चित्राची कहाणी 1
त्या गुडांनी चित्राला पळवून नेले. एका मोठ्या शहरात ते आले. जो गुंडाचा नायक होता, त्याच्या ताब्यात आता चित्रा होती. एका मोठ्या इमारतीत ती होती. एका खोलीत होती. खोलीला बाहेरून कुलूप होते. तो गुंड दिवसातून दोनचारदा येई.
‘का मला छळता? गरीब गाईला छळू नका. सोडा मला.’ ती म्हणे.
‘बाई, पोटासाठी आम्ही सारे करतो. मी तुमच्या अंगाला हात लावणार नाही. परंतु तुम्हाला आम्ही विकू. त्या पैशांनी आमच्या कुटुंबांचे पोषण करू. तुमचा येथे छळ नाही. खा प्या.’
‘कसे खाऊ? येथे कशी राहू?’
‘ते तुमचे तुम्ही पाहा. येथे खायला मिळत नसेल तर सांगा. फळे पाहिजेत?
तुमची भरपुर किंमत आली पाहिजे. आमच्यासाठी तरी शरीराची काळजी घ्या.
‘अशक्त झाल्यात तर कोण विकत घेईल?’
‘तुम्ही का कसाब आहात?’
‘आम्ही पोटाची विवंचना करणारी माणसे आहोत. पोट आम्हाला कसाब व्हायला शिकवते, दरोडेखोर व्हायला शिकवते. खुनी व्हायला शिकवते. जातो मी. चांगल्या गि-हाईकालाच तुम्हाला विकीन. मलाही तुमची दया येते; परंतु माझ्या पोराबाळांची अधिक येते.’ असे म्हणून तो गेला.
आणि एके दिवशी एक गि-हाईक आले.
‘तुम्ही किती द्याल पैसे?’ गुंडाने विचारले.’
‘परंतु माल तर पाहू द्या.’ ते गि-हाईक म्हणाले.
‘माल खुबसुरत आहे. बहोत उमदा माल!’
‘खरे सांगायचे, म्हणजे माल मलाही नको आहे. मी आणखी कोणाला विकीन. तू किती घेणार पैसे?’
‘दोन हजार तरी द्या!’