चित्रावर संकट 4
‘चारू असे काय वेड्यासारखे करतोस? येईल ती. राहील आठ दिवस.’ कुठे परमुलखात नाही जात. तू तर आजोळी येतच नाहीस.’
‘योग्य वेळी येईन.’
सासूबाई व चित्रा गेल्या. चारू आता घरी होता. चित्राच्या आठवणी काढीत बसे. मळ्यात जाऊन बसे.
सासूबाईंचे माहेर मोठे होते. कितीतरी माणसे. कोणाचा कोणाला पत्ता नसे. त्या गावात मुसलमानांचीही बरीच वस्ती होती. सासूबाईंच्या माहेरी मुसलमान येत जात. कामकाज असे, व्यवहार असे.
चित्रा कोठे बाहेर असली, म्हणजे तिची सासू सारखी तिची निंदा करीत असे. ‘ तिला एकटीला तिकडे ठेवणे बरे नाही. चारू एखादे वेळेस गावाला जातो, ही वाटेल त्याच्याशी हसेल, खिदळेल काय, भीती वाटते ह्या पोरीची. आपली बरोबर आणली. डोळ्यांसमोर असलेली बरी.’ असे बडबडायची. एके दिवशी चित्राची सासू आपल्या मैत्रिणीकडे गेली होती. त्या दोघींचे बोलणे चालले होते.
‘तुझी मुलगी मी अजून सून म्हणून करून घेईन; परंतु युक्ती करायला हवी. ही चित्रा आहे तोपर्यंत चारू दुसरे लग्न करणार नाही. तो जणू तिचा गुलाम बनला आहे. चित्राला नाहीशी केली पाहिजे. म्हणजे त्याला वाटेल की, आई म्हणत होती त्याच मुलीशी मी लग्न करावे, अशी देवाची इच्छा तर नाही? एकदा असा विचार त्याच्या डोक्यात आला म्हणजे काम झाले.’ चित्राची सासू म्हणाली.
‘मला एक युक्ती सुचते.’
‘कोणती?’
‘गावाबाहेरच्या देवीच्या देवळात नवसासाठी तुझी सून व तू जायचे. तेथे तिला कोणी पळवून नेईल अशी व्यवस्था करता येईल!’
‘कोण नेणार पळवून?’
‘तोटा गेला!’
‘कोणी मुसलमान आहे वाटते?’
‘चारूच्या आई, अहो बायका पळवून व्यापार करणा-या टोळ्या असतात.’ त्यांत हिंदू-मुसलमान दोघेही असतात. मोठमोठ्या श्रीमंतांना, नबाबांना सुंदर बायका या व्यापा-यांकडून पुरविल्या जातात. या व्यापा-यांची हिंदुस्थानभर जाळी असतात. मी ती सारी व्यवस्था करत्ये.’
‘आणि हि चित्रा आहे ना, ती लहानपणापासून मुसलमानांकडे म्हणे जात येत असे. तिची फातमा म्हणून एक मैत्रीण आहे. कोठे मसणात आहे ते देव जाणे. ती फातमा म्हणे हिला पानपट्टीसुद्धा करून देई. आपणाला कंडी उठवायला बरे की, एखाद्या मुसलमानाबरोबर गेली असावी. नाही का?’
हो, सारे जमेल. काहीही करून तुमच्या चारूच्या गळ्यात माझी चिंगी बांधायचीच. लहानपणापासून आपण ठरवले होते; परंतु चित्रा आडवी आली थांब म्हणावे.’
‘मग ठरवू या दिवस?’