४९ लक्ष्मण
आमच्या डोर्ले येथील घराशेजारी गडग्याला लागून दोन तीन घरे होती ती बहुदा कुणब्यांची नसावीत .कुणब्यांची घरेआम्ही राहात होतो त्याच डोंगराच्या वरच्या बाजूला होती .ती अर्थातच मांसाहारी लोकांची होती .खडपाला जाऊन कालवे आणल्यानंतर त्यांच्या बाहेरची कवचे त्याच डोंगरावर ते कुणबी लोक फेकत असत त्यामुळे जणु काही तो करपांचा डोंगर झाला होता (कालवे ज्यामध्ये असत त्या बाहेरच्या कवचाला करप असे म्हणत ).ती अतिशय धारदार असत त्यावरून चालताना पाय कापत असे . त्या करपामधून डोंगरावर जाण्यासाठी पायवाट होती त्याने जावे लागे. हीआमच्या शेजारची तीन चार घरे वेगळी राहात असल्यामुळे ती बहुधा कुणबी नसावीत .त्यांच्या घरातून नको असलेला वास येत नसावा. नाहीतर आईने व भाऊंनीही नाक मुरडले असते.निदान माझ्या लक्षात तरी आलेले नाही .तसा गाव सारस्वतांचा म्हणजे मत्स्याहारी लोकांचा .त्यांच्याकडे मासे विकण्यासाठी खारविणी( हिंदू दर्यावर्दी लोकांना खारवी म्हणत)येत . त्या घराच्या मागच्या बाजूला जाऊन मासे देत असत .सारस्वतांना मत्स्याहार हा कमी पणाचा वाटत असावा.हल्लीचा काळ वेगळा आहे आम्ही मासे कोंबडी मटण खातो हे ब्राह्मण मंडळी अभिमानाने सांगताना आढळतात .मी वर्णन करतो हा काळ सुमारे ऐशी वर्षांपूर्वीचा आहे . कोकणातील शहरापासून दूर अशा एका खेड्यातील आहे .
आमच्या घराच्या एका बाजूला सारस्वतांचे घर होते. तर दुसऱ्या बाजूला या लक्ष्मणचे घर होते .हा लक्ष्मण हरहुन्नरी होता .तो झाडावर उत्तम चढत असे .तो चांगल्यापैकी धीट होता .ढोलीमधून नाग तोंड बाहेर काढीत असला तरीही त्याच्या मागच्या बाजूला उभे राहून तो खांदी तोडत असे. त्याला आंबा जून किंवा कोवळा आहे याची उत्तम पारख होती . खळ(अंगण) करणे ,डोली उचलणे, लाकडे फोडणे,चिठ्ठी घेऊन कुठेही जाणे , कुठलेही काम करण्यास तो तयार असे.भाऊंचा तो आवडता गडी होता .लक्ष्मण म्हणून केव्हाही हाक मारली की तो गडग्यावरून(गडगा म्हणजे दगडाच्या सहाय्याने बांधलेले कंपाउंड) उडी मारून लगेच येत असे .
मध्यम उंचीचा मध्यम वयाचा सडपातळ अंगयष्टीचा डोक्याला टक्कल किंचित उजळ अशी त्याची मूर्ती होती .गावात रामनाथचाआंबा म्हणून एक रायवळ झाड होते .त्याच्या काही ना काही फांद्या दरवर्षी येत. म्हणजे त्याला आंबा लागे.भाऊ ते झाड नेहमी करीत असत .लक्ष्मण बरोबर मी आंब्याच्या झाडाखाली टोपल्या उतरुन घेण्यासाठी जात असे .एका टोपलीला राजू (जाड दोर)बांधून तो झाडाला बांधत असत . घळाने (घळ म्हणजे एका बांबूला टोकाला जाळीदार कापड लावून आंबा तोडण्यासाठी केलेले विशिष्ट प्रकारचे साधन)आंबे काढल्यावर ते त्यात ठेवले जात व टोपली भरल्यानंतर खाली सोडली जाई.ती रिकामी करून पुन्हा वर पाठवावी लागे.पोत्यांमध्ये भरून आंबे घरी आणले जात व त्यांची आडी(गवतांमध्ये आंबे पिकत घालणे ) घातली जाई .सुट्टीमध्ये आते व आते भावंडे येत सर्वांनाच आंबे भरपूर खाण्याला मिळत .
पावसामध्ये जमीन उखडली जाई दिवाळीच्या अगोदर खळ (अंगण)करावे लागे.चांगली जमीन असल्यामुळे बसणे फिरणे सोयीचे होत असे. जमीन खणून त्यावर पाणी भरपूर टाकून पायाने तुडवून नंतर ती सकाळ संध्याकाळ भुरवण्यांनी (जड लाकडाचे धरण्यासाठी मूठ असलेले आठ नऊ इंच रुंदीचे एक दीड इंच जाडीचे दोन तीन फूट लांबीचे साधारण गवंड्याच्या थापी सारखे साधन,त्यात लहान मोठे आकारही असत )चोपावी लागे हळूहळू ती सुकत जाई व घट्ट होई. नंतर ती शेणाने सारवावी लागे.या सर्व कामासाठी लक्ष्मण आमच्याकडे असे .
त्या काळी स्टोव्हही नव्हते लाकडाने पेटणारी चूल वापरत असत. झाड तोडणे लाकडे फोडणे नंतर पावसासाठी बेगमी म्हणून पडवीत त्याची गंजी रचणे हे सर्व काम लक्ष्मण करीत असे .आमच्या घरी कुणीही आजारी असले व वैद्यांना बोलवायचे असल्यास चिठ्ठी घेऊन लक्ष्मण जात असे .माझ्या आजोळी ,आम्ही वाणसामान आणत असू त्या ताम्हनकरांकडे, लक्ष्मण चिठ्ठी घेऊन जात असे .आम्ही होडी घेऊन ताम्हनकरांकडे बेगमीचे सामान आणण्यासाठी जेव्हा जात असू त्या वेळी लक्ष्मण बऱ्याच वेळा आमच्या बरोबर असे .होडीमध्ये सामान ठेवण्यासाठी, होडीतून बांधावर सामान उतरण्यासाठी ,गावात जाऊन माणसे आणण्यासाठी, सामान घरी नेण्यासाठी, त्याचा उपयोग होई. त्याच्या आणखी दोन आठवणी लक्षात राहण्यासारख्या आहेत .
माझ्या काकांच्या लग्नाला मी व भाऊ जात होतो .मी तीन साडेतीन वर्षांचा असेन.बाकी मला काही आठवत नाही परंतु रस्त्याने भाऊ व लक्ष्मण झपझप चालत होते . मी लक्ष्मणचे डोके घट्ट धरून त्याच्या खांद्यांवर बसलो होतो .त्याने डोक्याला तेल लावले होते व त्याच्या टकलाला खूप घाम येत होता.मी पडेन की काय अशी मला खूप भीती वाटत होती .त्याच्या खांद्यावर दोन बाजूला दोन पाय टाकून मी बसलो होतो .पडू नये म्हणून मी जोजो डोके घट्ट पकडीत होतो तोतो माझे हात घामावरून सटासट निसटत होते .अर्थात त्याने माझे पाय घट्ट धरून ठेवले होते .भर उन्हातून जीव मुठीत धरून मी कसाबसा लग्नघरी मावळंग्याला पोहोचलो .बाकी लग्नातील गर्दी शिवाय मला काहीही आठवत नाही .कुत्र्यांच्या जिभेला जसा घाम येतो त्याप्रमाणे बहुधा त्याच्या टकलाला घाम येत असावा !
आमच्या मागच्या अंगणामध्ये डाव्या बाजूला एक फणसाचे झाड होते .त्यामध्ये एक ढोल म्हणजे पोकळ जागा होती .त्यामध्ये एक दहाचा आकडा असलेला अस्सल नाग रहात होता.हे अर्थातच आम्हाला नंतर कळले.त्या फांदी खालून आमचे नेहमीच येणे जाणे होई.एके दिवशी मी खाली शौचाला गेलेला असताना तो नाग कुठूनतरी सळसळ करीत माझ्या पुढ्यात आला .फणा काढून डोलू लागला .मी तसाच वेगाने धावत घरी आलो व तो नाग सळसळ करीत अती वेगाने फणसाच्या झाडावर ढोलीमध्ये अदृश्य झाला .मी त्याला ढोलीमध्ये जाताना पाहिला .लगेच लक्ष्मणला हाक मारण्यात आली .सुदैवाने तो घरी होता .त्याने आणखी चार गडी जमविले.आरडा ओरडा करून फांदीवर दगड मारून जोरजोरात काठी आपटून नागाने बाहेर यावे म्हणून प्रयत्न करण्यात आले .तो नाग ढोलीमधून किंचित बाहेर डोकावे परंतु बाहेर काही येईना .काहींनी ढोलीमध्ये निखारे टाकावे असेही सुचविले परंतु त्याने आग लागेल व ती आग आवरणे कठीण होईल असे लक्षात आले .शेवटी तो ढोलीमधून तसा बाहेर येणार नाही तेव्हा झाडावर चढून ढोलीच्या मागे फांदी तोडावी असे ठरले. कोणीही झाडावर चढण्यास तयार होईना कारण जर साप अंगावर आला तर काय करावयाचे.लक्ष्मण बेदरकारपणे पण सावधपणे झाडावर चढला .नाग मधून मधून बाहेर डोकावत असतानाही त्याने फांदी तोडली .खांदी खाली पडल्याबरोबर नाग सळकन् बाहेर आला .खाली असलेल्या गड्यांनी त्याला लगेच मारला.खरोखरच ते सर्व दृष्य पाहण्याजोगे होते .मी तीन चार वर्षांचा असतानाही ते दृश्य माझ्या मनात खोलवर ठसा उमटवून गेले.आम्ही डोर्ले सोडले तेव्हा सामान बांधावर होडीपर्यंत आणण्यासाठी व निरोप देण्यासाठी तो बांधावर हजर होता .त्याचे व आमचे दोघांचेही डोळे पाणावलेले होते .यथा काष्ठंच काष्ठंच या उक्ती प्रमाणे त्याचा व आमचा संबंध संपला .
३/७/२००८©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@g.ail.com