सोनीचे लग्न 2
“येथे लवकरच सुंदर फुलांचे ताटवे दिसतील आणि मी मुद्दाम रंगारंगाची फुले या हिरव्या गवतातून लावमार आहे. पाहाताच डोळे सुखावतील.” रामू म्हणाला.
“तुला आज कामावर नाही जायचं?”
“जायचं तर आहे.”
“मग आमच्याकडे भाकर खाऊन जा. मी ताजी करून देत्ये. येतोस?”
“आता तुझ्या हातची भाकर नेहमी खायची आहे.”
“परंतु नेहमी खाण्याला मिळण्यापूर्वी मधूनमधून खाऊन बघ. कशी लागते बघ. माझी परीक्षा घे.”
“परीक्षा कधीच घेतली आहे. परीक्षेत पास आहेस.”
“कितवा नंबर?”
“पहिला.”
“आणखी कोणाची परीक्षा घेतलीस?”
“कोणाची नाही. सोन्ये, तू चावट आहेस. चल लवकर.”
सोनी व रामू घरी आली. मनूबाबा चूल पेटवून शेकत बसले होते.
“इतक्या थंडीत सोन्ये तू कशाला उठतेस?” त्यांनी विचारले.
“आम्हांला नाही थंडीबिंडी.” ती हसत म्हणाली.
“बागेत गेली होतीस. होय ग?”