आमदार हसन 2
दिलावरला ही भानगड माहीत नव्हती. चित्राप्रकरण तर नाही ना? तो दचकला.
‘काय बरे असेल काम?’ सास-याने पुन्हा विचारले.
‘ते मुस्लीम स्त्रियांच्या शिक्षणाचे काम असेल. फातमाने मुस्लीम स्त्रियांना साक्षर करण्यासाठी वर्ग सुरु केले आहेत. तिला ग्रॅंट वगैरे पाहिजे असेल. तेच काम असेल. मला तर तिने तार केली हे माहीतही नव्हते. ती मला इतकेच म्हणाली की, ‘तुमची तार आली आहे व तुम्ही येत आहात.’ घरी गेल्यावर कळेल.’
दारात मोटार वाजली. हसनसाहेब व दिलावर वर आले. फातमा सामोरी आली. पित्याने तिला जवळ घेतले.
‘बरी आहेस ना बेटा?’ त्याने प्रेमाने विचारले.
‘होय बाबा. बसा.’ ती म्हणाली.
‘काय ग, कसले काम?’ त्यांनी हसत विचारले.
‘मग जेवताना सांगेन. दिलावर, आज छान छान भाज्या आणा. आज हिंदूच्या शाकाहारपद्धतीची मी रसोई करणार आहे. बाबा, तुम्हाला तसला स्वयंपाक आवडतो ना?’
‘हो. पैगंबरसाहेबसुद्धा भाकरीच खात. फार तर मध घेत. कधी नुसता खजूर. माणसाने शक्य तो शाकाहारी असावे असे माझे मत आहे.’
‘परंतु मांसाशनास इस्लाम बंदी नाही करीत.’
‘दिलावर, अरबस्तान म्हणजे वाळवंट. शेतेभाते नाहीत. नद्या नाहीत. कालवे नाहीत. फार पाऊस नाही. तेथले लोक शाकाहारी कसे होतील?’ केवळ खजुरावर कसे जगतील? म्हणून तेथे उंट मारावे लागतात. मांस खावे लागते; परंतु अरबस्तान जर हिंदुस्थानसारखा सुजल, सुफल, सस्यशामल असता, तर पैगंबरांनी मांस खाऊ नका असेच सांगितले असते. परिस्थितीनुरूप सांगावे लागते. जे शक्य व झेपण्यासारखे तेच धर्मपुरूष शिकवतात. त्या चीनमधले लोक म्हणे वाटेल ते खातात. न खातील तर करतील काय? ४० कोटी लोक. नद्यांना मोठमोठे पूर येतात. नद्यांचे प्रवाह बदलतात. मंगोलियातून वाळूची वादळे उठतात व वाळूचे थर येऊन पडतात. नेहमी दुष्काळ. कसे जगतील चिनी लोक? परंतु वाटेल ते खाणारे चिनीही नद्यांचे पूर उतरावे म्हणून ‘तीन दिवस मांसाशन बंद’ असे ठराव करतात. यावरून त्यांची दृष्टी दिसते. फातमा, शाकाहारीच कर हं जेवण. खूप भाज्या कर!’