Get it on Google Play
Download on the App Store

०१ यात्रा (डोर्ले ते शेटफळे)

मी पांच सहा वर्षांचा असेन त्यावेळी काका मामा गुरव मास्तर व भाऊ यांच्याबरोबर  केलेल्या प्रवासातील काही घटना लक्षात आहेत .शेटफळे हे त्या वेळी औंध संस्थानात होते .काका फिरत असताना ते शेटफळे येथे एका गृहस्थांकडे उतरले होते. त्यांचे आडनाव कुलकर्णी होते . त्या ठिकाणी त्यांच्या अनुग्रहा मुळे त्यांना शांती व समाधान मिळाले.भाउंवर त्यांचे प्रेम होते ते भाऊंचे मामे भाऊ .गीता व ज्ञानेश्वरी हे दोघांनाही प्रातस्मरणीय ग्रंथ होते .फक्त भाऊ त्यांचा अर्थ ते ज्ञान मार्ग शिकवतात असा लावीत होते.व काका ते ग्रंथ भक्ती मार्ग शिकवतात असा लावीत होते .खूप वादविवाद झाल्यावर काकांना असे वाटले की जर भाऊंना शेटफळ्याला नेऊन कुलकर्णी यांना भेटवले तर भाऊना त्यांचे म्हणणे पटेल व भाऊंचे त्यांच्या प्रमाणेच कल्याण होईल  .यासाठी शेटफळ्याचा प्रवास करावयाचा होता. ते का भांडतात ते मला मुळीच कळत नव्हते. माझे ते वयही नव्हते .वडील कुठे लांब निघाले की मुलांना त्यांच्या बरोबर जाण्याची उत्सुकता असते .मीही नेहमी हट्ट करीत असे व भाऊ माझा हट्ट पूर्ण करीत असत .दिवाळीच्या सुटीत जाण्याचे ठरले होते व मी नेहमीप्रमाणे हट्ट धरला .भाऊंनी नेहमीप्रमाणे मला बरोबर घेण्याचे ठरवले .बाकी सर्व याच्या विरुद्ध होते.एवढा लहान मुलगा त्याचे खाणे पिणे व त्याला सांभाळणे म्हणजे एक अडचण सर्वांना वाटत होती भाऊं पुढे कोणी विशेष बोलत नसत.शेवटी मला बरोबर नेण्याचे ठरले .

काही आठवणी 

१ मी मोटार प्रथमच बघितली व आश्चर्य चकित झालो मोटार चालवताना चाक उजव्या बाजूला फिरवले तर मोटार डावीकडे जाते की उजवीकडे जाते असा माझा गोंधळ होता कारण होडी चालवताना सुकाणूवाला सुकाणू  ज्या दिशेने फिरवी त्याच्या विरुद्ध दिशेला होडी वळत असे हे मी होडीतून जाताना पाहिले होते .इथे ज्या दिशेला चाक वळे त्याच दिशेला मोटार वळत असे.

२ त्या काळी एसटी नव्हती सर्व्हिस मोटारी असत त्या खासगी व लहान असत. फ्रंट सीट मागे दोन कम्पार्टमेंट नंतर एकमेकांकडे तोंड करून हौदा अशी रचना असे.हे सर्व मी प्रथमच पाहात होतो .भाऊंना प्रवासाची खूप आवड असल्यामुळे फ्रंटसीट कायमची घेत असू .फ्रंट सीटवर कोणाच्या ना कोणाच्या मांडीवर बसून मी सर्व प्रवास केला. त्यामुळे सर्व सृष्टीसौंदर्य  डोळ्यात साठवून घेता आले .माझ्या लहान मनाला सर्वच आश्चर्य  चकित करणारे  होते .

३मध्ये केव्हातरी प्रवास, रस्ता नसल्यामुळे किंवा शॉर्टकट असल्यामुळे घोड्याच्या पाठीवरून झाला बाकी सर्व चालत होते .मी फक्त घोड्यावर होतो एका ठिकाणी नदीच्या दोन्ही बाजूला सिताफळे मोठ्या प्रमाणात लागलेली होती. एवढी सिताफळाची झाडे व लटकलेली सिताफळे मी प्रथमच पाहत होतो .सर्वत्र खडक मधून वाहणारे झऱ्यासारखे पाणी चढउतार  आणि घोड्यावरून बसून प्रवास सर्वत्र सिताफळे हे दृश्य अजूनही मन:चक्षूसमोर आहे .त्याकाळी वाहतूक कठीण, लोकसंख्या कमी ,आर्थिक परिस्थिती बेताची, त्यामुळे सिताफळांना बाजार नव्हता ही सिताफळे लागवडीशिवाय उगवलेली  होती. मुद्दाम लावलेली नव्हती असे कळले .

४ कुलकर्णी यांच्या वाड्यावर पोहोचल्यावर तो प्रचंड मोठा वाडा बघून मी स्तिमित झालो कदाचित माझ्या बालमनाला तो मोठा वाटला असेल त्याला प्रचंड दिंडी होती .

५  त्या खेड्यात गाव डुकरे फार मोठ्या संख्येने व कळपाने होती. कोणत्याही कारणाने वाड्या बाहेर पडले की  ती अंगावर धावून येत मला त्यांची प्रचंड दहशत बसली होती .तोपर्यंत डुक्कर हा प्राणी मी पाहिला नव्हता .

६ मला या लोकांच्या वादविवादात काहीही गम्य नव्हते तसा मी कंटाळून गेलो त्यांच्याकडे खेळण्यासाठी लहान मुलेही नव्हती .वाड्यात फिरणे  ,बाहेर डोकावणं, डुकरे पहाणे, याशिवाय मला दुसरा उद्योग नव्हता .मी कंटाळून गेलो. 

७ कुलकर्णी आम्हाला त्यांच्या शेतावर शेत दाखवण्यासाठी घेऊन गेले होते. तिथे त्यांनी काही रोपटी  भाऊ व काका मामा यांना दाखविली ही कोणती असे विचारले त्यांनी ती टोमॅटोची म्हणून सांगितले प्रत्यक्षात ती गाजराची होती त्यावर गाजर पारखी म्हणून  मोठा हशाही पिकलेला आठवतो .

८ त्या काळी जिकडे जे पिकते ते खाण्याची पद्धत होती .आम्ही कोकणात केवळ भात खात असू. फक्त सणाला पोळी करण्यात येत असे.। सतत भात खाण्यामध्ये काही गैरही वाटत नव्हते.कंटाळाहि येत न्हवता. आम्ही आलो होतो त्या भागात केवळ भाकरी किंवा पोळी खाण्याची पद्धत होती .भाकरी व पोळी खावून मी कंटाळून गेलो .केव्हा एकदा भात खाण्याला मिळतो असे मला झाले. शेवटी मी भातासाठी रडण्याला सुरुवात केली .परतीच्या प्रवासात विटे किंवा आटपाडी येथे काकांच्या ओळखीचे एक गृहस्थ होते.तिथे जाऊन त्यांना सांगून  मला वरण भात तूप लिंबू असा भात दिला .मला झालेला आनंद व अधाश्यासारखा  मी खाल्लेला भात मला अजूनही आठवतो .

९---मला तिचाकी चालवण्याची खूप हौस होती. रत्नागिरीला केव्हा तरी आलो असताना कोणाकडे तरी ती मी पाहिली होती .भाऊंची हौस माझ्याहून काही कमी नव्हती .मी पांच सहा वर्षांचा असल्यामुळे मला लहान तिचाकी उपयोगी नव्हती .तिचाकीसाठी दुकाने हिंडताना एका दुकानात मोठी तिचाकी मिळाली. त्यांचीही ती खपत नव्हती .कारण शहरात लहान तिचाकी खपत होत्या.मोठ्या कुणी घेत नव्हते .दुकानदाराने नऊ रुपये किंमत सांगितली .भाऊ व इतरांनी सात रुपये देतो म्हणून सांगितले, घासाघीस झाली सौदा पटला नाही आम्ही दुकानातून परत फिरलो .माझे हिरमुसलेले तोंड भाऊंना  बघवेना. भाऊ परत त्या दुकानदाराकडे जाण्यासाठी फिरले. इतरजण निष्कारणच पैसे खर्च होतात, भाऊ माझे फारच लाड करतात असे म्हणत होते .भाऊ शेवटी त्या दुकानदाराकडे गेले व आठ रुपयाना सौदा पटला माझा आनंद गगनात मावेना. ही सायकल पुढे मी कित्येक वर्षे फिरवत होतो तो प्रसंग माझ्या मनात खोलवर कोरला गेला.

१०  कोल्हापूरला आल्यावर भाऊंनी  पहाटेच्या गाडीने आंब्याघाटापर्यंत जायचे व चालत चालत  सृष्टी सौंदर्य पहात घाट उतरायचा पाठीमागून काकांनी मला घेऊन यावयाचे , त्यामध्ये तीन सीट कोल्हापूर पासून पैसे भरून ठेवावयाच्या ,वाटेत या तिघांना घेऊन रत्नागिरीला जावयाचे असे ठरले. स्टॅंडवर आम्ही सर्व झोपलो होतो भाऊंनी  मी पुढे जातो तू काकांबरोबर ये असे मला सांगितले .मी गाढ झोपेत होतो नंतर केव्हा तरी जागा झालो .पाहतो तो सर्वत्र लाइट लागलेले सर्व डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपलेले .काका मला सोडून गेले की काय म्हणून मी घाबरून गेलो .काकांना शोधण्यासाठी मी प्रत्येकाच्या डोकीवरचे पांघरूण काढून बघायला लागलो .लोकांना झोपेतून उठवल्यामुळे ते वैतागले.शेवटी मला माझे काका सापडले .तेव्हा माझी उडालेली घाबरगुंडी व नंतर मला झालेला परम आनंद अजूनही आठवतो .आंबा घाटात भाऊ ,मामा व गुरव मास्तर यांना घेतले व आम्ही रत्नागिरीला आलो व तेथून  डोर्ले येथे आलो .त्यानंतर मोठेपणी खूप प्रवास केला काश्मीर ते कन्याकुमारी व कलकत्ता पुरी ते सोमनाथ असा जवळजवळ सर्व भारताचा प्रवास केला परंतु लहानपणीच्या या प्रवासाची गंमत व मजा काही वेगळीच 

ज्यासाठी ही मंडळी शेटफळे येथे गेली होती त्याचे काय झाले असा प्रश्न काही जणाना पडेल. भाऊ व काका आपल्या मतावर ठाम राहिले. कोणातही काहीही बदल झाला नाही.पुढे बऱ्याच वर्षांनी काका भक्ती मार्गा बरोबर ज्ञान मार्गही आचरू लागले  व भाऊ ज्ञान मार्गाबरोबर भक्ती मार्गही आचरू लागले किंबहुना हे दोन्ही मार्ग सारखेच महत्त्वाचे आहेत असे त्यांना उमजले .स्वामी स्वरूपानंदांचे चरित्र पुढे काकांनी लिहिले.   

याबद्दल आणखी एक गमतीशीर आठवण हे दोघे तिघे इतक्या जोरजोराने  एकमेकांशी बोलत असत की काल तुमच्याकडे कोण भांडत होते असे लोक विचारीत .त्यावर आम्ही गप्पा मारीत होतो ,असे भाऊ सांगत .आता आठवले तर असे वाटते की ते एकमेकांशी  इतक्या तावातावाने भांडत असत कि वादे वादे जायते तत्त्वबोध :या ऐवजी वादे वादे जायते शीर्षभंग: होते कि काय असे वाटत असे. परंतु मंडळी थोड्याच वेळात नॉर्मल होत असत व त्यांच्यातील अतूट प्रेमाचा धागा कधीही कमकुवत होत नसे. 

आणखी एक आठवण आम्ही ज्या कुलकर्णी यांच्याकडे गेलो होतो  त्यांच्याकडे गदिमा यांचे आजोळ होते अशी माहिती केव्हातरी गदिमा किंवा व्यंकटेश माडगूळकर यांच्या लेखनामध्ये वाचलेली आठवते .

२/६/२०१८  ©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

स्मृतिचित्रे

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
०१ यात्रा (डोर्ले ते शेटफळे) ०२ यात्रा (होडीतून) ०३ यात्रा (नाशिक ते गुळे व्हाया महाबळेश्वर) ०४ यात्रा (नाशिक ते गुळे व्हाया रनपार) ०५ यात्रा (नाशिक ते गुळे) ०६ यात्रा--- दुर्गम----- खडतर ०७ डोळे ०८ दहाचा आकडा ०९ कातकरी १० गणपतीपुळे पहिले दर्शन ११ चमत्कार १२ बेस्ट (बॉम्बे इलेट्रिकल सप्लाय ॲन्ड ट्रॅम कंपनी) १३ पावस १ १४ पावस २ १५ पोत एक अजब उपचार १६ ऐशी वर्षांपूर्वीचा कोकणातील दुर्गम प्रवास १७ नाशिकचे पहिले दर्शन १८ देव तारी त्याला कोण मारी १९ अनुभव-तो (मृत्यू) २० आमचॊ गांव २१ आमचे घर २२ आमची म्हैस २३ आमचा ग्रामोफोन २४ आणखी काही दिव्यौषधी २५ जे कृष्णमूर्ती व मी २६ कोर्टाची पायरी २७ दंतकथा २८ दिव्यौषधी २९ मी व योग ३० मन्या ३१ मला साप चावतो ३२ मुंज ३३ मी सौ.ला स्कूटरवरून पाडतो ३४ मी ड्रायव्हिंग लायसन्स काढतो ३५ मामा ३६ माझ्या स्कुटर्स ३७ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा १ ३८ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा २ ३९ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ३ ४० माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ४ ४१ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ५ ४२ माझा धाकटा भाऊ ४३ माझा शाळेतील पहिला दिवस ४४ माझी आई ४५ माझी पाकिटमारी ४६ माझे आजोळ ४७ माझे डोर्लॅ ४८ भाऊ ४९ लक्ष्मण ५० विठ्ठल ५१ अण्णा ५२ अप्पा ५३ मी लेखक कसा झालो ५४ राम हमारा जप करे ५५ मी दादा कसा झालो