सांगत असतानाही तुम्ही त्या गुंजांना निखारे समजता ?'
त्या सूचिमुखाचे बोलणे न रुचल्यामुळे, चिडलेल्या एका वानराने, रागाच्या भरात त्याच्याजवळ उडी घेऊन त्याला हातात पकडले आणि दगडावर आपटून ठार केले.'
ही गोष्ट सांगून करटक म्हणाला, 'दमनका, मूर्खाला उपदेश करून, त्यातून काही चांगले निष्पन्न व्हायचे तर बाजूलाच राहते, उलट त्याचे वागणे अधिकच त्रासदायक होते. म्हटलेच आहे ना ? -
उपदेशो हि मूर्खाणां प्रकोपाय न शान्तये ।
पयःपानं भुजङ्गानां केवलं विषवर्धनम् ॥
(ज्याप्रमाणे सर्पांना दूध पाजले असता, त्यांच्यातील केवळ विषाची वाढ होते, त्याचप्रमाणे मूर्खांना केलेला उपदेश त्यांना शांत करण्याऐवजी, त्यांना राग आणण्यास कारणीभूत होतो. )
'दमनका, अरे तू माझा भाऊ म्हणूनच मी तुला आतापर्यंत उपदेश केला. वास्तविक उपदेश हा, तो ग्रहण करायला जो पात्र असतो, त्यालाच करायचा असतो. नको त्याला उपदेश करू गेल्यास, त्या चिमणीवर जसा घरादाराला मुकण्याचा प्रसंग आला. तसा प्रसंग उपदेश करणार्यावर येतो.'
'तो कसा काय ? ' अशी पृच्छा दमनकाने केली असता करटक म्हणाला, 'ऐक-