Get it on Google Play
Download on the App Store

२६ कोर्टाची पायरी

मेळा स्टँडवरून ज्या वेळी फक्त उत्सवाच्या काळात गाड्या त्र्यंबकेश्वर वणी पंढरपुर येथे सुटत असत त्या वेळची गोष्ट आहे .ठक्कर बाजार अस्तित्वात नव्हता .त्या सगळ्या विभागात एसटीचे वर्कशॉप पसरलेले  होते . त्या वेळची गोष्ट आहे . मूळ सीबीएस (आता जुना) त्यावेळी नवा होता. त्याला लागून पोलिस कॉलनी आहे .पोलिसांच्या गाड्या जश्या गंगापूर रोडकडून बाहेर पडतात त्याप्रमाणे सी.बी.एस. बाजूने बाहेर पडत असत .अजूनही पडत असतील .एसटीच्या गाड्या जेथून आत शिरतात (जुना आग्रा रोड) तिथून पोलिसांच्या गाड्या  बाहेर पडत असत .तिथेच एसटीचे पार्सल ऑफिस आहे .आपले पार्सल आले असल्यास चौकशी करण्यासाठी किंवा ताब्यात घेण्यासाठी आल्यावर, समोरच्या धक्क्याजवळ वाहन लावून चौकशी करण्यासाठी पार्सल ऑफिस मध्ये सर्व येत असत.पार्सल ऑफिसजवळ  गाडी लावली व त्याचवेळी एसटी आली तर अडचण होत असे व आरडाओरडही होई.त्यामुळे समोर धक्क्याजवळ गाड्या लावल्या जात .त्या भागात कुठेच नो पार्किंगचा बोर्ड नव्हता .एप्रिल मे मध्ये कोकणातून आंबा पेटय़ा येत असल्यामुळे मला तिथे जावे लागे.दोन चार दिवसांनी माझी तिथे चक्कर असे .त्या वेळी नुकतेच नवे पोलिस ऑफिसर आले होते . एके दिवशी ते त्यांच्या जीपमधून बाहेर पडत होते. तिथे बऱ्याच गाड्या वेड्यावाकड्या लावलेल्या होत्या .त्याच वेळी एक एसटी पार्सले चढवण्यासाठी किंवा उतरण्यासाठी उभी होती . त्यामुळे पोलीस वाहने बाहेर पडण्यास अडचण निर्माण झाली.त्यांनी लगेच तिथे नो पार्किंगचा बोर्ड लावण्यास सांगितले .ही घटना नुकतीच घडली होती . मला त्याची कल्पना नव्हती .(हे सर्व मागाहून कळले )मी पार्सल ऑफिसमध्ये चौकशी करण्यासाठी नेहमीप्रमाणे गेलो .स्कूटर धक्क्याजवळ उभी केली .तिथे एकही वाहन उभे नाही हे माझ्या लक्षात आले ,पण नसेल आज  कोणी म्हणून मी तिकडे दुर्लक्ष केले .नो पार्किंगचा बोर्ड माझ्या लक्षात आला नव्हता.हमालांनीही मला सतर्क केले नाही .मी पार्सल ऑफिसमधून काम करून बाहेर येतो तो माझ्या स्कूटर जवळ एक पोलीस उभा होता.त्याने माझे नाव पत्ता विचारून गाडी नंबर पावतीवर लिहून समन्स लिहायला सुरुवात केली . मी त्याला का म्हणून विचारता त्याने नो पार्किंगच्या बोर्डकडे बोट दाखविले .मी त्याला सांगितले की मी दर  दोन चार दिवसानी इथे येतो .पूर्वी हा बोर्ड नव्हता . एवढ्यात लावला असेल . माझ्या लक्षात आले नाही सोडून द्या.पोलिसाला माझे म्हणणे पटले परंतु तो म्हणाला की मी साहेबांबरोबर गाडीतून जात होतो .साहेबांनी मला गाडीतून उतरवून या गाडीचे चलन बनवण्याला सांगितले आहे .माझा नाइलाज आहे .त्या वेळी हल्लीसारखा दंड भरून पावती घेऊन जाण्याची व्यवस्था नव्हती .चलन स्वीकारावे लागे व जेव्हा तारीख पडेल समन्स येईल त्या वेळी कोर्टांमध्ये हजर राहावे लागे.मी चलन स्वीकारले . पुढच्या आठवड्यात मला कोर्टामध्ये दहा वाजता हजर रहावयाचे होते . तारीखही टाकली होती  .अर्ध्या पाऊण तासामध्ये आपले काम होईल फारतर बारा होतील  असे म्हणून मी न जेवताच कोर्टात बरोबर दहा वाजता गेलो .कोर्ट व पोलीस यांचा हिसका मला माहीत नव्हता .कोर्टामध्ये स्टँडला स्कूटर लावून, मी इकडे चौकशी कर, तिकडे चौकशी कर ,असे करीत ज्या ठिकाणी मला जायचे होते तेथे आलो .कडक पांढरा पोशाख केलेला गळ्यात लाल पट्टा घातलेला ज्यावर काही तरी  लिहिलेले आहे असा पितळेचा बिल्ला लावलेला शिपाई उभा होता .त्यांने मला कडक सलाम ठोकला .मी त्याच्या सलामीच्या स्वीकार तेवढ्याच रुबाबात केला .त्यांने  झटकन दरवाजा उघडून धरला . मी गोंधळात पडलो .काहीतरी चुकत आहे असे मला वाटले .चौकशी करता त्याने आज नवीन साहेब येणार आहेत ते मला तुम्हीच वाटले असे म्हणाला .मी कोणत्या कोनातून छोटा का होइना परंतु न्यायाधीश वाटलो ते माझ्या लक्षात आले नाही !मी त्याला हसत हसत मी जज्ज नसून गुन्हेगार म्हणून इथे आलो आहे असे सांगितले . माझे काम सांगितले .त्याने मला एका खोलीत जाऊन बसण्यास सांगितले .आपला सलाम फुकट गेला असा भाव त्याच्या चेहऱ्यावर होता .त्या खोलीमध्ये माझ्यासारखे हरवलेला भाव घेऊन बसलेले काही लोक होते .तेही काही ना काही कारणाने समन्स बजावल्यामुळे तेथे आलेले होते . चवकशी करता पोलिस स्टेशनमधून एक पोलीस सर्व समन्स घेऊन येतो .जज्ज साहेबांना अनेक कामे असतात ज्यावेळी हे वाहतुकीचे काम पटलावर येईल ,ज्या वेळी आपले नाव पुकारले जाईल, तेव्हा साहेबांसमोर जावे लागते असे कळले .केव्हा पोलीस समन्स घेऊन येईल ,केव्हा वाहतुकीचे काम पटलावर येईल ,काहीच निश्चित नव्हते  .समन्स बजावून हजर न राहणे हा गुन्हा होता.अकरा ते पाच या वेळात केव्हाही बोलावतील असे कळले .जर आज काम झाले नाही तर जेव्हा पुन्हा समन्स असेल तेव्हा यावे लागेल असे सांगण्यात आले .काम होईपर्यंत किंवा कोर्ट उठेपर्यंत समन्स असेल त्या दिवशी बाहेर बसून राहावे लागेल असेही कळले .  मी पूर्ण वैतागून गेलो .अकरा वाजता जर कामाला सुरुवात होणार होती तर दहा वाजता मला का बोलावले ते मला कळले नाही .कोर्टाची पायरी चढू नये असे का म्हणतात त्याची चुणूक मला दिसली .अजून समन्स घेऊन पोलीसही आला नव्हता.सर्व काही  थंडपणे चालले होते .मी जेवून आलो नव्हतो .पोलीस केव्हा समन्स घेऊन येईल ,येईल की नाही, तेही निश्चित नव्हते .पोलिस आल्यावर, जज्ज साहेब आल्यावर ,आपले काम केव्हा पटलावर येईल, ते विचारून नंतर तिथून बाहेर जावे ,ज्या वेळी ट्रॅफिकचे काम सुरू होईल ,त्या वेळी यावे असा विचार मी करीत होतो . .जज्जसाहेब आपल्यासमोरील कामे पाहून नंतर त्याचे नंबर लावतात असे कळले .एखादे  वेळी ट्रॅफिक चे काम पटलावर आज मुळीच येणार नाही असेही कळले .थोडक्यात जग किती अस्थिर आहे , जगात किती गोंधळ आहे, त्याची चुणूक मला दिसली.या समन्सच्या गोंधळात किती वेळ जाणार आणि किती दिवस जाणार हे मला कळेना .  पुण्याला एका मित्राने सांगितलेली गोष्ट आठवली .तिथे एक जज्ज होते . त्यांच्यासमोर आर्ग्युमेंट केलेले त्यांना आवडत नसे .ते दरवेळी अार्ग्युमेंट केल्यास दंड वाढवीत नेत . त्यामुळे मी मुळीच अार्ग्युमेंट करावयाचे नाही व झालेला दंड मुकाट्याने भरावयाचा असे ठरविले  .या पुढे तीन तीनदा बोर्ड पाहिल्याशिवाय स्कूटर उभी करावयाची नाही असा मी निश्चय केला .सरळ दंड घेऊन पावती देण्याचे अधिकार पोलिसांना का देत नाहीत असा विचार मनात आला.दंड पांच रुपये आणि तो भरण्यासाठी ही वाट पहाण्याची शिक्षा किती भयंकर, असा विचार मनात आला . (प्रत्यक्षात काही वर्षांनी ट्रॅफिक व त्यामुळे  ट्रॅफिकचे गुन्हे वाढायला सुरुवात झाल्यावर दंड गोळा करण्याचे अधिकार  पोलिसांना देण्यात आले) .एवढे होईपर्यंत साडेदहा वाजून गेले होते .

एवढय़ात माझ्या कानावर सर तुम्ही इकडे कुठे असे शब्द आले .माझा कुणीतरी विद्यार्थी होता .मी बीवायके कॉलेजला सहा वर्षे होतो व त्यानंतर नाशिक रोडला होतो .तो नाशिकरोडचा विद्यार्थी होता .त्याने कोणत्या वर्षी तो माझ्या वर्गात होता तेही सांगितले .त्याला सर्व हकीगत सांगितल्यावर तो म्हणाला सर तुम्ही काही काळजी करू नका मी सर्व काही बघून घेतो तुम्ही घरी जा .काही काळजी करू नका .एवढे त्यांने निक्षून सांगितले तरीही मला तिथे सोक्षमोक्ष लावल्याशिवाय निघवेना.एवढ्यात पोलीस समन्स घेऊन आला.माझ्या विद्यार्थ्यांने समन्स पाहिले आणि पोलिसाला सांगितले की हे समन्स सर्वात तळाला ठेव .असे पाहावयाचे की हे बोर्डावर येणार नाही. पुढे त्याने मला असेहि सांगितले की जर  समन्स तिनदा बोर्डावर आले नाही तर ते अॅटोमेटिक रद्द होते .तुम्ही काळजी करू नका जर त्यातूनच ते बोर्डावर आले तर मी दंड भरीन.मी त्याला दंडासाठी काही पैसे देऊ लागलो तेही त्याने स्वीकारले नाहीत .त्या वेळी अश्या गुन्ह्याला पांच रुपये दंड होता .मी सर्व काळजी घेतो असे सांगून त्याने मला निरोप दिला .सरांचे काम आपण केले त्यांना संकटातून वाचवले म्हणून तो पण खुश होता .

मी अकरा वाजता  घरी आलो . घरी आलो तो अण्णा (सासरे)आले होते .मी इतक्या लवकर घरी आलेला पाहून दोघांनीही( सौ.व अण्णा)विचारले की इतक्या लवकर कसे आलेत ?अण्णा वकील असल्यामुळे त्यांना कोर्टात किती वेळ लागेल याची चांगलीच कल्पना होती .त्यांनी सौ.कडून सर्व हकीगत ऐकल्यावर ,दादा कदाचित  पाच वाजताही येतील असे सांगितले होते.मी इतक्या लवकर घरी आलेला पाहून ते चकित झाले . मी त्यांना सर्व हकीकत सांगितल्यावर उलगडा झाला .एक दोन आठवड्यात समन्स न आल्यामुळे मी निश्चिंत झालो .त्या विद्यार्थ्याला भेटलो व त्याला सर्व हकीकत विचारली .त्याने पोलीस किवा आणखी कुठे पैसे खर्च केले का ते विचारले.त्याने सर्व काही व्यवस्थित मॅनेज केले होते .तीन वेळा माझे समन्स पटलावर येणार नाही हे त्याने पाहिले .नंतर समन्स आपोआपच बाद झाले .मी त्याला काही पैसे देऊ केले परंतु ते त्याने घेतले नाहीत.सर तुमचे काही कोर्टांमध्ये काम असले तर सांगा म्हणूनही त्याने सांगितले .त्याने हाक मारली त्यावेळी मी त्याला ओळखले नाही . आताही त्याचे नाव विसरून गेलो आहे.आपले विद्यार्थी कुठे भेटतील व कसे उपयोगी पडतील ते सांगता येत नाही .जर त्याने ओळख दाखवली नसती किंवा तो तिथे नसता तर मात्र  माझे दोन चार दिवस व वेळ वाया गेला असता.अर्थात नेम सांगता येत नाही पोलीस किंवा जज्जही माझा विद्यार्थी निघाला असता !!! त्यानंतर अजून तरी कोर्टाची पायरी चढण्याचा प्रसंग माझ्यावर आलेला नाही .

२०/६/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

स्मृतिचित्रे

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
०१ यात्रा (डोर्ले ते शेटफळे) ०२ यात्रा (होडीतून) ०३ यात्रा (नाशिक ते गुळे व्हाया महाबळेश्वर) ०४ यात्रा (नाशिक ते गुळे व्हाया रनपार) ०५ यात्रा (नाशिक ते गुळे) ०६ यात्रा--- दुर्गम----- खडतर ०७ डोळे ०८ दहाचा आकडा ०९ कातकरी १० गणपतीपुळे पहिले दर्शन ११ चमत्कार १२ बेस्ट (बॉम्बे इलेट्रिकल सप्लाय ॲन्ड ट्रॅम कंपनी) १३ पावस १ १४ पावस २ १५ पोत एक अजब उपचार १६ ऐशी वर्षांपूर्वीचा कोकणातील दुर्गम प्रवास १७ नाशिकचे पहिले दर्शन १८ देव तारी त्याला कोण मारी १९ अनुभव-तो (मृत्यू) २० आमचॊ गांव २१ आमचे घर २२ आमची म्हैस २३ आमचा ग्रामोफोन २४ आणखी काही दिव्यौषधी २५ जे कृष्णमूर्ती व मी २६ कोर्टाची पायरी २७ दंतकथा २८ दिव्यौषधी २९ मी व योग ३० मन्या ३१ मला साप चावतो ३२ मुंज ३३ मी सौ.ला स्कूटरवरून पाडतो ३४ मी ड्रायव्हिंग लायसन्स काढतो ३५ मामा ३६ माझ्या स्कुटर्स ३७ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा १ ३८ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा २ ३९ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ३ ४० माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ४ ४१ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ५ ४२ माझा धाकटा भाऊ ४३ माझा शाळेतील पहिला दिवस ४४ माझी आई ४५ माझी पाकिटमारी ४६ माझे आजोळ ४७ माझे डोर्लॅ ४८ भाऊ ४९ लक्ष्मण ५० विठ्ठल ५१ अण्णा ५२ अप्पा ५३ मी लेखक कसा झालो ५४ राम हमारा जप करे ५५ मी दादा कसा झालो