Get it on Google Play
Download on the App Store

३० मन्या

मन्या हे कुणा मुलाचे नाव नाही तर हे एका बोक्याचे नाव आहे . कोकणात कौलारू घर, पोटमाळा ,आजूबाजूला जंगल सदृश्य परिस्थिती ,यामुळे उंदीर भरपूर प्रमाणात असतात .उंदरांना नियंत्रणात ठेवण्यासाठी मांजराशिवाय दुसरा कोणताही उत्तम मार्ग नाही .आमच्या घरात एखादे मांजर नेहमीच असे. मांजर कुत्र्यांनी किंवा वाघाने मारले .किंवा मेले की दुसऱ्या मांजराचा शोध घेतला जाई .बोका पाळत नसत कारण तो एक नंबरचा उनाड व नेहमी निरनिराळया ठिकाणी घरी फिरत असे .मांजरी घर सांभाळून असणारी व व्यवस्थित काम करणारी असे .तिला पिल्ले झाल्यावर ती थोडी मोठी झाली की गोणत्यात घालून कुठेतरी पोचवली जात .मांजर नसताना असे एखादे कोणीतरी सोडलेले पिल्लू आपल्याकडे येत असे. नंतर त्याला लळा लावला जाई.असेच एकदा आमच्याकडे कोणतीही मांजरी नव्हती. आम्ही मांजरीच्या शोधात होतो .त्या वेळी असेच कोणीतरी सोडलेले एक गुबगुबीत रुबाबदार सुंदर मांजराचे पिल्लू आमच्या घरात आले .मला पहिल्यापासून मांजराची आवड मला ते पिल्लू खूपच आवडले.तो बोका होता असे कळले म्हणून त्याला घरातून घालवून देण्याची आई व भाऊनी खटपट केली  .पण ते घरातून जाईना, गेले असे सकाळी वाटे ,तो ते माझ्या पांघरुणात झोपलेले आढळे.हळूहळू सगळ्यांना त्याचा लळा लागला .काळ्या करड्या व पांढर्‍याशुभ्र  केसांचे त्यांच्या अंगावरील मिश्रण छान होते .हळूहळू तो मोठा झाला. उंदरावर त्याने जरब बसवली .उनाडपणाही केला नाही .मांडलेल्या पानांमध्ये त्याने कधी तोंड घातले नाही. पायाला अंग घासणे, शेपूट उभारून म्यांव म्यांव करीत ,भूक लागली ,दूध पाहिजे, वगैरे सांगणे इत्यादी त्याचे विभ्रम व लाडिक भाव पाहण्यासारखे असत .हळूहळू त्याने आमच्या घरात चांगलाच जम बसविला . चौथी नंतर मी दोन वर्षे शिक्षणासाठी बाहेर होतो .ज्या ज्या वेळी मी घरी येई त्या त्या वेळी तो शेपूट वर करून व फुगवून माझे स्वागत करी .

अशी तीन चार वर्षे गेली मी शिक्षणासाठी दोन वर्षे बाहेरगावी होतो अधून मधून येत जात असे.भाऊंनी अाजारपणामुळे निवृत्तीपूर्व निवृत्ती घेतली .डोरले सोडून दुसरीकडे  स्थिर होण्याचे ठरले .  आता मन्याचे काय करावयाचे असा प्रश्न निर्माण झाला.आजारपणामुळे भाऊ दीड दोन वर्षे डोरले सोडून बाहेरगावी होते त्यावेळी शांताआक्कानी (अामच्या शेजारी) मन्याचा सांभाळ केला होता .आम्ही आल्याबरोबर मन्याने पुन्हा हजेरी लावली होती शेवटी त्याला आमच्याबरोबर बाहेरगावी नेण्याचे ठरले .त्यासाठी भरपूर प्रकाश हवा खेळेल व वरून कडी लावून बंद करता येईल अशी एक बांबूंच्या कामट्यांची करंडी मुद्दाम करून घेतली .आम्ही सकाळी निघणार होतो व संध्याकाळी पोचणार होतो .सकाळी त्याला खाऊ पिऊ घालून मी ,कारण माझ्याशिवाय तो कुणाचे ऐकत नसे,मानेजवळ पकडून त्याला करंडीत टाकले व बाहेरून करंडी बंद केली .प्रथम तो बुजला परंतु मी चुचकारल्यानंतर शांत झाला .प्रवासात वाटेत दोनदा वरचे झाकण उघडून मी आत हात घालून त्याला दुधाची वाटी ठेवली.मला न चावता किंवा ओरबाडता त्याने दूध प्याले प्रवासात आम्ही त्याला नेत असताना वाटेतील सर्व लोक कौतुकाने त्याच्याकडे व आमच्याकडे पाहात होते .नवीन घरी आल्यावर त्याला मोकळे सोडले .प्रथम तो बुजला परंतु नंतर एक दोन दिवसांत शांत झाला .वर्षभराने आम्ही त्याच गावात एका घरातून दुसऱ्या घरात राहायला गेलो .तिथेही तो चांगला रुळला .दोन तीन वर्षे आम्ही पावसाळ्यात आमच्या घरच्या कलमांची डागडुजी करण्यासाठी तेथे जात होतो .त्यावेळी त्याला बरोबर नेत होतो व परत आणित होतो अशी आणखी दोन तीन वर्षे गेली व मग त्यानंतर तो एक दिवस नाहीसा झाला .कुत्र्याने किंवा वाघाने त्याला पळविले असावे.अशा प्रकारे त्याचा व आमचा रुणानुबंध संपला .काही दिवस अस्वस्थता होती तो जिवाला चुटपुट लावून गेला .त्याचा व आमचा मागील जन्मांचा रुणानुबंध असावा .                               

२०/५/२०१८
प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

स्मृतिचित्रे

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
०१ यात्रा (डोर्ले ते शेटफळे) ०२ यात्रा (होडीतून) ०३ यात्रा (नाशिक ते गुळे व्हाया महाबळेश्वर) ०४ यात्रा (नाशिक ते गुळे व्हाया रनपार) ०५ यात्रा (नाशिक ते गुळे) ०६ यात्रा--- दुर्गम----- खडतर ०७ डोळे ०८ दहाचा आकडा ०९ कातकरी १० गणपतीपुळे पहिले दर्शन ११ चमत्कार १२ बेस्ट (बॉम्बे इलेट्रिकल सप्लाय ॲन्ड ट्रॅम कंपनी) १३ पावस १ १४ पावस २ १५ पोत एक अजब उपचार १६ ऐशी वर्षांपूर्वीचा कोकणातील दुर्गम प्रवास १७ नाशिकचे पहिले दर्शन १८ देव तारी त्याला कोण मारी १९ अनुभव-तो (मृत्यू) २० आमचॊ गांव २१ आमचे घर २२ आमची म्हैस २३ आमचा ग्रामोफोन २४ आणखी काही दिव्यौषधी २५ जे कृष्णमूर्ती व मी २६ कोर्टाची पायरी २७ दंतकथा २८ दिव्यौषधी २९ मी व योग ३० मन्या ३१ मला साप चावतो ३२ मुंज ३३ मी सौ.ला स्कूटरवरून पाडतो ३४ मी ड्रायव्हिंग लायसन्स काढतो ३५ मामा ३६ माझ्या स्कुटर्स ३७ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा १ ३८ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा २ ३९ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ३ ४० माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ४ ४१ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ५ ४२ माझा धाकटा भाऊ ४३ माझा शाळेतील पहिला दिवस ४४ माझी आई ४५ माझी पाकिटमारी ४६ माझे आजोळ ४७ माझे डोर्लॅ ४८ भाऊ ४९ लक्ष्मण ५० विठ्ठल ५१ अण्णा ५२ अप्पा ५३ मी लेखक कसा झालो ५४ राम हमारा जप करे ५५ मी दादा कसा झालो