३१ मला साप चावतो
१९४५ सालची गोष्ट आहे .मी बारा वर्षांचा होतो .त्याच वर्षी मी प्रथमच रत्नागिरीला इंग्रजी शाळेत आलो होतो . मराठी सातवी पास झाल्यावर स्पेशल क्लासमध्ये अॅडमिशन घेतली होती .पाचवी सहावी व सातवी या तीन वर्षांतील इंग्रजी ,स्पेशल क्लासमध्ये एकाच वर्षात शिकविले जाई. त्याकाळी स्पेशल क्लास म्हणून एक क्लास असे.जी मुले मराठी सातवी पास झाल्यानंतर इंग्रजी शाळेत येत त्यांच्यासाठी हा क्लास असे.जे इंग्रजी शाळेमध्ये सुरवातीपासून म्हणजे पाचवीपासून येत त्यांना पाचवीपासून इंग्रजी शिकविले जाई.त्याना शंभर मार्कांचा पेपर इंग्रजीचा असे. इतर विषय मराठीमध्ये असत. त्याकाळी संपूर्ण इंग्रजी मीडियम मुंबई पुणे यासारखी मोठी शहरे सोडली तर जवळजवळ कुठे नव्हतेच.मी खेडेगावातून मराठी सातवी होऊन आलेला असल्यामुळे मला स्पेशल क्लास अनिवार्य होता .
मी माझ्या काकांकडे राहायला होतो .आम्ही टिळक आळीत रहात होतो .घराची रचना अशी होती .रस्त्यातून आत शिरले की प्रथम छोटेसे अंगण नंतर दोन पायऱ्या चढल्यानंतर पडवी ,पुन्हा दोन पायर्या चढल्या की ओटी व नंतर घराचा इतर भाग होता.
वीज शहरांमध्ये आलेली होती परंतु सर्व घरांमध्ये वीज घेतलेली नव्हती.रत्नागिरी हे सुधारलेले खेडे थोडेसे मोठे खेडे अशा स्वरूपाचे शहर होते. सुरुवातीला रस्त्यावरही विजेचे दिवे नव्हते. काकांच्या घरात वीज होती .घर भाड्याने घेतलेले होते .मला लहान पणापासून हळू चालणे हे माहितच नव्हते .काकांच्या घरात जाताना मी धावतच पायऱ्या चढत असे.
खेडेगावांमध्ये जरी अनेक प्रकारचे साप सापडत असले ,तरी शहरांमध्ये ते सहसा सापडत नसत.त्या दिवशी रात्री आठ वाजले होते. रस्त्यावर नेहमीप्रमाणे काहीही प्रकाश नव्हताच .मी अंगणात काहीतरी करीत होतो.एवढ्यात माझ्या काकूने जेवणासाठी हाक मारली.नेहमीप्रमाणे मी धावत पायऱ्या चढून ओटीवर आलो .अंगणातील दुसऱ्या पायरीवर मला माझ्या पायाला काहीतरी चावले असे वाटले.मी वाकून दिव्याच्या उजेडामध्ये बघितले तर तिथे काही चावल्याची खूण दिसली नाही. किंचित काही तरी तिथे चावल्यासारखे वाटत होते .काकांनी मला अरे काय झाले म्हणून विचारले ?मी त्यांना मला काहीतरी चावले म्हणून सांगितले .काका लगेच टॉर्च घेऊन सावधपणे पायऱ्या बघत आले .त्यांना दोन पायर्यांच्या सांध्यांमध्ये एक हातभर लांबीचा साप दिसला .त्यांच्या हातात काठी होतीच लगेच त्यांनी त्य़ाला ठार मारले .मला आता त्या सापाचे नाव आठवत नाही परंतु बहुधा तो कांडर नावाचा विषारी साप होता .आजूबाजूच्या चारपाच घरातील माणसे जमा झाली.साप नक्की कांडर जातीचा आहे हे निश्चित झाले.त्या सापाची अशी ख्याती होती की तो चावल्यानंतर जर दिवसा चावला तर सूर्यास्तापर्यंत मृत्यू निश्चित व जर रात्री चावला तर सूर्योदयापर्यंत मृत्यू निश्चित.जिवंत राहिला तर मांत्रिकाची व ज्याला चावला त्याची पुण्याई .
आता मलाही काहीतरी निश्चितपणे जोरात चावले असे वाटू लागले.मला प्रत्येक जण दुखते का? कितपत दुखते? तोंडाला कोरड पडली का? पायाला मुंग्या आल्या का ?घाम येतो आहे का ?चक्कर आल्यासारखे वाटते का? जिभेला मुंग्या येत आहेत का? वगैरे गोष्टी विचारू लागले . मला तसे काही जाणवत नव्हते. त्यामुळे मी त्यांना नक्की नाही, किंवा नक्की हो ,असे उत्तर न देता गुळमुळीत उत्तरे देत होतो.सगळ्यांचा गलका ऐकून मलाही काहीतरी होत आहे असे वाटू लागले .त्याकाळी रत्नागिरीमध्ये सर्पदंशासाठी सरकारी दवाखान्यात किंवा खासगी दवाखान्यात जाऊन विष विरोधक इंजेक्शन घेण्याची सोय नव्हती .कदाचित हाफकिनने विषावर उतारा म्हणून इंजेक्शन काढलेलेही नसावे.सगळ्यांचे वाढलेले जेवण तसेच जागच्या जागी गार होऊन गेले.काका घाबरून गेले. आता काय उपाय करावा हेही कुणाला सुचेना.त्याकाळी उपाय म्हणजे मांत्रिक बोलावणे व तो सांगेल त्याप्रमाणे उपचार करणे एवढाच होता.वरच्या अाळीला एक मांत्रिक राहतात असे कोणीतरी सांगितले .त्याकाळी असा मांत्रिक पंचक्रोशीत एखादा तरी असेच.मांत्रिकाला मंत्राची पाळणूक व्यवस्थित करावी लागे.त्या मंत्रांचा जप ठरलेल्या वेळी ठरलेल्या प्रमाणात रोज करावा लागत असे.त्याशिवाय काय खावे,केव्हा खावे, काय प्यावे ,कुठे जावे,कुठे जाऊ नये, कुणाच्या हातचे खाऊ नये, कुणाला शिवू नये,वगैरे अनेक प्रकारची बंधने जो मांत्रिक असे त्याच्यावर असत.त्याशिवाय मांत्रिकाला पाळेमुळे व इतर औषधेही माहिती असत .तो सांगेल त्याप्रमाणे आचरण व उपाय करावे लागत. माझे काका स्वतः डॉक्टर होते तरीही त्याकाळी कुठलीहि औषधे विषावर उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा नाइलाज होता.
मांत्रिकाला पाचारण करण्यात आले .ते आल्याबरोबर त्यांनी एकूण परिस्थितीचा ताबा घेतला .मेलेला कांडर बघितला. त्याला कुठेही फेकून देऊ नका म्हणून सांगितले.त्यांच्या सांगण्यावरून त्याला सुरक्षित ठेवण्यात आले.कांडरावर एक टोपली व त्यावर दगड ठेवण्यात आला.आमच्या घरामागे विहीर होती. विहिरीवर पाय रहाट होता .त्यांनी कोणाला तरी पायरहाटावर बसून पाणी काढण्याला सांगितले .मला पाथरीवर बसविण्यात आले.कोणीतरी एक छोटीशी घागर आणून मांत्रिक बुवांजवळ दिली .पायरहाट काका ओढू लागले .पन्हळीतून पाणी पडू लागले .मांत्रिक बुवा पन्हळी खाली घागर धरीत ती भरली की त्यावर हात धरुन तोंडाने काहीतरी मंत्र पुटपुटत व मग ती घागर माझ्या डोक्यावर उपडी करीत .अशा तर्हेने काम जोरात सुरू झाले .आजूबाजूला पाचपंचवीस बघे मंडळी होतीच .पाच दहा घागरी डोक्यावरती ओतल्या की मांत्रिक बुवा मला विचारीत थंडी वाजते का ? मी नेहमी गार पाण्याने आंघोळ करीत असे .ती सवय नाशिकला आल्यावरही कायम होती .टाकीच्या पाण्याखाली भर थंडीमध्येही शॉवरखाली उभे राहून पाच सहा वाजता सकाळी मी स्नान करीत असे .ही सवय जवळजवळ पासष्ट वर्षांपर्यंत सुरू होती .मुळात कोकण ,उन्हाळे दिवस ,त्यात गार पाण्याची सवय,त्यामुळे अंगावर पाणी पडत असताना छान वाटत होते .पाच पंचवीस घागरी अंगावर पडल्या तरी मला थंडी वाजेना.मंतरलेले पाणी डोक्यावर पडत असताना थंडी वाजणे हा विष उतरू लागल्याचे चिन्ह असे .
विहिरीवर विजेचा दिवा होता.त्याचा फिकट पिवळा प्रकाश पडला होता .काका सतत पायरहाट चालवीत होते .दोणीमध्ये पाण्याची धार सतत पडत होती .आजूबाजूला एखादे नाटक पाहावे त्याप्रमाणे पाचपंचवीस लोक उभे होते. त्यामध्ये पुरुष स्त्रिया लहान मुले असे सर्व प्रकार होते.आसपास जसे लोकांना कळत होते तशी हळूहळू गर्दी वाढत होती .माझ्या अंगावर गार पाण्याच्या घागरीच्या घागरी उपड्या होत होत्या .मधून मधून मांत्रिक बोवा थंडी वाजते का? म्हणून विचारीत होते .अजून थंडी वाजत नाही म्हणजे विष जोरदार आहे असे लोक पुटपुटत होते .मला गार पाण्यामध्ये छान वाटत होते .मांत्रिक बुवा घागरी ओतून ओतून दमले. काका पायरहाट ओढून ओढून दमले.मी काही दमेना!!विष जोरदार आहे .प्रभाकरचे काही खरे नाही.असे सर्वांना वाटू लागले.शेवटी मी कंटाळलो. जरी थंडी वाजत नव्हती तरी मी थंडी वाजते म्हणून सांगितले .मांत्रिकबुवानी त्यानंतर पाच दहा घागरी माझ्या डोक्यावर ओतून समाधानाचा सुस्कारा सोडला .नंतर त्यांनी जिथे चावले होते त्यावर लावण्यासाठी एक पाळ दिले.ते उगाळून सकाळ संध्याकाळ सात दिवस लावायचे होते. रात्री काय खावे काय खावू नये यासंबंधी सूचना दिल्या .या गडबडीमध्ये दोन तास निघून गेले होते .जेवण सर्वांची वाट पाहात होते.पहाटेच्या वेळेला जरा लक्ष ठेवा, काही गडबड वाटली तर मला बोलवा ,असे सांगून मांत्रिक बुवा निघून गेले.जाताना काळजी करू नका ,विष उतरलेले आहेअसे सांगून त्यांनी सर्वाना आश्वस्त केले.
एव्हाना मला जबरदस्त झोप येऊ लागली होती .मी जेवणामध्ये मांत्रिक बुवांच्या सांगण्याप्रमाणे मला दिले तेवढे खाल्ले आणि लगेच झोपी गेलो. रात्रभर काकांना झोप नव्हती.हे मला नंतर केव्हातरी कळले.ते मधून मधून येऊन माझ्या छातीला हात लावून एकूण प्रकृती कशी आहे ते पाहत होते .विशेषतः पहाटे घरातील मोठी मंडळी माझ्यावर विशेष लक्ष ठेवून होती.हे मला नंतर एक दोन दिवसांनी कळले. सकाळी मी उठल्यानंतर ठणठणीत होतो.शेजारपाजारचे लोक मला दुसर्या दिवशी कौतुकाने पाहात होते .ज्यांना हे कळले ते नंतर येऊन चौकशी करून मला पाहून जात होते .मांत्रिक बुवा दुसर्या दिवशी येऊन मला पाहून गेले. त्या कांडराला जाळून टाकण्यात आले .मी दुसऱ्या दिवशी शाळेत नेहमीप्रमाणे व्यवस्थित गेलो.चार आठ दिवस मी कौतुकाचा विषय होतो.घरी गेल्यावर भाऊना सांगण्यासाठी मला एक गोष्ट मिळाली.लोकांना चघळण्यासाठी एक विषय मिळाला .
मला उड्या मारीत सगळीकडे जाण्याची सवय असल्यामुळे,तो कांडर मला फक्त स्पर्श करू शकला, चावू शकला नाही असे दिसते .
त्याच्या नंतर असंख्य प्रकारचे साप पाहिले आणि मारले सुद्धा परंतु ही आठवण मनात कोरली गेली. ती रात्र, ती विहीर, तो मांत्रिक, तो मी, ते पाणी ,तो प्रेक्षकगण, तो मिणमिणता विजेच्या दिव्याचा प्रकाश ,सर्व चित्र मनाच्या कॅनव्हासवर अजूनही स्पष्ट आहे .
२७/११/२०१८©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com