संपतरायाचे लग्न 2
वधूवरांस सर्व गावाने दुवा दिला. वधूवरांचा नवीन संसार सुरू झाला. इंदुमती आता आपल्या सासरी राहायला आली. सासू नव्हती. तीच आता घरधनीण होती. घरात येताच तिने घराला कळा आणली. सारा वाडा तिने स्वच्छ झाडायला लावला. कोळिकष्टके उडून गेली. वाडा आरशासारखा झाला. वरती दिवाणखाना होता. त्यात मोठमोठ्या तसबीरी होत्या. त्यांच्यावर खंडीभर धूळ बसली होती. इंदुमतीने स्वत: ती धुळ पुसून काढली. तसबिरी प्रसन्न दिसू लागल्या. दिवाणखान्यात स्वच्छ बैठक घालण्यात आली. शुभ्र असे लोड तेथे ठेवण्यात आले. फुलदाणीत फुलांचा गुच्छ तेथे ठेवण्यात आला. दिवाणखान्याला तेज चढले.
“किती आता प्रसन्न वाटतं! पूर्वी या दिवाणखान्यात येऊ नये असं वाटे.” संपतराय म्हणाला.
“स्त्रियांच्या हातात जादू आहे. स्त्रियांच्या हातांचा स्पर्श होताच आमंगलाचं मंगल होतं. मरणाचं जीवन होतं. खरं ना?” इंदुमतीने हसून विचारले.
“होय. स्त्री म्हणजे सौंदर्यदेवता. स्त्री म्हणजे व्यवस्था. स्त्री म्हणजे नीटनेटकेपणा. स्त्रियांना घाणेरडं आवडत नाही. भांडी स्वच्छ ठेवतील. घर स्वच्छ ठेवतील. कपडे स्वच्छ ठेवतील. स्त्रियांशिवाय स्वच्छता कोण ठेवणार? प्रसन्नता कोण निर्मिणार? स्त्रियांशिवाय संसार नीरस आहे. तुम्ही संसारातील संगीत, संसारातील माधुर्य. पुरुष अव्यवस्थित असतो. तुम्ही त्याच्या जीवनात व्यवस्था आणता. त्याला वारेमाप जाऊ देत नाही. इंदू, खरोखरच तुझ्या हातांत जादू आहे. तुझा स्पर्श अमृताचा आहे.” संपतराय प्रेमाने म्हणाला.
घरात गडीमाणसे आता वेळच्या वेळी कामे करीत. पूर्वी त्यांना वाटेल तसे वागण्याचा ताम्रपट असे. परंतु आता गड्यांना उजाडले नाही तो अंगण झाडून ठेवावे लागे. कारण इंदुमती स्वत: सडा घालीत असे. सुंदर रांगोळी काढीत असे. “सूर्यनारायण दारात उभे राहाणार. त्यांचं स्वागत नको का करायला? सारं स्वच्छ व पवित्र नको का?” असे ती म्हणे.
दिगंबररायांना सुनेचा आटोप पाहून समाधान वाटले. ते आता अशक्त झाले होते. आपण फार दिवस जगू असे त्यांना वाटत नव्हते. एके दिवशी संपत त्यांच्याजवळ बसला होता. त्याला ते म्हणाले, “संपत, मी आता दोन दिवसांचा सोबती. या जगाचा आता विसर पडू दे. देवाकडे माझं चित्त लागू दे. तुला शेवटचे दोन शब्द सांगतो; ध्यानात धर. तुला शीलवती, गुणवती, रूपवती अशी पत्नी मिळाली आहे. रत्न मिळलं आहे. ते नीट सांभाळ. तिला अनुरूप वाग. दोघांनी सुखाने संसार करा. कोणाला दुखावू नकोस. श्रीमंतीचा तोरा मिरवू नकोस. होईल ती मदत करीत जा. सत्यानं राहा. न्यायानं राहा. आपणाला श्रीमंती आहे ती गर्व करण्यासाठी नाही. दुसर्याच्या उपयोगी पडावं म्हणून आहे. आपली संपत्ती म्हणजे गरीबांची ठेव. ती त्यांना वेळोवेळी देत जा.