३९ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ३
मी चांगल्या मार्कांनी पास झालो होतो .त्यामुळे अॅडमिशनचा कुठच्याही शाखेला काही प्रश्न नव्हता.त्या काळी कुठल्याही शाखेमध्ये अॅडमिशन सहज मिळत असे .रत्नागिरीला गोगटे कॉलेज नुकतेच सुरू झालेले असल्यामुळे काहीच प्रश्न नव्हता .आर्ट्सला केव्हाच अॅडमिशन मिळाली असती व मी केव्हाच अर्थशास्त्राचा प्राध्यापक झालो असतो. परंतु योग काही निराळे होते मी बरीच मोठी चक्कर मारून नंतर प्राध्यापक होणार होतो .कोणाचेही काही मार्गदर्शन नव्हते.मी सायन्सला दाखल झालो . त्या वेळी सुद्धा सायन्स आर्टसपेक्षा उजवे समजले जात
असे. पदवीसाठी एफवाय व इंटर अशी दोन वर्षे नंतर युनिव्हर्सिटीची परीक्षा .नंतर ज्युनिअर व सिनिअर अशी दोन वर्षे व मग युनिव्हर्सिटीची परीक्षा असा पॅटर्न होता. एफ वाय व ज्युनिअर या वर्षी कॉलेजची परीक्षा नसल्यामुळे ही उनाडकीची वर्षे समजली जात.!! इंटर सायन्सनंतर मेडिकल किंवा इंजिनीअरिंगला विषयानुसार प्रवेश असे .मेडिकल व इंजिनीअरिंग कॉलेजेस सरकारी होती .हल्लीप्रमाणे खासगी क्षेत्राला परवानगी नव्हती .इंटर सायन्सला असताना मी पुन्हा आजारी पडलो व माझे ते संपूर्ण वर्ष फुकट गेले. कारण प्रॅक्टिकल्स होऊ शकली नाहीत .त्यामुळे मी एकोणीसशे बावन्न ऐवजी एकोणीसशे त्रेपन्न मध्ये इंटर सायन्सच्या परीक्षेला बसलो .रत्नागिरीला सेंटर नसल्याने कोल्हापूरला जावे लागले. त्या वेळी पुणे युनिव्हर्सिटी स्थापन झालेली होती .पाऊण महिना परीक्षा चालली होती.विशेषत: प्रॅक्टिकल्स मुळे उशीर झाला.मी व्यवस्थित उत्तीर्ण झालो व मग पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला .इंजिनिअर कॉलेज पुण्याला होते. मला स्मरते त्याप्रमाणे डिग्री कोर्स चार वर्षांचा होता.आर्थिक द्रुष्ट्या एवढा चा्र वर्षांचा खर्च झेपणे शक्य नव्हते.आर्टसला गेलो असतो तर बरे झाले असते असे वाटू लागले .बीएससी करावे जमल्यास पुढे एमएससी करावे न जमल्यास शाळेत नोकरी धरावी असा विचार सुरू झाला. कुठे तरी एक दोन वर्षांचा टेक्निकल कोर्स असल्यास तो करावा परंतु असा कोर्स मिळाला नाही . एवढय़ात कोणीतरी मुंबईला सेंट झेव्हियर मध्ये दोन वर्षांचा साउंड इंजिनीअरिंगचा कोर्स आहे असे सांगितले .त्यामध्ये रेडिओ सर्व्हिसिंग रेडिओ अस़ेंब्लिंग
सिने प्रोजेक्शन सिने प्रोजेक्टर रिपेअरिंग फिल्म डिस्क रेकाॅर्डिंग शिकविले जाते असे कळले .कोर्स झालेल्या एकाकडून तो कोर्स समाधानकारक आहे असे कळले .मी शेवटी विचार करून त्या कोर्सला जावे असे ठरले .मुंबई मुक्कामी दाखल झालो .दादरला माझे नात्याने लांबचे परंतु प्रेमाने जवळचे असे एक काका राहात होते .त्यांच्याकडे येऊन दाखल झालो .अॅडमिशन घेतली पास काढला झेविअरला नियमितपणे जाऊ लागलो .झेव्हीयर हे हायफाय कॉलेज उच्चभ्रूंची मुले तिथे शिक्षणासाठी येतात .स्वाभाविक मी तिथे प्रथम बुजून गेलो .थोड्याच दिवसात व्यवस्थित रुऴलो.पेइंग गेस्ट म्हणून एका ठिकाणी माझी केवळ राहण्याची व्यवस्था झाली .त्या वेळी तिथे जे शिक्षण मला मिळत होते त्याने माझे समाधान होत नव्हते .एक वर्ष मी पुरे केले .परीक्षेला बसलो उत्तम मार्काने उत्तीर्णही झालो.वर्षभरात थोडीशी थेअरी व सोल्डरिंग याशिवाय मी काही शिकलो नाही.आणखी एक वर्ष फुकट दवडावे ,कर्ज आणखी वाढावे असे वाटेना,आता पुढे काय हा प्रश्न आ वासून उभा होता. मी त्रिशंकू सारखा अधांतरी लटकत होतो .बीएससी करावे व पुढे बी एड करुन शिक्षक व्हावे, एमएससी करून चांगला क्लास मिळाल्यास प्राध्यापक व्हावे. नक्की काहीच ठरत नव्हते.घरचा आंब्यांचा धंदा पुढे मोठ्या प्रमाणात करावा किंवा अन्य काही धंदा करावा.आर्थिक तणाव होता .त्या काळी बँकांमार्फत शिक्षणासाठी कर्ज मिळत नसे.
ओळखीचे एक गृहस्थ नागपूरला इलेक्ट्रॉनिक्स संबंधित व्यवसाय करीत असत त्यांच्याकडे जाऊन अनुभव घ्यावा व मग पुढे काय ते ठरवावे असे ठरले .आणि मी नागपूरला दाखल झालो .त्यांच्याकडे सुमारे सहा ते आठ महिने होतो.राहण्याची व्यवस्था एका ओळखीच्या गृहस्थांकडे झाली होती .यांच्याकडे नागपूर रेल्वे स्टेशनवरून पार्सले सोडवून आणणे, पार्सले करणे, पोस्टात टपाल नेणे,उरलेल्या वेळात ऑफिसमध्ये बसणे ,याशिवाय दुसरे काही काम केले नाही .त्यांचा मुख्य व्यवसाय नागपूर जवळील अनेक थिएटरमधून प्रोजेक्टर दुरुस्त करणे साउंड सिस्टीम दुरुस्त करणे हा होता , त्यांनी ना मला कुठच्या थिएटरमध्ये त्यांच्या बरोबर नेले ना मला रेडियो रिपेअरिंग शिकविले .त्यांना फुकट काम करण्यासाठी एक पोरगा मिळाला होता .कंटाळून मी पंचावन्नच्या उन्हाळ्यात आमचा नेहमीचा व्यवसाय करण्यासाठी घरी आलो त्यावेळी मी एकूण निराश मनस्थितीत होतो .वय वाढत होते. वर्षे फुकट चालली होती.शिक्षणाचा काहीही व्यावहारिक उपयोग दिसत नव्हता .भाऊना माझी मानसिक स्थिती दिसत व कळत होती .ते म्हणाले तू काहीही कर किंवा करू नको परंतु मला कोणत्या तरी एका डिग्रीचे सर्टिफिकेट आणून दाखव म्हणजे माझे समाधान होईल .
आणखी एक मुंबईचा गमतीदार अनुभव आठवला .माझ्या चुलत भावाने किंग्जसर्कलवरून फ्लोरा फाऊंटन पर्यंत एका आण्यात ट्रॅमने कसे जाता येते ते मला दाखविले त्याचप्रमाणे ट्रेनने दादरपर्यंत कसे येता येते तेही शिकविले .दुसऱ्या दिवशी मी किंग्ज सर्कलवरून एक आण्यात फ्लोराफाऊंटनला गेलो.त्या वेळी दादर पश्चिम प्रभादेवी ते किंग सर्कल पर्यंत चालत जाणे कठीण अजिबात वाटत नव्हते.येताना मी चालत चालत मुंबई बघत बघत ग्रॅण्टरोड पर्यंत आलो .ग्रॅंट रोडला दादरच्या पुढची गाडी बघून चढलो अर्थात सगळ्याच गाड्या दादर!च्या पुढे जात असत. संध्याकाळची वेळ होती गाड्या त्यावेळी फास्ट असत ते मला माहिती नव्हते त्यामुळे गाडी आल्यावर मी पटकन चढलो गाडी जी सुसाट निघाली ती धाडधाड करीत दादरच्य़ा पुढे बांद्रा येथे जाऊन थांबली माझ्याजवळ तिकीट फक्त दादरपर्यंत होते समोर टीसी उभा होता पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर चर्चगेटला जाणारी गाडी उभी होती मी घाइघाईत त्या गाडीत चढलो ही गाडी पुन्हा धाड धाड करीत ग्रॅण्ड रोडला उभी राहिली आणि जिथे मी होतो तिथेच पुन्हा तासाभराने आलो.माझ्या दुर्दैवाने दोन्ही गाड्या फास्ट होत्या त्यानंतर मात्र मी इंडिकेटर नीट पुन्हा पुन्हा बघितल्याशिवाय कधीही कुठच्याही गाडीत चढलो नाही!!
१४/६/२०१८ ©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com
(लेखक अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते)