३५ मामा
माझ्या आजोबांना एकूण आठ मुले त्यापैकी सात मुली व एक मुलगा .माझ्या आईच्या लग्नानंतर मुलगा झाल्यामुळे भाऊ (वडील )हे आजोबांचे लाडके जावई होते .आजोबा हे फार जुनाट विचारांचे होते.आजोबा हे मुळचे आडिवऱ्याचे परांजपे. ते सासुरवाडीला त्यांच्या सासर्यांच्या आग्रहावरून गावकोंड येथे येऊन राहिले .आजोबा मुंबईला चांगल्या नोकरीत होते. आजीचे वडील गावखडी गावचे इनामदार होते.१८५७नंतर ब्रिटिश राज्य सर्वत्र स्थिर झाले.सर्व वतनदारांची वतने खालसा करून ब्रिटिश राज्यामध्ये सामील करण्याचे त्यांचे धोरण होते . माझ्या आजीच्या वडिलांना दादा इनामदार म्हणून सर्व ओळखत.गाव- खडी गाव त्यांना इनामात पेशव्यांकडून मिळालेला होता .गावातील सर्व जमिनीवरील कर गोळा करून त्यातील मोठा भाग स्वतःकडे ठेवून काही भाग सरकार दरबारी जमा करावयाचा असे.दादाना एक मुलगा होता. ब्रिटिशांनी जेव्हा त्यांना विचारले की तुमचा वारस कोण ते निश्चित करा. तेव्हा त्यांनी स्वाभाविकपणे मुलगा हा वारस म्हणून सांगितले .पुढे त्यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला .ब्रिटिशांनी त्यांना(दादाना) तुम्ही आहा तोपर्यंत तुमचा वतनावरील हक्क राहील .त्यानंतर वतन खालसा होईल म्हणून सांगितले .बाबांनी आजोबांना आपल्या मदतीसाठी म्हणून बोलावून घेतले.त्यांचा (आजोबा )या वतनावर हक्क राहील म्हणूनही सांगितले .सरकार दरबारी प्रयत्न केले परंतु त्याला यश आले नाही केवळ गावकोंडातील २००/४००एकर जमीन आजीच्या म्हणजे पर्यायाने आजोबांच्या नावावर राहिली .उरलेले सर्व गाव दादांच्या मृत्यूनंतर ब्रिटिश राज्यामध्ये विलीन झाले.आजोबांनी आडिवर्यातील त्यांचा हक्क सोडून दिला .मुंबईची नोकरी सोडून दिली.ते कायमचे गावकोंडात येऊन स्थायिक झाले.आजोबांचे दादांवर खूप प्रेम होते. तसेच दादांचा आजोबांवर विश्वास होता .आजी तिच्या वडिलांच्या वेळचे म्हणजे दादांचे वैभव सांगताना खुलत असे.दादा घोड्यावरुन कशी रपेट करीत त्यांच्या मागेपुढे माणसे कशी धावत नाचत असत .दहा बारा गडी कसे कायमचे कामावर असत .दादांचा दरारा, त्यांचे पालखीतून त्यांच्या वतनामध्ये हिंडणे ,इत्यादी इत्यादी .सर्व जमीन ही कुळांकडे कसण्यासाठी होती काही कुळांनी खंड देण्याचे बंद केले .पुढे कूळ कायदा झाला व सर्व जमिनी कुळांच्या मालकीच्या झाल्या. बांधाची देखभाल व्यवस्थित न झाल्यामुळे आजोबांच्या मालकीचा मळा बांध फुटून खाऱ्या पाण्याखाली गेला .आणि मामाकडे एकूण बिकट परिस्थिती निर्माण झाली.मामाच्या शिक्षकाच्या तुटपुंज्या उत्पन्नावर निर्वाह करण्याची वेळ आली .
आजोबा स्वतः शिकलेले असूनही पुत्रप्रेमापोटी त्यांनी मामाला दूर शिक्षणासाठी ठेवले नाही .गावकोंडा मधून कुठेही जवळ जाण्यासारखी शाळा नव्हती.मामा अशिक्षित राहिलेला भाऊना रुचेना .ते अस्वस्थ झाले.मामाचे वय वाढत होते .भाऊंनी आजोबांना समजावून सांगितले व मामाला शिक्षणासाठी आमच्याकडे ठेवले .मामा अशा प्रकारे सातवी व्हर्नाक्युलर फायनल पास झाला .भाऊंना शिक्षणाची अफाट गोडी होती .
मामा पुढे इंग्रजी शाळेत जावून शिकावा असे भाऊंना वाटत होते . परंतु आर्थिक पाठबळ नव्हते .भाऊंचा मामेभाऊ मुंबईला शिक्षणासाठी धडपड करीत होता .आम्ही त्यांना नाना म्हणत असू मी पुण्याला असताना त्यांच्याकडेच रहात होतो .नानांनी मामाला आपल्याबरोबर मुंबईला शिक्षणासाठी नेले .दोघेही तिथे कुणाच्या तरी आधाराने नोकरी करून शिकत होते .त्या वेळी भारतात देवीच्या साथीचे अधूनमधून थैमान असे .देवीची लस टोचून घेण्याला कोणीही तयार नसे .देवीचा प्रकोप होईल अशी भीती सर्वांना वाटत असे.देवीडॉक्टर गावात आला असे कळले की सर्व बायका लहान मुलांना घेऊन रानात जात आणि रात्र झाल्यावर घरी परत येत .मामालाही देवीची लस टोचलेली नव्हती .मुंबईत देवीची जोरदार साथ होती .मामाला सडकून ताप भरला .नानाना याला घरी कसे पोचवावे अशी काळजी पडली. मामा एकुलता एक, नानांच्या विश्वासावर त्याला मुंबईला पाठवलेला .देवीची साथ पसरू नये म्हणून कुणाही आजार्याला मुंबईबाहेर जाऊ देत नव्हते .तापाचा संशय आला तरीही त्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करीत असत .रगामध्ये गुंडाळून मामाला नाना बोटीवर आणत असताना अधिकार्यानी हटकले .त्याची आई वारली आहे अशी तार आली आणि म्हणून तो घाबराघुबरा झाला आहे असे काहीतरी सांगून मामाला गावकोंड येथे आणून आजोबांच्या हवाली केले .मामा जवळजवळ मृतवत झाला होता परंतु सुदैवाने तो वाचला .त्या काळी देवी आल्यानंतर बऱ्याच वेळा काही ना काही अपंगत्व येत असे .सुदैवाने मामाला अपंगत्व आले नाही .मामाच्या शिक्षणाला तेथेच पूर्णविराम मिळाला .मामा हा भाऊंचा मानसपुत्र होता. ही सर्व हकीकत माझ्या जन्मापूर्वीची आहे .भाऊ व मामा यांच्या कडून ती ऐकलेली आहे .मामा नेहमी म्हणे की मी भाऊमुळे शिक्षित व सुशिक्षित झालो .माणसात आलो .गाव कोंडात करमत नाहीसे झाले की मामा आमच्याकडे येत असे.आईची भावावर नितांत प्रेम व माया होती .दोघेही त्याला काहीही काम सांगण्यास कचरत नसत .
मामाला अप्पांचा स्वामी स्वरुपानंद यांचा अनुग्रह भाऊ मुळेच मिळाला .मामा हा अप्पांचा पहिला अनुग्रहित शिष्य.स्वामी स्वरूपानंदांच्या समाधीनंतर जो ट्रस्ट स्थापन झाला त्याचा मामा एक सदस्य होता .मामाचे माझ्यावर पुत्रवत प्रेम होते .तो माझ्याहून चौदा वर्षांनी मोठा होता .
मामा मुळात गोरा होता. सर्वअंगावर देवी आल्यामुळे त्याचा रंग सावळा झाला .आज मी जो काही आहे तो भाऊ, मामा व अण्णा (रत्नागिरीचे काका) यांच्यामुळे आहे .भाऊ आजारी असताना माझ्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असता परंतु मामाने मला पाचवी ते सातवी शिकवून व्हर्नाक्युलर फायनल परीक्षेला बसविले.एवढेच नव्हे तर रत्नागिरीला नेवून शाळेत नाव घालून व्यवस्थित रांगेला लावले .मी त्याच्याकडे पाचवी ते सातवी मराठी शिक्षणासाठी असताना त्याने मला काही चांगल्या सवयी लावल्या रोज मी बारा सूर्यनमस्कार व संध्या केली पाहिजे असा त्यांचा आग्रह असे .त्यामुळे कुठे तरी व्यायामाची सवय अंतर्मनामध्ये रुजली असावी .मी रोज काय अभ्यास करणार हे तो माझे मलाच ठरवण्यास काही वेळा सांगे व संध्याकाळी त्याप्रमाणे अभ्यास केला की नाही याची तो परीक्षा घेई. त्यामुळे नियोजन व त्याची अंमलबजावणी याची मला कुठेतरी सवय लागली . त्यांच्या सर्व बहिणींच्या मुलांशी त्यांचा पत्रव्यवहार असे . त्याच्या मेहुणीच्या संकटकाळी त्याने तिला बहुमोल मदत केली .त्याची मेहुणी ही माझी आतेबहीण .माझ्या मोठ्या आते बहिणीशी मामाचा विवाह झाला होता. त्याचा स्वभाव मृदू व संकटकाळी धावून जाणारा होता .त्याच्या सर्व बहिणींशी तो संबंध राखून होता . त्यांना शक्य ती सर्व मदत तो करीत असे. माझ्या आईवर त्यांचे विशेष प्रेम होते . तो निग्रही थोडासा हट्टी आणि एक कल्ली होता. केव्हाकेव्हा तो विक्षिप्त स्वभावाचा ही वाटे. तो विलक्षण सत्य प्रेमीही होता मी निवृत्त झाल्यावर एकदा त्याच्याकडे गेलो होतो .माझे वय त्यावेळेला सत्तर असावे .मामाकडे त्याच्या ओळखीचे कुणी स्नेही आले होते.सहज बोलताना त्यांनी माझे दात अजूनही या वयात चांगले आहेत म्हणून कौतुक केले .मला कवळी लावून आठ वर्षे झाली होती. मी नेहमी कवळी लावत असल्यामुळे ती अंगभूत असल्यासारखी वाटत असे . मी सहज त्यांना परमेश्वरी कृपा असे म्हणालो .त्यांनाही ते पटले. मी नंतर कवळी लावतो हे त्यांना सांगणार होतो.परंतु बोलण्याच्या ओघामध्ये मी ते विसरून गेलो. मामाला ते खोटे बोलणे आवडले नाही .तो काही बोलला नाही तरी नंतर ते ग्रहस्थ जेव्हा त्याच्याकडे आले तेव्हा त्याने उलगडा केला.व हे मला सांगण्यास तो विसरला नाही .अप्रत्यक्षरित्या माझे वागणे त्याला आवडले नाही हे त्याने निदर्शनास आणून दिले . मी अकरावीच्या वर्गात असताना टॅायफाइडने अत्यवस्थ होतो .त्या वेळी मामाने रजा काढून येऊन माझी सर्व प्रकारची शुश्रूषा केली .भाऊ मामाला पुंडलिक म्हणत असत .पुंडलीक जसा आई वडिलांच्या सेवेसाठी तत्पर असे. त्याप्रमाणे मामा आमच्या कोणाच्याही सेवेसाठी तत्पर असे. एका हाके बरोबर तो धावून येत असे .भाऊंच्या मृत्यूनंतर आई कोकणात गुळे येथे मामाच्या आधारावर जाऊन राहिली होती .तो दिर्घायुषी होता नव्वदाव्या वर्षी त्याचे देहावसान झाले .
मामा केवळ आईचा भाउ ,भाऊंचा मेहुणा व माझा मामा नव्हता तर तो त्या पलीकडे काहीतरी होता.
२०/७/२०१८©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com