सोनीचे लग्न 10
दोघांनी ती फुले त्या पवित्र स्थळी वाहिली. दोघांनी प्रणाम केले.
“आई, आम्हांला आशीर्वाद दे. आमचे प्रेम अभंग राहो.” सोनी म्हणाली.
दोघे निघाली. रामूने एक फूल तोडून घेतले व सोनीच्या केसांत घातले. तिने एक तोडून घेतले व त्याच्या कानावर ठेवले. परस्परांनी परस्परांस फुले दिली. जणू निर्मळ व प्रेमळ अशी स्वत:ची हृदये, स्वत:ची जीवनेच त्यांनी एकमेकांस अर्पिली.
सोनी व रामू यांचे लग्न ठरले. सार्या रायगावात वार्ता पसरली. ‘रामूचं नशीब थोर’ असे सर्व जण म्हणू लागली. संपतराय व इंदुमती यांच्याही कानी वार्ता गेसी. ती दोघे पुन्हा एकदा मनूबाबांकडे गेली. सोनीने त्यांचे स्वागत केले.
“सोन्ये, तुझं लग्न ठरलं ना?” इंदुमतीने विचारले.
“हो. रामूशी ठरविलं.” मनूबाबांनी सांगितले.
“सोन्ये, इतकी लाजतेस काय? ये. माझ्याजवळ ये.” संपतराय म्हणाले. सोनी संपतरायांजवळ गेली. त्यांनी तिच्या पाठीवरून, केसांवरून हात फिरविला.
“मनूबाबा, आता माझी एक तरी प्रार्थना तुम्ही ऐकली पाहिजे. या लग्नाचा दोहोंकडचा खर्च मी करीन. हे लग्न मी लावीन. एवढी तरी या निराश पितृहृदयाची इच्छा तुम्ही नाही का पुरविणार? सोन्ये, नाही म्हणू नको. कठोर होऊ नको.” संपतराय सकंप आवाजात म्हणाले.
“जशी तुमची इच्छा.” मनूबाबा म्हणाले.
“परंतु सोनीचं काय म्हणणे आहे?” संपतरायांनी विचारले.
“माझा विरोध नाही. मी तुमचं हृदय जाणते, दु:ख समजते. मनूबाबा माझे आणि तुम्हीही माझे.” सोनी म्हणाली.
संपतराय व इंदुमती आनंदून गेली. मुहूर्त ठरला. मोठ्या थाटाने लग्न झाले. सार्या गावाला पुरणपोळीचे जेवण मिळाले. सारे धन्यवाद व आशीर्वाद देते झाले. सोनी व रामू संपतराय व इंदुमती यांच्या पाया पडली. दोघांनी आशीर्वाद दिले. मनूबाबांनीही दोघांना पोटाशी धरले व आशीर्वाद दिले. साळूबाई व सखाराम यांनीही वधूवरांस आशीर्वाद दिले.