सासूने चालवलेला छळ 5
‘आई, अग गाडीची वेळ बदलली आहे गाडी सुटली नि तश्शी परत आलो. का उगीच बोलतेस? आता आम्ही का कुकुली बाळे? पाहिला सिनेमा म्हणजे का पाप झाले? तूसुद्धा मधूनमधून पाहातेस.’
‘परंतु देवाधर्माचे पाहतो?
‘आम्ही वाटते वाईट असतात तेच पाहातो? काही तरी आपले बोलतेस.’
‘बरे हो नाही बोलणार. तुम्ही आता मोठी झालात. कोण बोलणार तुम्हाला? वाटेल तशी नाचा. उद्या तोंडाला काळे फासू नका म्हणजे झाले.’
असे दिवस जात होते आणि चारूला कोठेतरी लांब जायचे होते. महत्वाचे काम होते.
‘चारू, जाशील ना तू?’ बापाने विचारले.
‘होय बाबा, हवे ना जायला?’
‘हो, तू नाही तर मी गेले पाहिजे. मला जरा बरे नाही वाटत. तू ये जाऊन.’
‘बरे.’
चित्राला वाईट वाटत होते. चारू तिला धीर देत होता.
‘चित्रा, तुलासुद्धा मी बरोबर नेले असते, परंतु ते बरे नाही दिसणार. मी लौकरच येईन. आईला सांगून ठेवीन आणि जरा धीटपणाने वाग. आई बडबड करील तिकडे लक्ष नको देत जाऊ हो.’
‘चारू तू जवळ नसलास म्हणजे माझा जीव खालीवर होतो. पाण्याविणे मासा तसे होते. तूच हो एक माझा आधार. तुझ्याशिवाय मला कोण आहे? तू माझे जग, तू माझा देव वाटते की, तू नि मी कोठे तरी दूरदूर जावे. नको हे जग. दुष्ट जग!’
‘चित्रा हे जग का दुष्ट आहे? या जगातच तू नि मी आहोत. तुझी फातमा आहे. तुझे आईबाप, भावंडे, सारी आहेत. जगात बरे, वाईट सारे आहे. ब-याकडे लक्ष देऊन आशेने व आनंदाने राहावे.’
‘राहीन हो आनंदाने. ये जाऊन.’