चित्रेचे लग्न 13
लग्न झाले. सारी मंडळी परत आली. चित्रा सासरीच राहिली. एके दिवशी चित्रा व चारु त्या मळ्यात झोके घेत होती.
‘पडेन हो मी चारु. नको, मला भीती वाटते.’
‘त्या दिवशी तू एकटी होतीस. आज आपण दोघे मिळून झोके घेऊ. मी तुला पडू देणार नाही.’
‘त्या दिवशी रे मग का नाही बरोबर आलास?
‘तू का नाही बोलावलेस?’
पतिपत्नीचे असे प्रेमळ संवाद चालले होते अणि त्या झोक्यावर दोघे चढली. चारुने खूप उंच चढविला झोका.
‘पुरे, मला भीती वाटते चारु.’
‘बरे पुरे!’
आणि थांबला झोका. दोघे खाली उतरली. मळयात फिरली.
‘हा मळा तुला फार आवडत होता ना?’
‘चारु, तुझा हा मळा म्हणून आवडतो हो.’
‘चित्रा, आपली का पूर्वजन्मीची ओळख होती? पूर्वजन्मीही का आपण एकमेकांची होतो? आपणास परकेपणा अगदी वाटत नाही. खरे की नाही?’
‘होय हो चारु, तुला जणू शोधीत मी या बाजूला आल्ये.’
‘तू उद्या घरी जाणार ना?’
‘चारु, आता तुझे घर ते माझे घर.’
‘अग घरी म्हणजे माहेरी.’
‘हो, उद्या बाबा नेणार आहेत.’
‘केव्हा येशील परत?’