चित्रेचे लग्न 2
‘खरे आहे.’
अशी बोलणी झाली. मामलेदार गावात हिंडून लोकांच्या तक्रारी वगैरे ऐकून निर्मळपूरला परत गेले. बळवंतरावांना चारू आवडला. हा जावई बरा असे त्यांना वा़टले. त्यांनी घरी गोष्ट काढली.
‘विचारून पाहू का? तुला काय वाटते?’ बळवंतरावांनी पत्नीला विचारले.
‘परंतु फार शिकलेला नाही ना?’ सीताबाई म्हणाल्या.
‘कशाला हवे शिकायला? नोकरीचाकरी करण्याची जरूरी नाही आणि वाचून ज्ञान मिळवण्याइतका तो शिकला आहे. त्यांच्या घरी सुंदर ग्रंथालय आहे. गावातील लोकांनाही रात्री शिकवतो. मोठा छान मुलगा. गुणी व सुस्वभावीही आणि दिसायला खरोखरच मदनासारखा आहे.’
‘परंतु आमची चित्रा त्यांना पसंत पडेल का?
‘मी एकदा चित्राला घेऊन त्यांच्या मळ्यात जाणार आहे बघू या कसे जमते ते.’
‘बघावी नाडीपरीक्षा.’
आणि तसा योग आला. जहागीरदारांनीच बोलावले. कारण एकदा बळवंतराव सहज त्यांच्याजवळ म्हणाले होते, ‘तुमच्या मळ्यात भरीत-भाकरीचा जमवा बोवा एकदा बेत. मी आमची चित्रा पण घेऊन येईन. खेडेगाव पाहाण्याचा तिला फार नाद.’ जहागीरदार ती गोष्ट विसरले नव्हते. जहागीरदारांकडची गाडी आली. बळवंतराव निघाले. चित्राही निघाली. आज त्यांनी बरोबर दुसरे कोणी घेतले नाही. दामू, रामू, श्यामू सारे पाठीस लागले, परंतु सीताबाईंनी त्यांची समजूत घातली.
‘ताईला दाखवायला नेत आहेत वाटते?’ श्यामने हसून विचारले.
‘अय्या, होय ग आई? रामूने टाळी वाजवून विचारले.’
‘चहाटळ आहात. चला घरात!’ सीताबाई म्हणाल्या.
बळवंतराव व चित्रा गोडगावच्या मळ्यात आली. फारच सुंदर होता मळा. प्रसन्न वाटत होते. मळ्यात एक लहानशी बंगली होती. तिच्या दिवाणखान्यात बैठक होती. बळवंतरावांचे जहागीरदारांनी स्वागत केले.
‘बाबा, मी बाहेरच हिंडते. मला नाही असे आत आवडत.’ असे म्हणून चित्रा बाहेर गेली.