चित्रेचे लग्न 10
‘सासूने मारले वाटते?’ रामू म्हणाला.
‘लग्न नाही झाले, तोच कशी सासूने मारेल? रामू आधी लग्न ठरावे लागते. मग होईल. मग सासू मारील. होय ना ग आई?’ श्यामूने जरा प्रौढपणे जणू विचारले.
‘परंतु ताईला चांगलीच सासू मिळेल.’ सीताबाई म्हणाल्या.
‘निदान नवरा तरी चांगला मिळेल.’ बळवंतराव म्हणाले.
‘ताई, तू ब-याच उंचावरून पडलीस?’ रामूने विचारले.
‘हो.’ ती म्हणाली.
‘तू रडली असशील!’ दामू म्हणाला.
‘मग डोळे कोणी पुसले?’ रामूने विचारले.
‘नव-याने!’ श्यामू हसून म्हणाला.
‘परंतु लग्न झाले म्हणजे तो खरा नवरा. तूच ना म्हटलेस?’ रामू म्हणाला.
‘जा ना रे बाहेर. तिला पडू दे आणि ताईच्या लग्नाची अशी टिंगल का करायची? पुन्हा भलभलते बोलाल तर बघा.’ बळवंतराव जरा रागाने म्हणाले.
ती मुले बाहेर गेली. चित्रा आपल्या खोलीत जाऊन अंथरूणावर पडली. ती रडत होती. का बरे? तिचे का कोपर जास्त दुखत होते? कपाळाची जखम दुखत होती?
रात्री सीताबाई व बळवंतराव बोलत होते.
‘ती दोघे एकमेकांजवळ बोलली. एकमेकांना आवडली. मोकळी आहेत त्यांची मने. चारु खरेच सुंदर मुलगा आहे. जमले तर आपली चित्रा द्यावी तेथे.’ बळवंतराव म्हणाले.
‘माझी हरकत नाही. जहागीरदार आहे. एकुलता एक मुलगा आणि मुलगाही फार चांगला आहे म्हणता.’ सीताबाई म्हणाल्या.