२५ जे कृष्णमूर्ती व मी
गेल्या शतकात कृष्णमूर्ती नावाचे एक थोर विचारवंत होऊन गेले .त्यांच्या विचारांनी अनेक लोकांना मोहिनी घातली होती .त्या काळात म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीस ते एकूणीसशे साठ या काळात अनेकांनी त्यांचे विचार,-- भाषांतर ,अनुवाद ,मुक्त रूपांतर, अशा अनेक प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला .भाऊ(माझे वडील) स्वामी स्वरूपानंदांचे गुरुबंधू होते .त्यांना तत्वज्ञानाची खूप आवड होती .तुटपुंज्या उत्पन्नातही जेव्हा जेव्हा जमेल त्या त्या वेळी त्यांनी तत्त्वज्ञानावरील अनेक ग्रंथ गोळा केले होते.अनेक लोकांच्या ज्ञानेश्वरी वरील टीकेसह ज्ञानेश्वरी , लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य ,त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदांचे सर्व खंड ,इत्यादी ग्रंथ त्यांनी गोळा केले होते .एक कपाट त्या ग्रंथांनी भरलेले होते.ते अधूनमधून वाचत असत.चर्चा करीत असत वगैरे वगैरे .
त्यांच्या वाचनात कृष्णमूर्तींचे विचार आले ते त्यांना खूपच आवडले .त्यांनी अनेक लेखकांनी मांडलेले कृष्णमूर्तींचे विचार वाचले .त्यांचे समाधान होईना ते विचार आवडत पण उमजत नव्हते .मला अध्यात्माची आवड नाही हे त्यांच्या केव्हाच लक्षात आले होते .एकोणीसशे साठ मध्ये सुटीत मी गेलेला असताना त्यांनी मला जर तुला कृष्णमूर्तींचे एखादे चांगले पुस्तक मिळाले तर ते वाच व त्याचे जमेल तसे रूपांतर किंवा अनुवाद करून मला पाठव असे सांगितले . मी मुंबईला पुस्तकांच्या दुकानात फिरून शोध घेतला तेव्हा मला त्यांचे the first and the last freedom हे मनासारखे पुस्तक मिळाले नाशिकला आल्यावर मी ते पूर्ण वाचले त्याने मी फार प्रभावित झालो .मी एक नंबरचा आळशी मी काय लिहणार तरीही भाऊंवर खूप प्रेम असल्यामुळे मी मला जमेल तसे रूपांतर करून त्यांना पाठविण्याचे ठरविले
दर आठवड्याला एका प्रकरणावर विचार करून चिंतन मनन करून मग ते विचार मराठीत मांडावयाचे व पुन्हा एकदा सुधारून नंतर ते पोस्टाने पाकिटातून पाठवावयाचे असा क्रम जवळजवळ सहा ते आठ महिने चालला होता .ते सहा महिने माझे जवळजवळ भावावस्थेत गेले भाऊनाही माझे पाठविलेले वाचून समजले असे वाटले त्यांनी माझे कौतुक केले.
त्या विचारांचा माझ्यावर फार खोल परिणाम झाला .तोपर्यंत माझा जीवनविषयक दृष्टिकोन निराशावादी होता .जगण्यात काय अर्थ आहे? लग्न कशाला करावयाचे ? देवळात कशाला जायचे,?थोडा बहुत नास्तिक असे विचार होते .बाह्य परिणाम पहावयाचा झाला तर मी स्वतंत्रपणे नाही तरी कुणी बरोबर असल्यास देवळात जाऊ लागलो व नमस्कारही करू लागलो. अर्थात काही वेळा बाहेरही बसून राहतॊ.!विवाह केला व व्यवस्थितपणे वैवाहिक आयुष्य जगलो .अजूनही परमेश्वर! कृपेने जिवंत आहे.अंतरंगातही फरक पडला तो कसा पडला किती पडला हे सांगता येणे कठीण आहे .
कृष्णमूर्तीना त्यांच्या व्याख्यानानंतर अनेक जणांनी प्रश्न विचारले त्यावर त्यांनी उत्तरेही दिली .questions and answers त्यांचे माझ्याजवळ तीन खंड आहेत .त्याचेही स्वैर रूपांतर करून मी मूळ पुस्तकाप्रमाणेच क्रमश: भाऊना पाठविले.
माझे हस्ताक्षर दिव्य असल्यामुळे व पाकिटात घडी घालून पाठवलेले कागद चुरगळल्यामुळे , भाऊंनी त्यांच्या सुंदर अक्षरात मोठ्या तावावर(फुल स्केप ) ते सर्व पुन्हा लिहून काढले .त्याच्या दोन प्रती केल्या. एक प्रत स्वामी स्वरूपानंदांकडे ठेवलेली होती. त्यांच्याकडे येणारे भाविक ते वाचत, पाहात असत . भाऊ वृद्धत्वामुळे माझ्याकडे राहायला नाशिकला आले त्यावेळी ती प्रत त्यांच्याबरोबर माझ्याकडे आली .आठ दहा वर्षांपूर्वी मी ते कागद पिवळे पडू लागल्यामुळे व तुकडे पडू लागल्यामुळे त्याचे संगणकीय रूपांतर केले .अर्थात मूळ हस्ताक्षर किंचित लहान झाले पण तसेच राहिले .ते नंतर पेनड्राइव्हवर घेतले .काहिनी पेनड्राइव्हवरुन प्रतीही काढून घेतल्या .आता त्याचे डिजिटलायझेशन करण्याचा प्रयत्न आहे .तसे झाल्यास छापील पुस्तकासारखे ते मोबाइल किंवा संगणक यावर वाचता येईल .
३०/५/२०१८ © प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com