महंमदसाहेबांची बदली 2
‘हो. त्यांना फार नाद. हजारो रूपये खर्च करतात निवडणुकीसाठी.’
‘ते कोणत्या पक्षाचे आहेत?’
‘ते स्वतंत्र पक्षाचे.’
‘परंतु कोणत्या तरी पक्षाचे असल्याशिवाय लोक मते देत नाहीत.’
‘बाबा नेहमी निवडून येतात. उदार आहेत. सर्वांना मदत करतात. ते पक्षातीत आहेत. ते सर्वांचे मित्र आहेत. त्यांना शत्रू नाही. ते म्हणतात, मी निवडणुकीत कधी पडणार नाही. एकदा पडलो तर पुन्हा उभा राहणार नाही.’
‘फातमा, तुला मी काय देऊ? कोणती भेट देऊ?
‘तुझे ते मराठी संक्षिप्त रामायण मला भेट दे. मला फार आवडते राम-सीतेची गोष्ट. ’
‘दुसरे काही माग.’
‘काय मागू? असेच प्रेम ठेव. मुसलमान म्हणजे वाईट असे नको समजू. जे असे म्हणतील त्यांना सांग की, माझी एक मुसलमान मैत्रिणी आहे. तिचे नाव ‘फातमा’. ती माझ्यावर प्रेम करी. चित्रा, हिंदुमुसलमानांची भांडणे ऐकून तुला वाईट नाही वाटत?’
‘फातमा आपण लहान मुली काय करणार?’
‘जेवढे होईल तेवढे करू. चित्रा, तुला मी ‘इस्लामी संत’ हे पुस्तक भेट म्हणून देईन. ती माझी तुला आठवण.’
‘फातमा, थांब, शेवटचा फराळ करून जा. मी घेऊन येते बैस.’
चित्रा खाली गेली. आईजवळून तिने चकल्या, लाडू वगैरे फराळाचे सामान आणले. लिंबाचे सरबत तिने केले होते. दोघी मैत्रिणींनी फराळ केला. दोघी
सरबत प्यायल्या.
‘जाते आता चित्रा.’
‘हे घे रामायण.’
‘तुला मी विसरणार नाही.’
फातमा गेली. चित्रा एकटीच आता खोलीत बसली होती. ‘खरेच का आपलेही लग्न बाबा लवकर करणार?’ ती विचार करीत होती, परंतु तिला तो विचार आवडला नाही.
‘चित्रा, स्टेशनवर येतेस का?’ बळवंतरावांनी विचारले.