०९ कातकरी
डोर्ले येथे असताना कातकरी अनेक वेळेला पाहिले .पावस मावळंगे गुळे गोळप इत्यादी गावात मी कातकरी कधी पाहिले नाहीत. कदाचित त्या वेळी येतही असतील पण मला मी जेव्हा तिकडे जाई तेव्हा दिसले नाहीत .डोर्ले गावात तरी निदान कातकरी नेहमी येत असत .आंब्याच्या दिवसांनी आंबे काजू वगैरे तयार झाल्यावर वांदरांचा उपद्रव सुरू होई.वानर असे न म्हणताना वांदर असे त्यांना म्हणत असत .अंगाने माकडा पेक्षा निदान चार पांच पट मोठा अाकार, संपूर्ण अंगावर केस, तोंड पूर्ण काळे ,व सर्व अंग पांढरे शुभ्र असा त्यांचा मेकअप असे .मादी वांदर आकाराने लहान तर नर वांदर आकाराने बराच मोठा असे.त्यांचा मोठा कळप असे. नेहमी ते कळपाने रहात .दहा पंधरा मादी वांदर एक नर वांदर असा त्यांचा कळप असे .एखादा कळप आला की या झाडावरून त्या झाडावर उड्या मार वगैरे उद्योगात आंबे कितीतरी कोसळत .केळीचे घड उचकटून टाकले जात .भाजीपाला खाऊन फेकला जाइ व संपूर्ण शेत उचकटून टाकले जाइ.काजूही त्यांच्या तडाख्यातून सुटत नसत . खाण्यापेक्षा नुकसानीच जास्त असे. प्रचंड नुकसानीमुळे गावात दहशत निर्माण होई.पत्र्याच्या डब्याचे मोठ्याने केलेले आवाज उखळी बंदुकीतून काढलेले आवाज, आरडा ओरडा करून इत्यादी मार्गांनी त्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला जाई.तेव्हा ते रानात पळत किंवा दुसऱ्या आगरात जात .थोड्या वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांचा उच्छाद चालू होई.वांदरांचे परस्परांत भांडण पाहण्यासारखे असे मोठमोठ्याने खिचखिचाट करीत ,एकमेकाना ओरबाडीत त्यांचे युद्ध सुरु असे.नर वांदराला हुप्प्या म्हणत.माद्यांचे भांडण असल्यास हुप्प्या खेकसल्याबरोबर ते थांबे. परंतु जर दोन टोळ्या समोरासमोर आल्या व जर नरांचे भांडण सुरू झाले ,तर ते किती तरी वेळ चाले ,एखादा हुप्प्या जखमी होऊन पळाल्याशिवाय ते थांबत नसे .त्यांना हिसकवण्याया कितीही प्रयत्न केला तरी ते अजिबात तिकडे लक्ष देत नसत .त्यांची लहान पोरे आईच्या पोटाला घट्ट चिकटून बसत .या झाडावरून त्या झाडावर उड्या मारताना ती पडत नसत.किंवा फांद्यांना घासली ही जात नसत .वानरांचा उच्छाद वाढला की कातकर्याना निरोप पाठविला जाई.
हे कातकरी खांद्यावर बाणांचा भाता हातात धनुष्याची काठी आणि आपल्या कबिल्यासह असत. कमरेला एक मोठा रुमाल ,करगोट्यात लंगोटी सारखा अडकवून, नंतर लुंगी सारखा गुंडाळून ठेवलेला असे याशिवाय अंगात काहीही नसे.वर्ण काळा कभिन्न असे.कातकरी आले की वांदराना ते लगेच कळे.त्यांची पळापळ सुरू होई किंवा ते कुठे तरी एकदम गुप्त होत .कातकरी त्यांना बरोबर शोधून काढीत व नंतर झाडावरून वांदरांची पळापळ व खालून कातकरी धावत आहेत असे दृश्य दिसे.घाबरून वांदर उंच झाडावर गर्द झाडींमध्ये लपून बसत .कातकऱ्यांना ते बरोबर दिसत. एकदा वांदर दिसल्यावर ते आपल्या धनुष्याला दोरी जोडत व उंच झाडावर झाडीमध्ये सरळ नेम धरून बाण सोडीत.क्षणार्धात बाण वर्मी लागून वा्ंदर धाडदिशी उंचावरून खाली पडे बाण उपसून तो पाला पाचोळयाला पुसून पुन्हा भात्यामध्ये ठेवला जाई.तडफडणाऱ्या वांदराचे पाय व हात बांधून त्यामध्ये काठी अडकवून ते तडफडणारे वांदर नेले जाई .ते वांदर केविलवाणेपणाने पाहात असे.ते दृष्य पाहावत नसे.एक दोन वांदर असे मारले की नंतर त्या वर्षी गावात वांदरांचा उच्छाद थांबे. नंतर वांदराला ठार मारून त्याला भाजून ते खात असत असे मोठ्या माणसाच्या तोंडून ऐकलेले आठवते.वांदरांची पळापळ, एखादे वांदर हेरणे ,त्याला बाण मारणे, नंतर वांदर धाडकन खाली कोसळणे व नंतर त्याला घेऊन जाणे, त्याचे केविलवाणेपणाने पाहणे, हे सर्व दृश्य मनावर फारच खोल कोरले गेलेले आहे.
त्यांना कातकरी म्हणण्याचे कारण त्यांचा कात तयार करण्याचा मुख्य व्यवसाय व वा्ंदर मारण्याचा साइड बिझनेस असावा .!! इतर गावातही ते त्या काळात केव्हा तरी येत असतीलही परंतु मला लहान असल्यामुळे ते माहीत नसावे.अजूनही वांदर आहेत ते हंगामाच्या दिवसात म्हणजेच आंबे तयार होतात तेव्हा त्रास देतात.त्यांना पळवून लावण्यासाठी उपाय योजावे लागतात .कातकरी मात्र कुठे दिसत नाहीत .
२२/५/२०१८ ©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com