चित्राचा शोध 2
सेवेशी कृ. स. प्रणाम.
चारू आज घर सोडून बाहेर पडत आहे. चित्रा कोठे तरी हरवली आहे. आईबरोबर ती आमच्या आजोळी गेली होती; परंतु एके दिवशी अकस्मात ती हरवली. काय घोटाळा आहे समजत नाही. आई घरी आली ताबडतोब. मी चित्राच्या शोधार्थ बाहेर पडत आहे. चित्रा सापडली तरच घरी परत येईन. चित्रा सापडली तरच तुम्हालाही तोंड दाखवीन. मी दु:खी आहे. चित्रा म्हणजे माझे पंचप्राण. तिच्याशिवाय मी जगू शकणार नाही. देवाची इच्छा असेल तसे होईल.
तुमचा अभागी
चारू
असे पत्र लिहून चारू चित्राच्या शोधार्थ जणू फकीर होऊन बाहेर पडला आणि ते पत्र चित्राच्या वडिलांना मिळाले. त्यांना नेहमी वाटत असे. चित्रा जन्मली आणि ते एकदम मामलेदार झाले. चित्रा वाचली आणि पुढची मुले वाचू लागली.
चित्रावर बळवंतरावांचे फार प्रेम होते. सीताबाईंचे तितके नव्हते; परंतु बळवंतरावांना चित्रा म्हणजे जणू आधार वाटे. रोज त्यांना चित्राची आठवण येई. जेवताना येई. कधी कोठे खेड्यात वनभोजन वगैरे कार्यक्रम असला म्हणजे येई आणि आज हे पत्र. त्यांचे डोळे भरून आले. ते रडतच घरात गेले.
‘अग, आपली चित्रा हरवली? हे पत्र आले आहे.’ ते रडत म्हणाले.
‘काय? चित्रा हरवली?’ सीताबाईंनी घाबरून विचारले.
त्यांनी पत्र वाचून दाखविले. त्यांचा गळा दाटून आला होता.
‘तुम्ही जा शोधायला. रजा घ्या. अशी कशी हरवली? कोणी पळवली वाटते? आणि गेली कशाला त्या दुष्ट सासूच्या माहेरी? तुम्ही रडत नका बसू. घ्या रजा नि ताबडतोब जा.’
बळवंतराव आपल्या बैठकीच्या जागी गेले. त्यांना काही सुचत नव्हते. त्यांनी तात्पुरती रजा घेऊन जास्त रजेचा अर्ज केला. ते आज जाणार होते. आधी गोडगावाला जाणार होते. मग शोध करणार होते.
‘भोजू,’ त्यांनी गाडीला हाक मारली. भोजू फार प्रामाणिक नोकर होता.