आनंदी आनंद 3
‘सापडली?’
‘होय हो.’
त्या मातेच्या डोळ्यांत पाणी आले.
‘देव पावला. आता यांचे वेड जाईल ना डॉक्टर?’
‘होय हो; परंतु बातमी एकदम नाही सांगायची. मनाची तयारी करायची.’ हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणाले.
‘चित्राला येथे आणू?’ आमदारांनी विचारले.
‘हो.’ सीताबाई म्हणाल्या.
‘आणि मुलीचे यजमान कोठे आहेत?’
‘ते ही तिचा शोध करीत हिंडत आहेत.
‘आपण वर्तमानपत्रांत जाहिरात देऊ. म्हणजे ते असतील तेथे वाचतील, येतील. सारे गोड होईल आई. तुमची मुलगी शुद्ध, पवित्र आहे. तिचे शील निष्कलंक आहे. कसली शंका नको. आले होते दुर्दैव. गेले!’
‘देवाची कृपा.’
‘अच्छा. जातो मी.’
‘बसा हो. सरबत तरी घ्या. बसा डॉक्टर. तुम्हीही बसा डॉक्टर. तिघे बसले. इतक्यात भोजूही आला.
‘हा हो भोजू.’ हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणाले. भोजूने आमदारसाहेबांस प्रणाम केला. सरबताचे पेले भोजूने सर्वांना आणून दिले. नंतर लवंग, सुपारी, वेलदोडा देण्यात आला.
‘जातो हो आई.’ आमदार म्हणाले.
‘तुमचे फार उपकार.’ सीताबाई म्हणाल्या.
‘अहो, तुमच्या चित्राच्या मैत्रिणीचा मी बाप. उपकार कसले?’