Get it on Google Play
Download on the App Store

२८ दिव्यौषधी

हिमालयातून कुणी बाबा आले आणि त्यांनी काही दिव्य औषधे आणली आहेत असा काही प्रक्रार नाही  .नेहमीच्या पहाण्यातील व  वापरातील वस्तू आहे .आहे म्हणण्यापेक्षा होती .भूतकाळ वापरणे जास्त योग्य ठरेल .हल्ली ही वस्तू कुणी वापरत नाही.घरातही दिसत नाही.बहुधा  लोकांच्या स्मरणातून गेली असावी.आमच्या लहानपणी म्हणजे सुमारे पंच्याहत्तर वर्षांपूर्वी ही वस्तू नेहमीच्या वापरातील होती .ज्याला आजीबाईचा बटवा असे म्हणता येईल त्याचा तो एक अविभाज्य भाग होता .त्याचा मी आतापर्यंत म्हणजे वयाच्या पंचाऐंशी वर्षांपर्यंत वेळोवेळी केलेला वापर व त्याचा मला आलेला आश्चर्यजनक गूण सांगावा  असे वाटत आहे .

सीन १--संध्याकाळची वेळ होती माणसाला माणूस दिसेल न दिसेल अशी परिस्थिती होती .त्यावेळी आम्ही म्हणजे आई  वडील व मी कोकणात पावस येथे स्वामी स्वरूपानंदांच्या घरात राहत होतो.

माझे वय पंधरा सोळा वर्षे होते .अप्पांच्या(स्वामी स्वरूपानंद ) घरी येताना गणेश मंदिराच्या पुढे थोडासा चढ लागतो .मी व माझ्या बरोबर असलेले दोन गडी घरी लवकर जाण्याच्या ओढीने भराभर चालत होतो.आमच्या पुढे चढावर एक बैलगाडी जात होती .बैलगाडीच्या पुढे जाण्याच्या नादात मी डावीकडून पुढे जात असताना डावीकडच्या बैलाच्या जरा जास्तच जवळ आलो होतो .तेवढ्यात त्या बैलाचा पाय दगडावरून सरकला आणि त्याने लाथ झाडली .नाल मारलेला त्याचे पाऊल माझ्या गुडघ्यांवर येऊन जोरात आपटले .लाथ निसटती असावी परंतू मला ती फारच जोरात वाटली असावी .मी कळवळून मटकन खाली बसलो .बरोबरच्या गड्यांनी मला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु मला उठवेना.थोडी कळ जिरल्यावर मी गड्यांच्या आधाराने उभा राहिलो व हळुहळू घरी आलो.माझा गुडघा बऱ्यापैकी सुजला दुसऱ्या दिवशी तर चालता येईना अशी परिस्थिती झाली .त्याकाळी आधी वाहतुकीच्या सोयी नव्हत्या रत्नागिरीला जाणे बरेच बिकट होते.रत्नागिरीलाही विशेष  वैद्यकीय सुविधा नव्हत्या .वैद्यकीय प्रगतीही कमी होती .  .हल्ली सारखी उठसूट डॉक्टरकडे जाण्याची फॅशनही  नव्हती .घरात ताजे बिब्बे  नेहमीच असत.आईने बिब्बा व हळद  समप्रमाणात उगाळली नंतर त्यात  एक दोन थेंब गोडय़ा तेलाचे टाकले व सर्व मिश्रण पळीमध्ये घेतले.चुलीवर त्याला एकदम कडकडीत करून सळपाने ते माझ्या गुडघ्यावर लावले. तीन चार दिवस अशा प्रकारे सकाळ दुपार संध्याकाळ खत्ता करून तो गरम गरम लावल्यावर माझा पाय पूर्णपणे बरा झाला .अर्थात हाड फ्रॅक्चर झाले नव्हते केवळ मुका मार होता म्हणूनच हे शक्य झाले असावे .त्या काळी स्नायूदुखी मुका मार यावर हळकुंड बिब्बा यांचा गरम खत्ता लावणे हे घरोघर सामान्य होते .बिब्बा तेलाने भरलेला तेज:पुंज असावा .हळकुंड ही ताजे असावे व त्याला जितके फाटे फुटलेले असतील तेवढे चांगले .असा बिब्बा व हळकुंड जीवन शक्ती संपन्न असते व त्यामुळे त्याचा गूण लवकर येतो .असे आईने सांगितलेले आठवते .त्यानंतर दोन चार वेळा सहज काही ना काही कारणाने हा प्रयोग कुठे ना कुठे माझ्यावर केला गेला असावा .पायात काटा गेला असताना काटा काढल्यावर त्यावर बिब्ब्याचे तेल लावणे व नंतर मस्तकात कळ जाईपर्यंत तो शेकणे ही तर नेहमीचीच गोष्ट होती . बिब्बा नुस्ता लावला तर गुण लवकर येतो परंतु जखम होण्याचा ती वाहण्याचा  संभव असतो म्हणून नेहमी खत्ता करून लावावा असेही आईने सांगितलेे आठवते .वृद्धपणी आई माझ्याकडे नाशिकला आली . ती इथे काही दुखले खुपले की स्नायू दुखी वर नेहमीच नुसता बिब्बा  लावीत असे .

सीन २---मध्यंतरी मी बिब्बा नावाचे औषध विसरून गेलो होतो.एकोणीसशे चौसष्ट सालातील गोष्ट आहे .एका एकी माझा उजवा खांदा खूप दुखू लागला .हात पंचेचाळीस  डिग्रीपर्यंत उचलला जाई.गंजीफ्रॉक शर्ट घालणे केस पुसणें अशक्य झाले या सर्वांसाठी मिसेसची मदत घ्यावी लागे.माझे मेहुणे डॉक्टर होते . त्यांनी मला एकदोन डॉक्टरांकडे नेले .त्यावेळी सिटी स्कॅन सोनोग्राफी वगैरे काही नव्हते.एक्सरे काढला .फ्रोजन शोल्डर असे निदान झाले .कोणत्यातरी इलेक्ट्रिक मशीनने अर्धा तास मसाज अशा प्रकारे दहा ते पंधरा सिटिंग्स करावी  असा सल्ला देण्यात आला.त्यानंतरही नक्की बरे वाटेल अशी खात्री कुणीही देईना .त्यावेळी माझ्याजवळ सायकल होती सायकल चालवण्यासाठी काही त्रास होत नव्हता .काय करावे तिशीतच असे झाले तर पुढे काय होणार व्यवसाय प्राध्यापकाचा खडूने फळ्यावर  कसे लिहिणार असे अनेक प्रश्न डोक्यात घोळत होते आणि अकस्मात बिब्बा आठवला .किराणा दुकानासमोर सायकल उभी केली त्यांच्या जवळ बिब्बा व हळकुंड मागितले .त्या काळी किराणा दुकानदारही( अर्थात काही) बिब्बा  ठेवीत असत . हल्ली तो फक्त दगडू तेली यांच्या दुकानात मिळतो.दोन हळकुंडे व दोन बिब्बे दोन आण्यात मिळाले .त्यावेळी दशमान पद्धती आली नव्हती .घरी गेलो .मिसेसला सर्व प्रक्रिया सांगितली . मिसेसला थोडी भीती वाटली . तिला हा प्रकार माहिती नव्हता .दोन चार दिवसात खांदा पूर्णपणे व्यवस्थित झाला .दोन चार दिवसांनी मेहुणे भेटले तेव्हा माझा खांदा बरा झालेला पाहून त्यांना आश्चर्य वाटले.

सीन ३--मिसेसचा बावसा (खांद्याच्या पाठीमागचा  पाठीवरचा भाग) लचक भरली होती .या प्रयोगाने तिला पूर्णपणे बरे वाटले .पोटात वारंवार वात धरत असल्यास व त्रास होत असल्यास  दुधातून रात्री बिब्ब्याची  फुले टाकून घेतल्यास बरे वाटते .बिब्बा दाभण किंवा अन्य एखाद्या टोकदार वस्तूला टोचावा व नंतर तो ज्योतीवर घरावा बिब्ब्यातील तेलामुळे बिब्बा  पेट घेतो व त्याची फुले फुलबाज्या सारखी पडू लागतात .ती पांच ते दहा फुले दुधात टाकून रात्री झोपताना घेतल्यास वाताचा त्रास जातो  असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे .पोटातील वात कोणत्याही उपायांनी जात नसल्यास आणखी एक उपाय आहे .एखाद्या नाण्यावर फुलवात ठेऊन ते नाणे बेंबीवर ठेवावे  फुलवात पेटवून त्यावर रिकामा ग्लास उपडा ठेवावा . ऑक्सिजन न मिळाल्यामुळे ज्योत विझते . ग्लास पोटाला घट्ट चिकटतो .पोटातील गॅस बेंबी वाटे ग्लासामध्ये येतो.आतील बाहेरील दाब समान झाल्यावर ग्लास पोटावरून सुटतो व पोट दुखण्याचे थांबते . एक दोन आठवडे हा प्रयोग केल्यावर वात धरण्याची प्रवृत्ती जाते असाही अनुभव आहे.बिब्याची सुपारी म्हणून एक  प्रकार आहे .ती पौष्टिक असते.ती साधारणपणे बाळंतीणीला देतात एवढेच मला माहित आहे .

सीन ४--- सुमारे तीस वर्षांपूर्वी मला डाव्या  गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला. उकिडवे बसलेले असताना काही त्रास होत नसे परंतु उभे राहिल्यावर डाव्या गुडघ्यामध्ये आतल्या बाजूला प्रचंड असह्य कळ येत असे .एखाद्या मिनिटाने ती कळ थांबे .चालताना किंवा एरवी कुठेही त्रास होत नसे .काही दिवस गेल्यावर चालताना जिने चढ उतार करताना त्रास होऊ लागला .हळकुंड बिब्बा खत्ता लावून काही उपयोग झाला नाही .बिब्ब्यातील तेल लावले आणि गुडघा बरा झाला .तेव्हापासून दर दोन तीन वर्षांनी डावा उजवा गुडघा आतल्या बाजूला दुखू  लागतो . बिब्याचे तेल लावल्यावर बरा होतो .मात्र तेल लावताना किती लावावे कुठे लावावे याची काळजी घ्यावी लागते. तेल लावल्यावर चुरचुरते कंड येतो पुरळ येतो जखम होते .जखम बरी होण्यासाठी वेळ लागतो. प्रसंगी अँटीबायोटिक्स व सोफ्रॅमिसिन क्रीम लावावे लागते . इतर कुठे बिब्बा लागला तर तो  उभारतो.जिथे लावले असेल तिथे कायमचा डाग राहतो .तळपाय व तळहात जिथे केस येत नाहीत त्या ठिकाणी बिब्बा उभारत नाही  .तेल लावल्यावर प्रथम काहीच वाटत नाही नंतर त्रास सुरू होतो .हळकुंड बिब्बा तेल याचे मिश्रण लावणे नेहमीच श्रेयस्कर व सुरक्षित .बिब्ब्याची काही जणांना अॅलर्जी असते दुसरा बिब्बा लावीत असला तरी यांच्या अंगावर तो  उभारतो. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी जरा जास्तच काळजी घेतली पाहिजे .जखम झाली तर बरे होणे त्रासदायक असते .तेलापेक्षा खत्त्याची  परिणामकारता कमी आहे एवढे मात्र खरे .माझे दोनही गुडघे मी बिब्ब्याच्या जोरावर टिकवून धरले आहेत .मी वज्रासन पद्मासन व्यवस्थित घालू शकतो .मला तरी बिब्बा वरदान आहे .

१/८/२०१८©प्रभाकर पटवर्धन 
pvpdada@gmail.com

स्मृतिचित्रे

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
०१ यात्रा (डोर्ले ते शेटफळे) ०२ यात्रा (होडीतून) ०३ यात्रा (नाशिक ते गुळे व्हाया महाबळेश्वर) ०४ यात्रा (नाशिक ते गुळे व्हाया रनपार) ०५ यात्रा (नाशिक ते गुळे) ०६ यात्रा--- दुर्गम----- खडतर ०७ डोळे ०८ दहाचा आकडा ०९ कातकरी १० गणपतीपुळे पहिले दर्शन ११ चमत्कार १२ बेस्ट (बॉम्बे इलेट्रिकल सप्लाय ॲन्ड ट्रॅम कंपनी) १३ पावस १ १४ पावस २ १५ पोत एक अजब उपचार १६ ऐशी वर्षांपूर्वीचा कोकणातील दुर्गम प्रवास १७ नाशिकचे पहिले दर्शन १८ देव तारी त्याला कोण मारी १९ अनुभव-तो (मृत्यू) २० आमचॊ गांव २१ आमचे घर २२ आमची म्हैस २३ आमचा ग्रामोफोन २४ आणखी काही दिव्यौषधी २५ जे कृष्णमूर्ती व मी २६ कोर्टाची पायरी २७ दंतकथा २८ दिव्यौषधी २९ मी व योग ३० मन्या ३१ मला साप चावतो ३२ मुंज ३३ मी सौ.ला स्कूटरवरून पाडतो ३४ मी ड्रायव्हिंग लायसन्स काढतो ३५ मामा ३६ माझ्या स्कुटर्स ३७ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा १ ३८ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा २ ३९ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ३ ४० माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ४ ४१ माझ्या शिक्षणाची चित्तरकथा ५ ४२ माझा धाकटा भाऊ ४३ माझा शाळेतील पहिला दिवस ४४ माझी आई ४५ माझी पाकिटमारी ४६ माझे आजोळ ४७ माझे डोर्लॅ ४८ भाऊ ४९ लक्ष्मण ५० विठ्ठल ५१ अण्णा ५२ अप्पा ५३ मी लेखक कसा झालो ५४ राम हमारा जप करे ५५ मी दादा कसा झालो