Get it on Google Play
Download on the App Store

३८ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा २

काकांचे घर सुरुवातीला लहान होतॆ परंतु हळूहळू त्यांच्या व्यावसायिक प्रगतीबरोबर घरांचा आकारही वाढू लागला .त्या काळी रत्नागिरीत  टिळक आळीत भाड्याने घरे सहज मिळू  शकत होती .केव्हा घराचा मालक आला, त्याला घर पाहिजे म्हणून ,तर केव्हा मोठे घर पाहिजे म्हणून ,ते घर बदलत असत . दहा पंधरा वर्षात त्यांनी चार पाच वेळा तरी घर बदलले असेल.

त्या काळी रत्नागिरीला घरांची रचना  साधारणपणे पुढील प्रकारे असे.रस्त्याला लागून अंगण लहान किंवा मोठे, त्यानंतर बैठे घर,बहुतेक  घरे कौलारू असत .माडीचे घर क्वचितच आढळे.बाळासाहेब खेर यांचे घर माडीचे होते. आणखी एक घर माडीचे असलेले आठवते .घराच्या पाठीमागे थोडीशी मोकळी जागा असे, त्यानंतर विहिर,त्यांवर बहुदा पायरहाट, क्वचित बैलरहाट असे . हात रहाट प्रत्येक विहिरीवर असेच .मोट वगैरे प्रकार कोकणात नसे. तो घाटावर असे .रहाटा नंतर नारळी पोफळीची बाग असे.त्यातून मागे जाण्यासाठी पायवाट असे.हातरहाट इमर्जन्सीसाठी असे.नेहमी पायरहाट किंवा बैल रहाट यांचा वापर केला जाई.  बागेला पाणी देणे हा एक रोजचा कार्यक्रम असे .त्यानंतर बाग संपल्यावर कंपाउंडच्या अगदी कडेला संडास असे. संडास  टोपलीचा असे.त्याची सफाई म्युनिसिपालिटी तर्फे, भंग्यामार्फत दररोज केली जाई.क्वचित  काही ठिकाणी सफाईचे काम गुरांवर सोपवलेले असे !तिथे एकूण स्वच्छतेच्या नावाने आनंदच असे .हल्ली सारखी ड्रेनेज व्यवस्था नव्हती. उघडी गटारे असत .घरात संडास कमोड ही कल्पना स्वप्नातही नव्हती.मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातून असे संडास असत. प्रातर्विधीसाठी सकाळी बरेच चालत जावे लागे. बरीच बिर्‍हाडे असल्यास क्यूमध्येही उभे राहावे लागे.खेड्यांमध्ये तर होल वावर इज अव‍र्स अशी परिस्थिती असे. हल्ली सेफ्टी टँकचे संडास ही कल्पना हळूहळू खेड्यातही येऊ लागली आहे . संडास व घरात संडास ही कल्पनाही हळूहळू येऊ लागली आहे.  

परिस्थितीच्या रेटय़ामुळे मी अभ्यास करीत असे. परंतु मुळातच अभ्यासू अशी वृत्ती नव्हती .अथपासून इतिपर्यंत नेहमीच मिडल सेकंड क्लास मार्क मिळतील एवढाच  मी अभ्यास करीत असे .कुठे मी चमकलो नाही. शाळेतही कोणत्याही अॅक्टिविटीज मध्ये मी भाग घेत नसे .कदाचित आर्थिक परिस्थिती व त्याचे दडपण यांमुळे तसे होत असावे .कोणत्याही कारणामुळे असो मी जरा बुजरा होतो .

भाऊ आजारपणामुळे लवकर निवृत्त झाले. मराठी शाळेतील शिक्षक त्यांचा पगार तो काय असणार व त्यातून पेन्शन ते किती मिळणार! त्यांना फक्त वीस रुपये पेन्शन मिळत असे .परिस्थितीशी ते त्यांच्या कुवती प्रमाणे झगडत होते .त्यांनी आंब्याचा व्यवसाय सुरू केला होता .त हळूहळू जम बसत होता .लोकांच्या आंब्याच्या बागा एका वर्षांसाठी करणे, म्हणजेच हंगामात झाडावरील आंबे काढणे व त्यासाठी अगोदरच काही विशिष्ट रक्कम भरणे.आंबे काढून ते पुणे मुंबईला पाठवणे ,त्यासाठी जो दर दलालांकडून पाठविला जात असे त्याला टीप असे म्हणत असत . पैसे साधारणपणे दलालांकडून बुडविले जात नसत .आंब्याच्या बागा दूरवर असत. दर तीन चार दिवसांनी प्रत्येक बागेतील आंबे काढावे लागत.त्यामुळे रोज कुठल्या ना कुठल्या भागात अांबे काढण्यासाठी जावे लागे .त्या काळी वाहतुकीचे साधन बैलगाडी हे होते. हल्ली सारखे सर्व खेड्या पाड्यातून रस्ते झालेले नव्हते. रत्नागिरीशी पूल न झाल्यामुळे कनेक्टिव्हिटी नव्हती .पाच सात मैल सकाळी उठून गड्यांबरोबर चालत जाणे, दिवसभर झाडाखाली त्यांच्याबरोबर काम करणे ,नंतर आंब्यांची , रस्ता असेल तिथपर्यंत वाहतूक करणे, घरीआणल्यावर पेट्यांमध्ये भरून पुन्हा ते मुंबईला पाठवणे ,इत्यादी मोठा खटाटोप असे.हल्ली सारखे पाच पन्नास मैला वरच्या बागाही सहज करणे, टेम्पोमधून गडी व प्लॅस्टिक क्रेट नेऊन परत सहज संध्याकाळी घरी येणे, अशी परिस्थिती नव्हती. पूर्वी गलबतामधून मुंबईला आंबे पाठविले जात  .गलबते पूर्ण लोड झाल्याशिवाय सुटत नसत त्यांमध्येही वेळ जाई.  गलबते मुंबईला पोचणे, अनुकूल वाऱ्यांवर अवलंबून असे .पाऊस वादळ इत्यादी अनेक कारणामुळे  माल उशीरा पोचे कुसून जाई  .नुकसान होई.ट्रक थोडे असत त्यांची भाडी जास्त असत. तेही पूर्ण लोड झाल्याशिवाय  सुटत नसत. नुकसान होई.  नुकसान कमी करण्यासाठी भाऊंनी उपधंदा म्हणून आंब्याची साटे घालणे रस आटवणे  इत्यादी व्यवसाय सुरू केले.भाऊंनी  अनेक प्रयोग केले शेवटी हळूहळू या धंद्यांत आमचा जम बसत होता.

मला उन्हाळ्याची सुटी असे मी केव्हा येतो म्हणून भाऊ माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असत .दोन तीन महिने आम्ही सकाळी सहापासून रात्री नऊ दहापर्यंत राबत असू.बरोबरची मुले सुटी खेळून, नातेवाईकांकडे जाऊन ,दंगा मस्ती उनाडक्या करून, साजरी करत .मला नोकरी लागून मी शिक्षकांच्या पेशात येईपर्यंत उन्हाळ्याची सुट्टी मला कधीही एन्जॉय करता आली नाही .त्या काळी हल्लीसारखी मार्कांची रेस व निरनिराळ्या क्लासेसचे  फॅड सुदैवाने नव्हते !!

मुले खऱ्या अर्थाने सुट्टी एन्जॉय करीत .मार्कांची रेस व निरनिराळ्या क्लासेसचे वेड य़ांमध्ये हल्लींची व्यस्त मुले पाहिल्या नंतर त्यांची कीव करावीशी वाटते .मी मात्र विशिष्ट परिस्थितीमुळे  सुटी वेगळ्या प्रकारे एन्जॉय करत होतो .माझे शिक्षण पूर्ण होऊन मी नोकरीला लागेपर्यंत हा सिलसिला चालू होता . 

शिक्षण, वारांवर जेवण  वगैरे व्यवस्थित चालू होते .मी अकरावी मध्ये आलो त्या वेळी रत्नागिरीला टॅायफाइडची मोठी साथ पावसाळ्यात आली. मला टायफाईड झाला.त्यात डिसेंटरी झाली. महिनाभर खूप आजारी होतो.शुश्रूषेसाठी मामा आला होता कारण आई वडिलांच्या आजारपणामुळे येऊ शकत नव्हती.लहान मुलांचे आई करते त्याप्रमाणे मामाने माझे सर्व काही केले .त्या काळी टायफाईड वर आजच्यासारखी काहीही औषधे नव्हती ताप पुरता जाईपर्यंत खाण्यावर अतिशय बंधने येत जवळजवळ लिक्विड फूडवर राहावे लागे.ताप उलटू नये म्हणून पुढे एक दोन महिने जपावे लागे.मृत्यू प्रमाणही बरेच होते .मी अत्यवस्थ होतो परंतु काकांची औषध योजना व संजीवनी औषधे यामुळे बरा झालो .

बरा झाल्यावर विश्रांतीसाठी महिनाभर गुळ्याला माझ्या घरी गेलो .या सर्वांमध्ये अकरावीची पहिली टर्म गेली .दुसऱया टर्ममध्ये ज्यादा अभ्यास करून परीक्षेला बसावे की या वर्षी ड्रॉप घ्यावा असा प्रश्न होता .अप्पांना(स्वामी स्वरूपानंद पावस भाऊंचे लहानपणापासूनचे परमस्नेही व गुरू बंधू ) भेटण्यासाठी गेलो असता त्यांनी शरीरम् आद्यम् खलु धर्म साधनम् असे सांगितले व या वर्षी ड्रॉप घ्यावा व प्रकृती तंदुरुस्त करावी असे सुचविले .सकाळी व्यायामानंतर खिमट (हातसडीच्या तांदुळाचा खूप शिजवून केलेला भात ते खूप पौष्टिक असते त्यात भरपूर तूप व मेतकूट घालून लाजवाब चव येते  नेहमी आमच्याकडे न्याहरीला तेच असे .)नंतर केवळ विश्रांती संध्याकाळी समुद्रावर दोन तीन मैल मोकळ्या हवेत रपेट ,अशी दुसरी टर्म घालविली व उन्हाळ्याच्या सुटीनंतर पुन्हा अकरावीसाठी रत्नागिरीला दाखल झालो.त्या काळी बरीच मुले अभ्यास न झेपल्यामुळे शाळा सोडून देत असत .मी टर्मभर घरी राहिल्यामुळे बऱ्याच नातेवाईकांचा व इतरांचा तसा समज झाला !वर्षभर न गेल्यामुळे वार अर्थातच सुटले होते. पुन्हा वारावर जेवणाला जाण्यासाठी मला उत्साह नव्हता आमची आर्थिक परिस्थिती ही जरा सुधारलेली होती त्यामुळे मी वार सोडून दिले व खानावळीत जेवण्यासाठी जाऊ लागलो त्याचप्रमाणे शेअरि्गमध्ये एक खोलीहि घेतली व स्वतंत्र राहू लागलो .अर्थातच काकांचे माझ्यावर लक्ष होतेच .यथावकाश अकरावीच्या परीक्षेला बसलो व मध्यम द्वितीय  श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालो.

रत्नागिरीला गोगटे कॉलेज सुरू होऊन दोन वर्षे झाली होती त्यामुळे पुढील उच्च शिक्षणाचा विशेष प्रश्न नव्हता .त्या काळी कॉलेजमध्ये अॅडमिशन सहज मिळत असे. हल्लीसारखी गुंतागुंत नव्हती.

आणखी एक गमतीशीर आठवण अठ्ठेचाळीस सालापर्यंत मॅट्रिकची परीक्षा होती .ती बॉम्बे युनिव्हर्सिटी मार्फत घेतली जात असे.एकूण पन्नासमध्ये प्रथम बोर्डाची स्थापना होऊन एसएससी परीक्षा सुरू झाली .मी पहिल्या  वर्षीच बसलो असतो परंतु आजारपणामुळे दुसऱ्या वर्षी बसलो.जी मुले पहिल्या वर्षी एसएससीला बसली होती त्यांना नंतर नापासचे पास व पासचे नापास अश्या तारा आल्या होत्या !!बराच गोंधळ झाला होता असे आठवते .त्यामुळे मी विनोदाने म्हणत असे की नशीब त्या वर्षी मी बसलो नव्हतो नाहीतर बोर्डाने मी प्राध्यापक झाल्यावर मला तुम्ही एसएससी फेल आहात असे कदाचित कळविले असते !!

१३/६/२०१८  ©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com
(लेखक  अर्थशास्त्राचे प्राध्यापक  होते)

स्मृतिचित्रे

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
०१ यात्रा (डोर्ले ते शेटफळे) ०२ यात्रा (होडीतून) ०३ यात्रा (नाशिक ते गुळे व्हाया महाबळेश्वर) ०४ यात्रा (नाशिक ते गुळे व्हाया रनपार) ०५ यात्रा (नाशिक ते गुळे) ०६ यात्रा--- दुर्गम----- खडतर ०७ डोळे ०८ दहाचा आकडा ०९ कातकरी १० गणपतीपुळे पहिले दर्शन ११ चमत्कार १२ बेस्ट (बॉम्बे इलेट्रिकल सप्लाय ॲन्ड ट्रॅम कंपनी) १३ पावस १ १४ पावस २ १५ पोत एक अजब उपचार १६ ऐशी वर्षांपूर्वीचा कोकणातील दुर्गम प्रवास १७ नाशिकचे पहिले दर्शन १८ देव तारी त्याला कोण मारी १९ अनुभव-तो (मृत्यू) २० आमचॊ गांव २१ आमचे घर २२ आमची म्हैस २३ आमचा ग्रामोफोन २४ आणखी काही दिव्यौषधी २५ जे कृष्णमूर्ती व मी २६ कोर्टाची पायरी २७ दंतकथा २८ दिव्यौषधी २९ मी व योग ३० मन्या ३१ मला साप चावतो ३२ मुंज ३३ मी सौ.ला स्कूटरवरून पाडतो ३४ मी ड्रायव्हिंग लायसन्स काढतो ३५ मामा ३६ माझ्या स्कुटर्स ३७ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा १ ३८ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा २ ३९ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ३ ४० माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ४ ४१ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ५ ४२ माझा धाकटा भाऊ ४३ माझा शाळेतील पहिला दिवस ४४ माझी आई ४५ माझी पाकिटमारी ४६ माझे आजोळ ४७ माझे डोर्लॅ ४८ भाऊ ४९ लक्ष्मण ५० विठ्ठल ५१ अण्णा ५२ अप्पा ५३ मी लेखक कसा झालो ५४ राम हमारा जप करे ५५ मी दादा कसा झालो